माधवराव जिम, मॉर्निग वॉक करून घरी आले. घरातील वातावरण एकदम बदललेले दिसत होते. राधा वाचत बसलेली होती, पण आजचा अवतार चांगलाच नवा दिसत होता.

‘‘काय ग राधा? हे काय कुंकूपण नाही धड कपाळाला आणि केसांच्या झिंज्या अशा मोकाट सुटलेल्या कां? हे काय आणि साडीऐवजी चक्क ड्रेस. वा! काय झालं काय आज?’’

‘‘हं ए आदित्य! असं काय रे म्हणतोस. अरे मी तुझी लाडकी मेघना ना रे. बघ बघ जरा कपाळाला. आहे की नाही, कपाळाला काळी न दिसेल अशी टिकली. माझ्या हनुवटीवरील तीळापेक्षासुद्धा लहान. ए अरे, बघ ना जवळ येऊन.’’

माधवराव : ‘अरे बापरे. म्हणजे हिला ‘सिरियल अ‍ॅटॅक’ आलेला दिसतोय. हे देवा, आता मी किती तास आदित्य राहायचं ते तरी सांग बाबा.’

‘‘हो ग हो दिसली हं तुझी टिकली. ए खरंच तू किती छान दिसतेस. आणि तुझं बोलणं आणि हसणं लई गोड. लई लई भारी. काय ग मेघना, या तुझ्या आदित्यला आज काही चहा नाश्ता आहे की नाही.’’ (भुकेने कळवळून माधवराव)

‘‘आदित्य, अरे आज माईनी आणि विजयाताईंनी केलाय चहा आणि नाश्ता. खरंच आदित्य, दोघी अगदी नाश्ता करत असतात. ए, मला नाही बाई येत असं करता. नुसतं ते गुलाबजामवर आइस्क्रीम घालून स्वीट डिश येते करता. आदित्य तू जा ना रे नाश्त्याला. मी येतोच जरा आटपून ह्य कपडय़ांना इस्त्री करून.’’

माधवराव- आदित्य समजून गुळगुळीत टकलावरून अगदी केसांची मोठी झुलपे आहेत असे समजून केस नीट करतात. तेवढय़ात मानेला एक झटका देतात.

मेघना : ‘‘ए आदित्य तूं खरंच किती गोड दिसतोस आणि तेरी ये झुलपेऽऽऽ क्या बात है. ए तुला ना चॉकलेट बॉय म्हणतात माहीत आहे. माझा आदित्य.’’

आदित्य नाश्त्याला जातो. मेघना गाणं म्हणत आवराआवरी करतेय. मेघनाऽऽ ये लवकर.

(माधवराव) आदित्य (मनात) : देवा, काय प्रकार आहे हा? काल का परवापण ती अशीच संध्याकाळी जान्हवी झाली होती आणि श्रीला शोधत होती. बराच वेळ हे चाललं होतं. तेवढय़ात तिच्या मैत्रिणीचा फोन आला. मग ती जान्हवीची राधा झाली. जरा वेळानं बरी झाली आणि बाहेरही गेली. आणि मी सुटलो.

आता असे सिरिअल अ‍ॅटक किती येणार रे देवा? का अँटेनाच काढून टाकू? आणि मी पामर किती वेळा किती हिरोंचे रोल करू? आता ह्य वयात हे झेपत नाही रे बाबा.

अहो, दोन्ही मुलं इथे नाहीत, आम्ही दोघं घरात. खरं तर आम्ही दोघं रिटायर्ड माणसं. वेळ जायला म्हणून ह्य सिरियल बघतो. आता त्यांचा असा मोठा डोस राधा घेईल हे काय हो माहीत मला? मला तर वाटतं त्या केबलवाल्यांस सांगतो आमची केबल सव्‍‌र्हिस बंद करायला. पण हे काही इतके सोपे नाही. राधा त्या शेजारच्या जोश्याकडेसुद्धा जाईल बघायला. त्यापेक्षा जरा बघतो. नाहीतर डॉक्टरकडेच जातो म्हणजे असं का होताय ते कळेल तरी.

माधवराव-राधा यांचे तीन-चार दिवस अगदी पूर्वीसारखे छान गेले. माधवराव सुटकेचा नि:श्वास टाकत आनंदात होते.

पण एक दिवस सकाळीच ते बाहेरून आले. तर राधा चक्क जान्हवी झाली होती.

‘‘ए, श्री हे बघ मी जान्हवी झाले. काय रे दिसते कां नाही जान्हवी. बघ बघ माझं मंगळसूत्र. काय पटली कां ओळख.’’

‘‘जानू, हे काय आता नवं खूळ आज?’’

(बापरे हिला ‘सिव्हियर सिरियल अ‍ॅटॅक’ आला वाटतं.)

‘‘श्री, मला ते बाबासारखं जानू जानू नको ना म्हणू. तू तर माझा श्री आहे नां? मग असं काय रे. ए, आता किती दिवस आपण भांडत राहणार? हे बघ अगदी खरं खरं सांगते, मला तो घटस्फोट वगैरे काही नकोय. ती सगळी माझ्या आईची करामत होती. लाखो रुपये पोटगी मिळवणे हेपण तिचं कर्तृत्व होतं. म्हणजे तिचं पुढचं आयुष्य सुखात जाईल. आणि मी राहीन तुझ्या विरहात, आणि कजाग आईच्या ताब्यात.

‘‘ए ‘श्री’ रागावू नको हं. पण तुझ्या सगळ्या आया मात्र मला घराबाहेर काढायला बघत आहेत. कोणती सौम्या कां रम्या आणून एवढय़ा दिवसांत हीच कां रे माझी पारख.’’

(माधवराव) श्रीच्या भूमिकेतून जान्हवीचं म्हणणं ऐकत होते.

‘‘ए श्री, पण तूं बोल ना काहीतरी. मीच आपली बोलतेय मघापासून.’’

‘‘मला बोलून देशील तर ना बोलणार मी.’’

‘‘श्री ऐक ‘जरा’, तुझी आईआजी मात्र ग्रेट आहे हं. किती छान सोडवला त्यांनी ह्य प्रकरणाचा गुंता. मला काय वाटतं श्री आईची आजी झाली नां, की पुढची परीक्षा झाली. त्यामुळेच त्यांना माझं तुझं भांडण, त्यातल्या चुका, लावालाव्या कोणी केल्या, तो सगळा गुंता चांगला सोडवता आला. नाहीतर तुझ्या त्या पाच आया. वा! कायपण सांगू. श्री रागावू नको हं. माझं काही ऐकण्याच्या आधीच ती बेबीआत्या तर काय ओरडाआरडी करत होती. जणू सगळं हिचंच राज्य. बिचाऱ्या त्या चौघींना बोलून तर देईल. छे! पक्क्या आहेत नुसत्या. आणि तुझी आई, श्री अगदी तुझ्यासारखी भोळी रे, नुसतं ऐकत होती. पण आपण जरा शांतपणे बोलू या, काहीतरी तोडगा काढू! काही नाही रे काही नाही. ती बेबीआत्या बोलून देईल तर. घर में बेबीआत्या का राज. कमाल करते अगदी. जशी काय अगदी जयललिताच समजते स्वत:ला.

ए श्री, मला काय वाटतं माहित्येत (लाजत लाजत) त्या तुझ्या पाचही आया जेव्हा (ए मी नाही जा) आज्या होतील तेव्हां बघ कश्या नुसत्या नाचतील. आणि भांडण विसरून मला अगदी सुखात न्हाऊं घालतील. ए, पण गंमत म्हणजे माझी लाडकी आईआजी तर अजून वरच्या पोस्टवर म्हणजे पणजीआजी होईल.

श्री बघतोस काय नुसतं. ए, पण तूपण पप्पा कां बाबा रे. काय मजा येईल नां?’’ श्रीच्या (माधवरावाच्या) जवळ जाते.

माधवराव सॉलिड घाबरून गेलेले आहेत. मोठय़ा आवाजात ओरडतात. ‘‘राधा, राधा हे बघ तू राधा आहेस आणि मी माधव, माधव आहे मी. मी श्री नाही. आणि तूं जान्हवीपण नाहीस कळतायं? का काय म्हणतोय ते.’’

‘‘आता राधा आणि माधव कोण श्री? आता इतकी छान गोड बातमी सांगतेय. अरे आपल्याकडे छोटुकली येणार छोटुकली.’’

‘‘राधा बस् – बस् एकदम बास. तू हे पाणी घे. जरा बरं वाटेल तुला. तुझं डोकं ठिकाणावर नाही राधा. आणि आजपासून त्या सिरियल बघणं बंद, कळलं का मी माधव काय सांगतोय ते.’’

शेवटी घाबरलेले माधवराव त्यांच्या सोसायटीतील डॉ. घारपुरे यांच्याकडे गेले. तसे ते माधवरावांचे मित्र होते. डॉक्टरांनी राधाची सगळी के स व्यवस्थित ऐकली. आणि हसत म्हणाले, ‘‘माधवराव अहो, हा ‘सिरियल अ‍ॅटॅक’ येतो त्यांना. आणि गंमत सांगतो, अगदी अश्याच ५-६ केसेस आहेत माझ्याकडे. आणि ह्यंत फक्त बायकाच आहेत असं नाही तर पुरुषसुद्धा आहेत बरं का. तर आता काही काळजी करू नका. तुम्हाला एक-दोन उपयुक्त टिप्स देतो. आणि त्यांना डोकं शांत करायला एखादी गोळी देतो. बघा निश्चितच गुण येईल.’’

डॉक्टरांच्या गोळ्यांनी एक-दोन दिवस बरे गेले. पण चौथ्या दिवशी दुपारी राधा आदिती झाली. आणि अर्थात मी जय. (जय जसा केविलवाणा अगदी तशी माझी अवस्था झाली.)

‘‘जय, हे बघ मला उद्या विरारला जायला हवं. अरे रागाने काय पाहतोस असा. तुझ्याच लाडक्या वहिनीचा तर नेहमीसारखा गोडगोड बोलणारा मानभावी फोन आला. जय, तुला वाटतं मी जाऊ नये. नाही गेले तर अण्णांचं काय? आणि तुझी ती ‘गोडबोली साखरसोली’ वहिनी, माझं श्रीमंत माहेर उकरून काढेल. आणि सगळी वसुली तुझ्यामाझ्या नावावर, आईकडून उकळेल.

काय रे जय तुझ्या वहिनीबद्दल जरा खरं बोलले तर तो बघ नाकाचा शेंडा लाल झाला ना! मग जेव्हा माझ्या पप्पांबद्दल बोलतोस तेव्हा माझा विचार करतोस का?

तिथे काय आणि इथे तरी काय? खरंच जय आपला संसार. इकडे त्या केतकर काकांच्या तडाख्यात चूप राहायचं. तरी बरं काकूंची मदत आहे आपल्याला. आणि विरारला वेगळीच कथा अण्णा आणि भावजी अगदी गप्प. आणि वहिनी पक्की हुशार. ताबडून घेते मला. जय मला काय वाटतं आपण आता खरं सांगू सगळ्यांना.’’

माधवराव (जय) : ‘‘हो हो आदिती, आता खरंच सांगू अगदी त्या तुझ्या प्रेमात पडलेल्या अविनाश सरांनासुद्धा आणि आवू ना.’’

‘‘हो, जय तुझ्या जुईला पण हं का? ए, कसलं भोकाड पसरेल.’’

‘‘जाऊ दे पसरू दे. रडू दे. मी तरी सुटेन तिच्या तडाख्यातून. अरे, आदिती माझी बायको आहे बायको आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि त्या केतकर काकांना पण ऑफिसमधला सगळा खरा प्रकार सांगणार आहे. मग काय व्हायचं ते होऊ दे. आदिती मला आता सॉलिड भूक लागली आहे.’’

‘‘हे बघ जय, आज आपण गंमत करू या का? त्या आपल्या ओळखीचे नाना देसाई आणि माई रे.’’

‘‘हो. हो. देसाई बिल्डिंगमधले. त्यांच्याकडे फोन करून जेवायला जाऊ या का?’’

‘‘अय्या! माईंना किती किती आनंद होईल म्हणून सांगू. चार वेळा म्हणतील. हो. हो. या हो या. बरं वाटेल अगदी आम्हाला. केतकर काका-काकूंना पण सांगा हो. बरं बोलावलंय् म्हणून. ए, हे देसाई कुटुंब कित्ती छान आहे. कोणाला काही अडचण येऊ दे, सगळे अगदी मदतीचा हात देतात. आणि नाना तर संत आहेत संत. सारखे सगळ्यांना धडे देत असतात. लोकांच्या कल्याणा संतांच्या विभूती. ए, पण कधी कधी जरा अति वाटतं नाही.’’

माधवराव रागाने : ‘‘हे बघ राधा, तुझंच वागणं सगळं जास्त वाटतं. आता बस् कर. हे बघ तू राधा आहेस आणि मी माधव आहे. आणि हे पटत नसले तर मी जान्हवीचे वडील आणि तू तू ती कला कजाग आई. चल होऊन जाऊ दे.’’

राधा म्हणते, ‘‘मी कला. नको नको रे, मी मी कां म्हणून कला होऊ, मी काय कट-कारस्थान करते का? वा रे वा! आणि तू! तू मात्र मोठा साधू पुरुष. मला हे नाही पटलं.’’

‘‘मान्य नाही बरं. म् मग मी खंडेराया आणि तूं तू ती म्हाळसा.’’

राधा आनंदाने दागिने घालायला उठली. पण लगेच तिच्या लक्षात आली ह्यतील गोम.

‘‘काय मी म्हाळसा. म्हाळसा मी म्हणजे तुम्ही उद्या दुसरी बानू आणाल इथे माझ्या बोडक्यावर बसायला. मी हे मुळीसुद्धा पटवून घेणार नाही.’’

डॉ. घारपुरे यांचं औषध आणि मॅजिक टीप्स् छान उपयोगी पडत होत्या. थोडय़ाच वेळात घरात शांतता आली. १५-२० दिवस चांगले गेले.

डॉक्टरांचे आभार मानायला माधवराव त्यांच्याकडे गेले. डॉक्टर पण पेशंट आपल्या औषधांनी आणि टीप्स्नी सुधारत आहे म्हणून आनंदात होते.

‘‘काय माधवराव आहे ना चांगली सुधारणा. आता बघा तुमचं आणि वहिनींचं वय पाहता तुमचा गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम पुरा झाला आहे. म्हणजे आता तुम्ही दोघं संन्यास आश्रमात असायला हवे, म्हणजे आपल्या ऋषीमुनींच्या म्हणण्यानुसार बरं का! पण आता आपण कोणत्या बाबा, बापूकडे जाऊ असं ठरवलं, तर अहो त्यांच्या चांगलेपणाचा तरी काय भरवसा? त्यापेक्षा अशा सीरियल बघणे विरंगुळा म्हणून ठीक. मात्र त्याचा अतिरेक व्हायला नको. हो, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे, घरात दोघंच असलात तरी एकमेकांशी संवाद, गप्पा-गोष्टी व्हायलाच हव्यात. माधवराव, संवाद मधला ‘स’ं काढून फक्त वाद चालू ठेवू नका. एक लक्षात ठेवा ही गरज तुमच्या मिसेसना आहे. तुम्हाला पण आहे. आपल्या कुटुंबसंस्था उत्तम राहण्यासाठी ही फार मोठी गरज आहे. अहो, ह्य वयातला हा तुमचा ‘टाईमपास फोर’ आहे.
वसुंधरा जोशी – response.lokprabha@expressindia.com