समलैंगिकतेबद्दल भारतीय समाजमनामध्ये अजूनही स्पष्टता नाही. समाज याविषयी तोंडात गुळणी धरून गप्प राहणे पसंत करतो. काहींच्या मते हा चर्चेचा विषय नाही, कारण हा मुद्दा आपल्या संस्कृती संस्कारांच्या विरोधातला आहे. हे लिहिण्याचे कारण म्हणजे लेखिका अरुणा सबाने यांची ‘दुभंगलेलं जीवन’ ही कादंबरी होय! समाजाने ज्या विषयांना वाळीत टाकले आहे, ज्यावर कथित पांढरपेशी सभ्य वर्गात अवाक्षरही बोलले लिहिले जात नाही, वाचले जात नाही अशा विषयांना अरुणा सबाने यांनी नेहमीच केंद्रस्थानी ठेवले आहे.

वास्तवात स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या समलैंगिकतेचा शोध घेणे आणि त्याची मांडणी पात्रांच्या आधारे विस्तारत नेऊन तिला कादंबरीचे स्वरूप देणे हे सोपे काम नाही. परंतु अरुणा सबाने यांनी ते लीलया पार पाडले आहे. हरेक व्यक्तीच्या ठायी जसे गुण असतात तसेच विकारही असतात. वैफल्य, वासना, तिरस्कार, भीती, मत्सर, तृप्तता, असमाधान, लोभ, द्वेष इत्यादींनी सर्वच माणसांना ग्रासलेले असते. मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करून सारेच आपापल्या पद्धतीने जीवन जगतात. ही जगण्याची सामान्य पद्धत होय. मात्र आपल्या शरीरामध्ये काही देहभावना आक्रोश करून स्वत:च्या अस्तित्वाविषयी आणि लैंगिक कलविषयक काहीएक स्टेटमेंट करत असतात, त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते, किंबहुना त्या भावनांचे दमन केले जाते. परिणामी आपल्या मनातले लैंगिक खुलेपण आपण स्वत:च खुडून टाकलेले असते. या विषयावर चर्चा करणे अथवा कुणापाशी जर मन हलके केले तर त्याचे वाईट पडसाद पडतील आणि लोक आपल्याकडे चुकीच्या नजरेने पाहतील या गोष्टीचे अथक दडपण प्रत्येकावरती दिसते! ‘दुभंगलेलं जीवन’ या कादंबरीमध्ये हे दडपण लेखिकेने भिरकावून दिले आहे. कादंबरीमधली तिची पात्रे तिच्या ठायी असलेल्या बंडखोरीची, विद्रोहाची भाषा बोलतात; पण ती भाषा रौद्र स्वरूपाची नसून प्रवाही, शांत, संवादी, मर्मभेदी पद्धतीची आहे. ती नेमक्या दुखत्या नसेवर करकचून बोट ठेवते, इतके की कादंबरीच्या शेवटी अस्वस्थ व्हायला होतं.

शलाका ही या कादंबरीची नायिका. ती एका स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करते. हेतूत: अविवाहित राहून एकटीच, पण स्वतंत्र राहते! एका मुलीला ती दत्तक घेते. ही नोंद महत्त्वाची आहे, कारण एकल पालकत्व असलेल्या व्यक्ती अथवा स्त्री-पुरुष दाम्पत्य एकत्रितरीत्या सर्वसाधारणपणे दत्तकविधान करताना मुलगाच दत्तक घेतात, जेणेकरून आपल्या अनेक गोष्टींचा वारसा त्याच्या नावावरती पुढे नेता यावा! किंबहुना तोच आपला वारसदार आहे असे अगदी ठासून सांगण्याची भूमिका त्यामागे असते. परंतु एकट्याने राहणारी शलाका एक मुलगी दत्तक घेते हे विशेष! या सर्व गोष्टींमुळे एकंदर कुटुंबव्यवस्थेविरुद्धच तिच्या मनात संताप असणे नैसर्गिक होते. तिच्या समाजकार्यात आदिनाथ नावाचा तरुण असतो. ते परस्परांच्या प्रेमात पडतात. एकमेकांची ओळख व्हावी नि प्रेमातले गहिरेपण आकळावे म्हणून ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. काही काळ असे एकत्रित राहून झाल्यानंतर आदिनाथ शलाकापाशी लग्नाचे टुमणे लावतो. वास्तवात त्याच्या या मागणीमागेही एक दडपण असते. आपण लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहतो म्हणून आपल्या बहिणीचे लग्न मार्गी लागणार नाही याची त्याला एक प्रकारची खात्रीच असते. म्हणून त्याने शलाकापाशी लग्नाचा आग्रह धरलेला असतो. शलाकाचे आदिनाथवर प्रेम असते, पण त्याला लग्नाचे स्वरूप देणे तिच्या स्वातंत्र्याच्या व्याख्येबाहेरची गोष्ट असते. जगण्यासाठी लग्न आवश्यकच आहे याच्याशी ती बिलकुल सहमत नसते.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : माणसं आणि काळाचे दस्तावेजीकरण

एकट्या स्त्रीने स्वतंत्र राहणे अथवा तिला कोणी पुरुष आवडला तर त्याच्यासोबत लिव-इनमध्ये राहणे यात तिला गैर वाटत नसते. आपण ज्याच्यासोबत राहतो त्याच्याशी आपले मतभेद होतात तेव्हा त्याच्यापासून अलिप्त होणे हेसुद्धा तिला उचित वाटते. मात्र काहीही झाले तरी आपले स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे यास तिचे प्राधान्य असते. तिच्या या बंडखोर विचारांमुळे कुटुंबात, समाजात तिला विविध स्तरांवर झगडावे लागते. तिच्या मते कोणतीही स्त्री माता होऊ शकते त्यासाठी तिने आपल्या गर्भातूनच अपत्य जन्मास घातले पाहिजे हे गैरलागू. प्रत्येक स्त्रीला माता होण्याचा हक्क आहे त्यासाठी ती मूल दत्तक घेण्याचा पर्याय खुला ठेवू शकते. याच विचारातून ती एका छोट्या मुलीला दत्तक घेते. बापाच्या जागी ती स्वत:चे नाव, आडनाव लावते. स्त्री कधीच पुरुषाशिवाय राहू शकत नाही या मिथकाविरुद्ध तिचा खंबीर संघर्ष यातून पुढे येत राहतो. मातृत्व मिळवण्यासाठी स्त्रीला पुरुषाचे नाव अथवा साथ अनिवार्य असण्याची गरजच नाही हा विचार ती अत्यंत प्रखरपणे रुजवू पाहते. स्त्री-पुरुषांच्या संबंधांसाठी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या परंतु एका अर्थाने अत्यंत बुरसटलेल्या व बऱ्यापैकी कालबाह्य झालेल्या विवाहसंस्थेच्या नैतिक व पावित्र्यविषयक संकल्पनांना ही कादंबरी सुरुंग लावते. देहभावनेचे व लैंगिक खुलेपणाचे स्वातंत्र्य मागताना ती कुठेही स्वच्छंदी न होता विचारांचा मजबूत पाया समोर ठेवते हे या कादंबरीचे वैशिष्ट्य. शलाकाचे विचारस्वातंत्र्य कुठेही उच्छृंखल वाटत नाही. स्त्री-स्वातंत्र्यासंदर्भातील चिंतन आणि स्त्री-पुरुष समानतेविषयक संतुलित विचारांच्या मांडणीने कुटुंबव्यवस्थेतील अन्य घटकांच्या जगण्यातली दुविधा नेटकेपणाने समोर येते. बालपणातले शोषण, एकल स्त्रीला स्वतंत्र राहताना येणाऱ्या अडचणी, सामाजिक कार्यात झोकून देण्यासाठी खुणावणारे परिपक्व मन हे टप्पे नेमके टिपलेत.

शलाकाच्या बहिणीची मुलगी असणारी सुचिता ही या कादंबरीची सहनायिका. शलाकाची बहीण अनुराधा हिचे घाईत शरदशी लग्न लावून दिले जाते. पुढे जाऊन या दाम्पत्याची कन्या सुचिताचा प्रेमविवाह होतो. सासरी तिच्या वडिलांचे समलैंगिक असण्यावरून तिला बोल लावले जातात. तीदेखील त्यांच्या वळणावर गेलीय का अशी शंका घेतली जाते. हा एक प्रकारचा मानसिक छळच असतो. जे दु:ख आपल्या आईच्या वाट्याला आले ते आपल्या हिश्श्याला येऊ नये म्हणून तिने कैक काळ करुणा भाकलेली असते, मात्र तिच्याही वाट्यास निराशा येते. आपले वडील समलिंगी होते या कथित देहभावनांचे ओझे ती वागवत राहते. अखेरीस ती मनोविकाराने त्रस्त होते. तिने सावरावे म्हणून शलाका तिला खंबीर आधार देण्याचा प्रयत्न करते. समाजात जर समलैंगिकतेस मान्यता असती तर या सर्वांची आयुष्ये सुलभ झाली असती, त्यांना अपराधाच्या काळकोठडीत कैद व्हावे लागले नसते.

आणखी वाचा-‘समजुतीच्या काठाशी…’

ही कादंबरी केवळ या विषयावर चर्चा करत नसून याचे मनोचिकित्सक विश्लेषणही करते. अगदी मोजक्या प्रसंगात कामुकता येते, मात्र ती अश्लीलतेकडे झुकणारी नसून कादंबरीची गरज आहे. यातली पात्रे कमालीची संयमी भाषा वापरतात, कुठेही डार्क शेड न येऊ देता पुरुष आणि स्त्री यांच्या दोहोंच्या देहस्तरावरच्या गे आणि लेस्बियन समलैंगिकतेवर प्रकाश टाकते. दोन समलिंगी व्यक्तींनी परस्पर सहवासातून देहिक, मानसिक सुख मिळवणे इतकीच याची व्याप्ती नाही, हे ‘दुभंगेलेलं मन’मध्ये पानोपानी जाणवते.

‘दुभंगलेलं जीवन’मध्ये सुचिता याच्या पुढचा टप्पा गाठते आणि उत्तर शोधते! अमृता पाटील यांच्या ‘कारी’चा इथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो. या कादंबरीत दोन समलैंगिक तरुणी त्यांच्या अंतिम उद्दिष्टात असफल होतात, परिणामी आत्महत्येचा प्रयत्न करतात. मात्र दुर्दैवाने त्यात त्या अपयशी ठरतात. त्यानंतर त्यांची ससेहोलपट सुरू होते. पारंपरिक चौकटी मोडून त्यांना आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जी लढाई लढावी लागते त्याची गाथा म्हणजे ‘कारी’! अरुणा सबाने यांच्या कादंबरीमधली शलाका ही व्यक्तिरेखा या समस्येचे उत्तर आहे! ‘तुझे आहे तुझपाशी, तू कधी न चुकलाशी’, यावर ती ज्या पद्धतीने ठाम राहते ते अफलातून आहे. संवेदनशीलता जपत प्रसंगी कणखरपणा अंगी बाणल्याविना यात यश नाही हे तिला पक्के ठाऊक आहे. प्रसंग फुलवण्याची हातोटी आणि गंभीर विषय असूनही त्याला बोजडपणाच्या छटेपासून दूर ठेवणं या प्लसमार्कमुळे कादंबरी वाचनीय झालीय. एका अचर्चित विषयावरील धाडसी कादंबरीसाठी अरुणा सबाने यांचे अभिनंदन!

‘दुभंगलेलं जीवन’, – अरुणा सबाने, रोहन प्रकाशन, पाने-२६०, किंमत- ३९५.

sameerbapu@gmail.com