‘एक व्यापक समूह म्हणून स्त्रियांच्या जाणिवा जाग्या करण्याचे काम वर्तमानकालीन स्त्रियांच्या चळवळीला जमलेले नाही’ इतके परखड मूल्यमापन १९८९ मध्येच करून त्याच वेळी ‘मुख्य प्रवाहातल्या राजकीय पक्षांचे कार्यक्रम आणि राजकारण यांना अनुकूल वळण लावणे तसेच पक्षबाह्य राजकीय कृतीगटांना आपल्याला हवे तसे वळण देणे या बाबतींत आजची स्त्री चळवळ कमी पडत आहे’ असा स्पष्ट इशाराही विद्युत भागवत यांनी दिला, तेव्हा ग्रामीण महिलांसाठी नेतृत्व-प्रशिक्षणाचे काम त्या करत होत्या. ‘भारतीय अर्थविज्ञान वर्धिनी’ या संस्थेतल्या त्यांच्या अभ्यासाला या कामाचा भक्कम आधार होता. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’ला आजचे हे नावही नव्हते, तेव्हा ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अध्ययन केंद्र’ स्थापन झाले आणि विद्युत भागवत यांनी या केंद्रातर्फे ‘स्त्रियांचे उत्पादक योगदान- घरी आणि बाहेर’ हा दीर्घ अभ्यास प्रकल्प राबवला.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : जेम्स अँडरसन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरकामगार, शेतमजूर स्त्रियांपर्यंत त्या पोहोचल्या. त्याही आधीपासून विद्युत भागवत यांना जातजाणिवेचे प्रश्न पडू लागलेले होते आणि भारतीय स्त्रियांमध्ये ‘व्यापक समूह म्हणून जाणिवा जाग्या करण्या’त जातिव्यवस्था आडवी येते का, हा प्रश्नही पडला होता. ही खरोखरची नवी, भारतीय वैचारिक सुरुवात होती आणि स्त्रीवादी संघटन-कार्याचा पाया रुंदावण्याचे प्रयत्न कसे असावेत याची दिशा त्यांना सापडली होती. संघटन-कार्याच्या दिशेने विद्युत भागवत कृतिशीलपणे पुढे गेल्याचे दिसले नाही. मात्र स्त्रीवादाची भारतीय, महाराष्ट्रीय पाळेमुळे काय आहेत याचे आकलन वाढवण्याचे काम त्यांनी केले. ताराबाई शिंदे, आनंदीबाई जोशी आदी गतशतकातील स्त्रियांचे निबंधलेखन हा समकालीन महाराष्ट्रीय स्त्रीवादाचा वैचारिक पाया आहे, अशी मांडणी त्यांनी केली. अर्थात सिमॉन द बूव्हा आदी सहा पाश्चात्त्य स्त्रीवादी चिंतकांवर त्यांनी पुस्तक लिहिलेच, पण ‘स्त्रियांचे मराठीतील निबंधलेखन’ उद्धृत करून त्यावर त्यांनी केलेली टिप्पणी हे त्यांचे सैद्धान्तिक योगदान ठरले. विद्या बाळ, छाया दातार, वासंती दामले आदी ‘स्त्रीमुक्तीवाल्या बायां’ची जी पहिली फळी १९७५ पासून उभी राहिली, त्यातील प्रत्येकीने निरनिराळ्या वाटेने आपापले काम सुरू ठेवलेच. पण विद्युत भागवत यांच्या वाटांमध्ये काही सांधेबदल दिसले. प्रत्यक्ष सामाजिक निरीक्षणांवर आधारित लिखाणाचा सांधा बदलून सैद्धान्तिकतेकडे गेला, मग सत्तरीचा उंबरठा ओलांडताना आणि दीर्घ रुग्णालयवारी झाल्यानंतर ‘आरपारावलोकिता’ ही कादंबरी त्यांनी आत्मचरित्राऐवजी लिहिली. ‘खासगी तेही राजकीयच’ मानणाऱ्या या लिखाणातली ‘जानकी’ आणि ‘मुक्ता खोब्रागडे’ ही विरोधविकासी पात्रे आणि पुरुषपात्रे लक्षणीय ठरतात. ही कादंबरी अधिक वाचली जाणे, तीवर चर्चा होत राहणे ही भागवत यांना खरी आदरांजली ठरेल.