हे सुरुवातीलाच ध्यानात घ्यायला हवं की, तीनशेहून अधिक पानांचं हे पुस्तक चार्ल्स डिकन्स या ब्रिटिश कादंबरीकाराबद्दल असलं तरी ते त्याचं चरित्र नाही. पण ही डिकन्सविषयीची चरित्रात्मक कादंबरीही नाही. तर हे डिकन्सविषयीचं पुस्तक आहे. गत वर्षी डिकन्सची द्विजन्मशताब्दी साजरी झाली, तर नुकतीच ‘पिकविक पेपर्स’ या त्याच्या गाजलेल्या कादंबरीला पावणेदोनशे र्वष झाली आहेत. त्या पाश्र्वभूमीवर डिकन्सविषयीचे अशा प्रकारचे तपशीलवार पुस्तक मराठीमध्ये लिहिले जाणे, ही निश्चितच काहीशी सुखद बाब मानावी लागते.
या पुस्तकात काय आहे आणि काय नाही, याच्या दोन स्वतंत्र मोठय़ा याद्या करता येतील. या पुस्तकाच्या काही मर्यादा नाहीत असेही नाही. पहिली गोष्ट आहे की, लेखकाने हे पुस्तक लिहिताना नवं असं काहीही सांगितलेलं नाही. शिवाय मूळ कागदपत्रांची, पुराव्यांची छाननी केली की नाही, याचेही कुठे उल्लेख केलेले नाहीत. किंबहुना ती केली नसावी असेच पुस्तक वाचून संपल्यावर वाटते. डिकन्सविषयी इंग्रजीत लिहिल्या गेलेल्या पुस्तकातील माहितीतूनच हे पुस्तक तयार झाले आहे.
मात्र डिकन्सची ही कहाणी लेखकाने ओघवत्या आणि रसाळ शैलीत सांगितली आहे. पण त्यात कुठेही डिकन्सचे पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केलेला नाही. अगदी डिकन्सविरोधात ‘ब्र’सुद्धा उच्चारलेला नाही. अर्थात त्यामुळे काहीही फरक पडत नाही. तसं न लिहिताही आपण काहीतरी महत्त्वाचं सांगू पाहतोय, असा लेखकाचाही दृष्टिकोन नाही. अभिप्रेतही असल्याचं दिसत नाही. त्यामुळे त्या दिशेने या पुस्तकाची समीक्षा करणंही काहीसं अन्यायकारक ठरेल.
त्यामुळे जे काही पुस्तकात नाही, यापेक्षा जे काही आहे, ते काय गुणवत्तेचं आहे, ते लेखकाने कशा प्रकारे सांगितलं आहे, या दृष्टीनेच या पुस्तकाकडे पाहायला हवं आणि त्या निकषावर हे पुस्तक कमालीचं वाचनीय आणि सुबोध आहे. मोजकी आणि नेमकी माहिती साध्या सरळ भाषेत प्रांजळपणे सांगितली आहे.
चार्ल्स डिकन्स म्हटलं की ‘पिकविक पेपर्स’, ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’, ‘ऑलिव्हर ट्विस्ट’, ‘ए टेल ऑफ टू सिटीज’ या कादंबऱ्या आठवतात. जागतिक साहित्यात अजरामर ठरलेल्या आणि आजही वाचल्या जात असलेल्या या कादंबऱ्यांचा कर्ता म्हणून डिकन्सचे नाव इंग्रजी साहित्याची किमान तोंडओळख असणाऱ्यांना परिचित असते.
‘द पिकविक पेपर्स’ने तर युरोपातील प्रकाशन व्यवहाराचं स्वरूप पालटून टाकलं! ही कादंबरी मार्च १८३६ ते ऑक्टोबर १९३७ या १९ महिन्यांच्या काळात दर महिन्याला काही प्रकरणं अशी हप्त्याहप्त्यानं प्रकाशित झाली. त्याला मोठी प्रसिद्धी मिळू लागली. लोक दर महिन्याची मोठय़ा आतुरतेनं वाट पाहू लागले. त्यात सर्वसामान्यांपासून न्यायाधीशांपर्यंत सर्व थरांतील वाचकांचा समावेश होता. डिकन्स तेव्हा अवघा २४ वर्षांचा तरुण होता. तोवर त्याचे लंडनविषयीचे केवळ काही लेख प्रकाशित झाले होते. पिकविक हा या कादंबरीचा नायक. तो पिकविक क्लबचा अध्यक्ष असतो. तो आणि त्याचे इतर तीन साथीदार फिरायला निघतात आणि त्या प्रवासाचा वृतान्त इतर सदस्यांना कळवतात, ही या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना. कादंबरीचं मूळ नाव आहे, The Posthumous Papers of the Pickwick Club ही कादंबरी नंतर एक-दोन महिन्यांनी म्हणजे १९३७च्या शेवटी शेवटी पुस्तकरूपाने प्रकाशित झाली. तोवर युरोपात प्रकाशन व्यवसाय हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे, हे कुणाच्या गावीही नव्हतं. पुस्तकविक्रेतेच जोडधंदा म्हणून पुस्तकं छापत असत. शिवाय खुद्द लेखकाला पुस्तकाच्या प्रकाशनाच्या खर्चाचा बराचसा भाग उचलावा लागत असे. पण ‘द पिकविक पेपर्स’ला अफाट यश मिळत गेलं. तिचे हप्तेच विक्रमी पद्धतीने विकले गेले आणि पुस्तकही. या महत्त्वाच्या कादंबरीविषयीची या पुस्तकातील माहिती वाचनीय आहे.
डिकन्सच्या ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’, ‘ऑलिव्हर ट्विस्ट’ या कादंबऱ्याही खूप गाजल्या. पण डिकन्स काही फक्त कादंबरीकार नव्हता. त्याने कथा, कविता, नाटक या वाङ्मयप्रकारामध्येही लेखन केलं. स्वत: नाटकं बसवली. त्यांचे प्रयोग केले. त्यावेळची इंग्लंडमधली रंगभूमी आणि तिचा प्रेक्षक हे हुल्लडबाज होते. डिकन्सने आपल्या परीने त्याला विधायक वळण द्यायचं काम केलं.
थोडक्यात प्रचंड हरहुन्नरी, कल्पक, प्रतिभावंत आणि जनसामान्यांचा कळवळा असलेला लेखक म्हणजे डिकन्स, याची प्रचीती या पुस्तकातून येते. ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव म्हणतात, की लेखकाला फार सुखासमाधानात ठेवू नये, त्याला फार पुरस्कार, सन्मान देऊ नयेत. मरू द्यावं. तरच त्याच्या हातून काहीतरी भरीव निर्माण होण्याची शक्यता असते.
डिकन्स ज्या काळात इंग्लंडमध्ये लहानाचा मोठा होत होता, त्यावेळचं इंग्लंड हे केवळ डिकन्ससाठीच नाहीतर सर्वसामान्य जनतेसाठी छळछावणीच होती. डिकन्स आजूबाजूला तशी हजारो माणसं होती. त्यांचं ते भयानक जगणं पाहत, स्वत:ही तसंच जगणं जगत डिकन्स लहानाचा मोठा झाला. कामगार, मजूर यांच्या वस्त्या, त्यांची कामाची ठिकाणं, त्यांचं गलिच्छ स्वरूप, त्यांचे काबाडकष्ट आणि तरीही पुरेसे पैसे न मिळणं, छळ होणं या साऱ्या गोष्टी डिकन्स पाहात राही. विषण्ण होई. त्याचं जगणंही त्यापेक्षा फार वेगळं नव्हतंच. पण यातून आपल्याला बाहेर पडायचंय, यासाठी तो धडपडत राहिला. एका वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून काम करू लागला आणि लिहू लागला. सुरुवातीला काही काळ ‘बोझ’ या टोपणनावाने लिहिल्यावर त्याने चार्ल्स डिकन्स या नावाने ‘पिकविक पेपर्स’ ही कादंबरी महिन्याच्या हप्त्याने लिहून छापायला सुरुवात केली आणि त्याचं जग बदललं.
त्यामुळे डिकन्सचं आयुष्यही त्यावेळच्या इंग्लंडची कहाणीही आहे. डिकन्स समजावून घेताना ते इंग्लंडही समजावून घ्यावं लागतं. म्हणजे त्यावेळची सामाजिक स्थिती. त्यातून इंग्लंड आणि डिकन्स या दोघांचीही कहाणी उलगडत जाते. ते काम हे पुस्तक चांगल्या प्रकारे करतं.
डिकन्सने आपल्या पंधरा कादंबऱ्यांमधून प्राधान्याने सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. ते प्रश्न तत्कालीन होते, हे खरे पण त्यांची शाश्वतता आजही बऱ्याच प्रमाणात टिकून आहे. आज डिकन्सच्या कादंबऱ्या खूप पसरट वाटू शकतात, पण त्यांचं मोल कुणालाही नाकारता येत नाही. डिकन्स आजही जगभर का वाचला जातो आहे, या प्रश्नाचा उलगडा या पुस्तकातून काही प्रमाणात नक्की होतो. डिकन्ससारख्या प्रतिभावंत लेखकाला समजावून घ्यायचे असेल आणि त्याच्या काळातले इंग्लंडही त्याच्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचायला हवे.
अशा प्रकारच्या पुस्तकाचा फायदा हा असतो की, ती दुय्यम दर्जाच्या साधनांवर बेतलेली असली, त्यातून नवं काहीही मिळत नसलं तरी जे आहे आणि जसं आहे ते तसंच सांगितल्यामुळे मूळ पुस्तकांपर्यंत जाण्याची, ती वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. या पुस्तकाने ते काम नि:संशयपणे चांगल्या प्रकारे केले आहे. त्यामुळे त्याच्या वाटय़ाला निदान एकदा तरी जायला काहीच हरकत नाही.
चार्ल्स डिकन्स – प्रदीप कुलकर्णी, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे, पृष्ठे – ३२६, मूल्य – ३०० रुपये.