-बाबुराव शिंदे

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष (२३ एप्रिल) आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचे स्मरण…

विठ्ठल रामजी शिंदे (२३ एप्रिल १८७३ – २ जानेवारी १९४४) महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण कार्यातील थोर समाजसुधारक, ब्राह्मधर्म प्रचारक, संशोधक व लेखक. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील जमखंडी या संस्थानच्या गावी खानदानी मराठा कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजीबाबा व आईचे नाव यमुनाबाई. त्यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी आत्याची मुलगी रुक्मिणी हिच्याशी झाला. घराण्याची पूर्वापार श्रीमंती गेल्यामुळे वडील रामजीबाबा हे संस्थानामध्ये काही काळ शिक्षकाची व कारकुनी स्वरूपाची नोकरी करीत होते. ते पंढरपूरचे वारकरी होते. आई सात्त्विक वृत्तीची होती व घरातील वातावरण जातिभेदाला थारा न देणारे होते.

ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Chhagan Bhujbal Said This Thing About Mahatma Phule
Chhagan Bhujbal : “महात्मा फुले ब्राह्मणविरोधी नव्हते, त्यांनी…” छगन भुजबळ यांचं महत्त्वाचं वक्तव्य
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
Vanchit Bahujan aghadi agitation against senior literary figure in Nagpur
नागपुरातील ज्येष्ठ साहित्यिकाच्या विरोधात वंचितचे आंदोलन, निवासस्थानी पोलीस तैनात
bhatke vimukta vikas pratishthan work for nomadic children education
सर्वकार्येषु सर्वदा :भटक्यांच्या शिक्षणासाठी सढळ हाताने मदतीची गरज
prarthana foundation information in marathi
सर्वकार्येषु सर्वदा : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा, वृद्धांचा निवारा
scene of Utsav Ganeshacha aadar Stree Shakticha based on education concept of teacher Swati Deshmukh
‘उत्सव गणेशाचा आदर स्त्री शक्तीचा’ ज्यांच्या कार्यावर देखावा त्यांच्याच हस्ते उद्घाटन

शिंदे हे जमखंडी येथील इंग्रजी शाळेतून इ. स. १८९१ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व इ. स. १८९३ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले. शिंदे यांची धाकटी बहीण जनाबाई हिचा तिच्या सासरी छळ होऊ लागल्यामुळे तिलाही त्यांनी पुण्यास आणून हुजूरपागा शाळेत घातले. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी कर्जाऊ शिष्यवृत्ती व खासगी शिकवण्यांची अल्पस्वल्प मिळकत यांवर काटकसरीने राहून इ. स. १८९८ मध्ये ते बी. ए. झाले. इ. स. १८९५ मध्ये अमेरिकन युनेटिरियन मिशनरी रेव्ह. जे. टी. संडरलँड यांच्या व्याख्यानामुळे एकेश्वरमताचा परिचय होऊन तसेच माक्स म्यूलर यांचे ग्रंथ वाचून त्यांची आंतरिक धर्मप्रेरणा प्रबळ झाली. एकेश्वरवादी प्रार्थनासमाजातील न्या. रानडे, रा. गो. भांडारकर, का. बा. मराठे यांच्या विचारांचा व सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव पडून इ. स. १८९८ मध्ये त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. त्याच वर्षी ते कायद्याच्या पदवी परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मुंबईस गेले. मुंबई येथील प्रार्थनासमाज व कोलकात्याचा ब्राह्मो समाज यांनी शिंदे यांची शिफारस केल्यावर ब्रिटिश अ‍ॅण्ड फॉरिन असोसिएशनने त्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी निवड केली. इ. स. १९०१ ते इ. स. १९०३ ही दोन वर्षे त्यांनी मँचेस्टर कॉलेज येथे तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. भारतात येण्यापूर्वी इ. स. १९०३ च्या सप्टेंबरमध्ये अॅमस्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस ब्राह्मो समाजाचे भारतातील प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहून ‘हिंदुस्थानातील उदारधर्म’ या विषयावरील निबंध त्यांनी सादर केला. १९०३ च्या अखेरीस मुंबई प्रार्थनासमाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यास आरंभ केला.

हेही वाचा…गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…

शिंदे यांनी धर्मप्रचारकार्यात आपली कल्पकता व आपले संघटन कौशल्य दाखवले. पोस्टल मिशन, उदारधर्मग्रंथ वाचनवर्ग, तरुण ब्राह्मोसंघ हे उपक्रम सुरू केले. मुंबई व मुंबईबाहेरील प्रार्थनासमाजात शेकडो धर्मपर व्याख्याने दिली. प्रार्थनासमाजाच्या सुबोधपत्रिका या मुखपत्रात सातत्याने धर्मविषयक लेखन केले. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मिशन स्थापून धडाडीने चालविलेले काम, तसेच त्यांची राजकारणविषयक जहाल मते मुंबई प्रार्थनासमाजातील धुरीणांना पसंत नसल्याने, प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून असलेला त्यांचा संबंध इ. स. १९१० मध्ये संपुष्टात आला. त्यानंतरदेखील त्यांचे धर्मकार्य चालूच राहिले. इ. स. १९२३ मध्ये मंगळूर येथे ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून कार्य केले. इ. स. १९२८ मध्ये पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करून ते चालविले. इ. स. १९३३ पासून वाई येथील ब्राह्मो समाजाच्या धर्मविषयक कार्यात ते सहभागी होत राहिले. जीवनाच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ ब्राह्म होते.

भारतातील विविध प्रांतांत केलेल्या प्रवासात अस्पृश्य वर्गाची दुरवस्था पाहिल्यानंतर त्यांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घालावे, अशी प्रेरणा शिंदे यांना झाली. त्यांच्या दृष्टीने हे धर्मकार्यच होते. इ. स. १९०१ च्या खानेसुमारीचा आधार घेऊन भारतातील विविध प्रांतांतील अस्पृश्यांची लोकसंख्या एकषष्ठांश असल्याचे लेखाच्या व व्याख्यानाद्वारा मांडून या अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक देशी मिशन स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली व त्याप्रमाणे न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोबर १९०६ मध्ये ‘ड्रिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना केली आणि स्वत: सेक्रेटरी राहून कामाला प्रारंभ केला. शतकानुशतके बहिष्कृत अवस्था लादून अस्पृश्य ठरविल्यामुळे या वर्गाला प्राप्त झालेला निकृष्टपणा नाहीसा करून त्यांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनविणे हा त्यांनी आपल्या कार्याचा एक भाग; तर उच्चवर्णीयांच्या मनातील अस्पृश्यताविषयक भ्रामक समजूत नष्ट करणे हा त्या कार्याचा दुसरा भाग मानला. मिशनच्या स्थापनेनंतर लगेच मुंबईत परळ, देवनार, कामाठीपुरा यांसारख्या भागांत त्यांच्यासाठी मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या. निराश्रित स्त्रियांची सेवा करण्यासाठी निराश्रित सेवासदन सुरू केले. शिंदे यांच्या भगिनी जनाबाई व वृद्ध आई-वडील हे या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या वस्तीत जाऊन राहिले.

हेही वाचा…गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!

मुंबईबाहेर पुणे, मनमाड, अकोला, अमरावती, नागपूर, महाबळेश्वर तसेच भावनगर, हुबळी, धारवाड, बंगलोर, चेन्नई इत्यादी ठिकाणी मिशनच्या शाखा काढल्या. मिशनच्या स्थापनेनंतर सहा वर्षांतच एकंदर १४ ठिकाणी २३ शाळा, ५५ शिक्षक, ११०० मुले, ५ वसतिगृहे, अन्य १२ संस्था व ७ आजीव प्रचारक एवढा मिशनच्या कामाचा व्याप शिंदे यांनी पश्चिम आणि दक्षिण भारतातील सात प्रांतांत वाढविला. इ. स. १९१२ मध्ये त्यांनी मिशनचे कार्यालय मुंबईहून पुण्यास हलविले. महात्मा फुले यांनी भोकरवाडीत ज्या जागेत अस्पृश्यांसाठी शाळा उघडली होती, ती जागा नगरपालिकेकडून संपादित करून श्रीमंत तुकोजीराव होळकरांच्या व मुंबई सरकारच्या आर्थिक साहाय्याने सव्वा लाख रुपये खर्च करून मिशनसाठी ‘अहल्याश्रम’ ही सोयीस्कर इमारत बांधली. अस्पृश्यता निवारणकार्याचे इ. स. १९२० पर्यंतचे पहिले पर्व हे जागृतीचे म्हटले तर विठठ्ल रामजी शिंदे हे या पर्वाचे प्रवर्तक ठरतात. पुढचे पर्व संघर्षाचे व त्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. इ. स. १९२३ मध्ये मिशन ही संस्था अस्पृश्यवर्गीय प्रतिनिधीच्या स्वाधीन करून शिंदे मिशनबाहेर पडले. त्यानंतरही पर्वती मंदिरप्रवेश सत्याग्रह, अस्पृश्यांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघाची योजना इत्यादी बाबतींत ते अस्पृश्यवर्गाच्या हिताच्या दृष्टीने सक्रियपणे भाग घेत होते. अस्पृश्यता निवारणकार्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी अखेरपर्यंत होती.

शिंदे यांनी महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक चळवळींत उच्चनैतिक भूमिकेवरून भाग घेतला. मुंबई कायदे-कौन्सिलच्या इ. स. १९२० च्या निवडणुकीत पुण्यातून मराठ्यांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी त्यांनी निवडणूक लढवावी ही चाहत्यांची विनंती त्यांनी अव्हेरली; कारण त्यांना जातीय तत्त्व मान्य नव्हते. उलट मागासलेला जो बहुजनसमाज, त्याचा कैवार घेणारा बहुजनपक्ष स्थापन करून त्याच्यावतीने शिंदे यांनी ही निवडणूक लढवली. या पक्षाने शेतकरी, शिपाई, शिक्षक, उदमी, दुकानदार, मजूर यांच्या जोडीनेच अस्पृश्य व स्त्रीवर्ग यांच्या हितसंबंधांसाठी झटण्याचा निर्धार प्रकट केला. या निवडणुकीत शिंदे यांना यश मिळाले नाही. महात्मा गांधीप्रणीत इ. स. १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. देवाच्या नावावर मुलींना अनीतीच्या मार्गात लोटणारी मुरळीची चाल बंद व्हावी, अशा मुलींचे या दुष्ट चालीपासून संरक्षण करावे या हेतूने मुंबई शहरातील प्रतिष्ठित मंडळींची एक संस्था इ. स. १९०७ मध्ये स्थापन करण्यात आली. तिचे एक कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले. इ. स. १९११ मध्ये मुंबईत एक ‘मुरळी प्रतिबंधक परिषद’ भरविली. इ. स. १९१८ च्या सुमारास पुणे नगरपालिकेतर्फे मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे, यासाठी त्यांनी चळवळ केली. पुणे येथे इ. स. १९२८ मध्ये भरलेल्या ‘मुंबई इलाखा शेतकरी परिषदे’चे नेतृत्व शिंदे यांनी केले. अखेर सरकारला सारावाढ व तुकडेबंदी ही संकल्पित विधेयके मागे घ्यावी लागली. इ. स. १९२६ ते इ. स. १९३२ या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या परिषदांमध्ये त्यांच्या समस्यांचे विवरण करून शेतकऱ्यांनी आपापसांत एकी करावी, कामगारांसमवेत एकजूट करावी तसेच उत्पादनाच्या जोडीने अर्थकारणाकडेही लक्ष द्यावे असे प्रतिपादन केले.

हेही वाचा…हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…

शिंदे यांना संशोधन-लेखनाची ओढ असल्यामुळे कामाच्या धावपळीतून वेळ काढून त्यांनी संशोधनपर, वैचारिक व ललित स्वरूपाचे महत्त्वपूर्ण लेखन केले. अस्पृश्यताविषयक संशोधन हा त्यांचा एक प्रमुख आस्थाविषय होता. अस्पृश्यवर्गाच्या एकंदर लोकसंख्येची निश्चिती करून त्यांच्या स्थितीसंबंधी इ. स. १९०५ मध्ये इंडियन सोशल रिफॉर्मरमध्ये त्यांनी इंग्रजीत लेख लिहिला. ‘बहिष्कृत भारत’ (इ. स. १९०८), ‘अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास’ (इ. स. १९२२), ‘ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग’ (इ. स. १९२७) हे लेख व ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ (इ. स. १९३३) हा समाजशास्त्रीय प्रबंध हे त्यांचे या विषयावरील प्रमुख लेखन होय. त्यांच्या या प्रबंधात अस्पृश्यतेच्या उगमापासूनचा इतिहास, बुद्धपूर्वकाळापासून वर्तमानकाळापर्यंत दिसणारी अस्पृश्यतेची विविध रूपे, त्यांचा इतिहास, धर्म, सामाजिक स्थिती, राजकारण इत्यादी विषयांचे विवेचन केले असून, अस्पृश्य मानले गेलेले लोक एकेकाळचे राज्यकर्ते होते व धर्माने ते बौद्ध होते हे मत त्यांनी विविध प्रकारचे पुरावे व आधार देऊन मांडले आहे. कानडी आणि मराठी या भाषांमधील संबंधांचा सविस्तर ऊहापोह करून कानडीचा शब्दसंग्रह तसेच व्याकरण यांचा मराठीवर मोठा प्रभाव पडला आहे, हे त्यांनी दखविले आहे. ‘भागवत धर्माचा विकास’ या लेखमालेमध्ये भक्ती या तत्त्वाचा विकास प्राचीन काळापासून वर्तमानकाळापर्यंत कसकसा होत गेला, याचे विवेचन केले आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने आणि उपदेश (इ. स. १९१२) या पुस्तकात प्राधान्याने धर्मपर लेख, तर पुढील कार्यकाळातील अनेकविध सामाजिक, शैक्षणिक व संशोधनपर विषयांवर लिहिलेले लेख ‘शिंदे लेखसंग्रह’ (१९६३) या पुस्तकात संग्रहित करण्यात आले आहेत. त्यांचे धर्मविषयक तसेच प्रवासवर्णनपर, व्यक्तिविषयक व अन्य स्फुट स्वरूपाचे लेखन धर्म, जीवन व तत्त्वज्ञान (१९७९) या ग्रंथात एकत्रित केलेले आहे. शिंदे यांनी (इ. स. १८९८), इंग्लंडमध्ये (इ. स. १९०१-१९०३) व येरवड्याच्या तुरुंगात (इ. स. १९३०) असताना लिहिलेली ‘रोजनिशी व माझ्या आठवणी व अनुभव’ (प्रकाशन इ. स. १९४३, १९५८) हे पुस्तक त्यांचे आत्मपर स्वरूपाचे लेखन आहे. या लेखनातून त्यांच्या मनाची आध्यात्मिक ठेवण, तरल संवेदनशीलता, सूक्ष्म सौंदर्यदृष्टी आणि प्रसन्न विनोदवृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष प्रत्ययाला येतात.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अचंबित करणाऱ्या गोष्टी…

अस्पृश्यता निवारणासाठी व या वर्गाच्या उन्नतीसाठी शिंदे यांनी त्यागवृत्तीने व समर्पणाच्या भावनेने आयुष्यभर जे कार्य केले, त्याबद्दल त्यांचा ‘कर्मवीर’ तसेच ‘महर्षी’ या उपाधींनी गौरवपूर्ण उल्लेख केला जातो.

baburaoshinde50@gmail.com