आमच्या ‘पपलू इलेव्हन’ क्रिकेट टीमचा सचिन तेंडुलकर आमचा उत्तमदादा होता. हे मी मागे याच स्तंभात एका लेखात सांगितलं होतं. याच आमच्या टीमचा एक मेंबर हलवाई होता. नाही, हलवाई हे त्याचं नाव नाही आणि आडनावही नाही. हलवाईचे वडील वकील होते आणि आई शिक्षिका. त्यांच्या खानदानात कुणाचाच जिलेब्यांसाठी दुकानासमोर रांगा धरण्याव्यतिरिक्त हलवायांशी संबंध आला नसेल. पण तरीही आमच्यासाठी तो ‘हलवाई’ होता. त्याला हे नाव पडलं त्याच्या फलंदाजी करण्याच्या एकमेवाद्वितीय शैलीमुळे. गोलंदाजानं चेंडू टाकला की तेलातून जिलब्या काढताना हलवायाच्या झाऱ्याची होते तशी त्याच्या बॅटची हालचाल होत असे. त्याची ही शैली पाहून गोलंदाजही काही सेकंद थक्कहोत असे. त्या धक्क्यातच तो पुढचे काही चेंडू लुज टाकत असे आणि हलवाई आपला झारा फिरवत धावा जमवत असे. मला कधी कधी ठरवता येत नाही की हलवाईची ही बॅटिंगची स्टाइल जास्त परिणामकारक होती, की त्याची रडी खाण्याची हातोटी. रस्त्यावरचे बेकायदा फेरीवाले जसे निकरानं आपला फुटपाथ लढवतात, त्याच चिकाटीनं हलवाई आपली विकेट लढवत असे. एकदा बाजूच्या गल्लीबरोबरच्या एका मॅचमध्ये हलवाई तिन्ही दांडचिन्मय मांडलेकरय़ा उडून क्लीन बोल्ड झाला. तरीही तो क्रीज सोडायलाच तयार होईना. त्याच्या रडी खाण्याच्या अमाप क्षमतेची पुरेपूर कल्पना असूनही आम्हाला कळेना की आता हा मुरारबाजी आपला गड राखणार कसा? हलवाई जागेवरून हलत नाही हे पाहून विरोधी पार्टी धावून आली. ‘नो बॉल होता.’ हलवाई विवेकानंदांच्या स्थितप्रज्ञतेनं म्हणाला. अम्पायर बुचकळ्यात पडला. ‘मी नाही दिला नो बॉल.’ ‘पण तो बॉल टाकत असताना तू हात वर केलास.’ अम्पायर म्हणाला, ‘अरे, माझ्या काखेत खाज आली म्हणून मी हात वर केला थोडा.’ ‘मला काय माहीत? मी नोबॉल आहे म्हणून खेळलोच नाही. मी नॉटआऊट आहे.’ पंधरा मिनिटं रणकंदन होऊनही हलवाई क्रीज सोडेना. प्रतिस्पर्धी पक्ष शेवटी बोटं मोडत निघून गेला. मॅच रद्द झाली. आम्ही सगळेच त्याच्यावर कावलो. ‘मी अडून राहिलो म्हणून मॅच वाचली. नाही तर हरत होतो आपण. फुकट कॉन्ट्रिब्युशनचे पैसे द्यावे लागले असते त्यांना.’ निर्विकारपणे हलवाई म्हणाला. प्रामाणिकपणा, शुचिता, खिलाडूवृत्ती असल्या फोलपट शब्दांना हलवाईच्या डिक्शनरीत जागा नव्हती. पण काही बाबतीत हलवाई नको तितका प्रामाणिक होता. एखाद्या बंद खोलीत मंडळी जमलेली असत. कॅरमचा खेळ रंगला, असे अचानक सगळ्यांच्या नाकातले केस जळणारा एक गंध दरवळे. लोक नाकावर हात ठेवत एकमेकांकडे त्रासिक नजरेनं पाहत असत. या वासाचा जनक कोण, असा प्रश्न लोकांना पडायच्या आत हलवाई हात वर करत असे आणि मोठय़ानं, ‘मी..’ असं ओरडत असे. लोक आपली नाकं दाबत त्याला नाव ठेवताना, दूषणं देताना हलवाई शांतपणे क्वीनवर नेम धरे.

त्या काळात फॅशन स्ट्रीट किंवा हिल रोड ही दोनच कापड खरेदीसाठी खिशाला परवडणारी ठिकाणं असायची. पण हलवाईला खरेदीसाठी बरोबर नेणं म्हणजे कसायाला बकरीच्या वाढदिवसाला नेण्यासारख होतं. एखादा टी-शर्ट आवडला म्हणून आपण त्याला दाखवावा तर तो भर रस्त्यात स्वत:च्या अंगावरचा शर्ट काढून त्याच्या घामट अंगावर आपल्या पसंतीचा टी-शर्ट चढवत असे आणि आपण काही बोलायच्या आत ‘चांगला दिसतो मला’ म्हणून तो टी-शर्ट काबीज करत असे. ‘उद्या लग्नासाठी मुलगी बघायला गेलो तर याला न्यायचं नाही. हा तिथेच त्या मुलीशी स्वत:च लग्न लावून मोकळा होईल.’ हलवाईचा एक ‘कापडबळी’ एकदा कट्टय़ावर बसलेलो असताना खिन्नतेनं म्हणाला होता.

Shahrukh Khan Son Abram Bowls Wide Yorker to Rinku Singh Video Viral
IPL 2024: शाहरूखची बॅटिंग तर, लेक अबरामने रिंकू सिंगला टाकला भन्नाट यॉर्कर अन्… Video होतोय व्हायरल
Jason Gillespie Gary Kirsten
कर्स्टन, गिलेस्पी पाकिस्तानचे नवे प्रशिक्षक
Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO

आम्ही सगळेच तेव्हा सोळा-सतरा वर्षांचे होतो. अनेक गोष्टी पहिल्यांदाच आणि चोरून करण्याचं ते वय. एकदा एका मित्राच्या घरचे लग्नासाठी गावी गेले होते. सगळ्यांनी त्याच्या घरी जमून सामूहिकपणे निळा चित्रपट बघायचं ठरलं. एखाद्या जिहादी गटानं बॉम्बस्फोटाचं प्लानिंग करावं अशा निगुतीनं सगळी योजना आखण्यात आली. ‘ती’ रॅकेट कशी मिळवायची. ती घरापर्यंत कशी आणायची वगैरे वगैरे ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या आणि खोलीत अंधार करून आम्ही नुकतंच मिसरूड फुटत असलेली मुलं टी.व्ही.वर आता कुठली ज्ञानाची कवाडं आपल्यासाठी उघडतायत याची धडधडत्या काळजानं वाट पाहत बसलो. तेवढय़ात शत्रुपक्षानं छुप्या नळकांडीतून गॅसचा मारा करावा तसा दरवळ सगळीकडे पसरला. ‘मी.’ हलवाईची चिरपरिचित कबुलीही मागाहून आली. मग अंधारातल्या अंधारात त्याला शिव्या घालणं झालं आणि त्या वासाकडे दुर्लक्ष करत आम्ही पुन्हा डोळे टी.व्ही.ला चिकटवले. पण तिथं काहीच घडेना. नुसत्याच काळ्या स्क्रीनवर आडव्या पांढऱ्या रेषा उमटत राहिल्या. असंच अर्ध मिनिट गेल्यावर आमचा धीर खचला. टय़ूबलाइट लावण्यात आली आणि नेमके घोडं तटलंय कुठे याचं सर्वेक्षण सुरू झालं. कुठलंही इलेक्ट्रॉनिक यंत्र बिघडलं की उजव्या हातानं त्या यंत्राला दोन-चार सणसणीत थपडा मारल्यास ते यंत्र पूर्ववत सुरू होतं, हा भारत देशानं जगाच्या कल्याणासाठी लावलेला शोध. त्या सिद्धांताचंही पालन करून झालं. पण काही घडेना. शेवटी असं कळलं की व्हिडीओ कॅसेट गंजली आणि ती व्ही. सी. आर.च्या हेड्समध्ये गुरफटून अडकली आहे. आता आम्हा उद्यमशील तरुणांसमोर वेगळाच पेच उभा राहिला. अडकलेली कॅसेट काढायची कशी? ती तशीच राहू दिली तर मित्राच्या घरचे आल्यावर घराचा कत्तलखाना होऊन जाईल. मेकॅनिककडे न्यायचं तर ही मुलं व्ही.सी.आर.वर नेमकं काय बघत होते हे त्याला कळणार. ती नाचक्कीही नको होती. ज्याच्या घरात आम्ही जमलो होतो तो आमचा मित्र तर फक्तभोकाड पसरायचा बाकी होता. घरगुती उपचार म्हणून आम्ही आत सुरी घालून पाहा वगैरे प्रकार केले. पण त्यानं काहीच होईना. मेकॅनिककडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ‘नो प्रॉब्लेम हॅण्डल इट’ असं म्हणत हलवाईनं ते व्ही.सी.आर.चं बाड उचललं आणि तो अंतर्धान पावला. जवळजवळ पाऊण तासानं पुन्हा अवतरला. व्ही.सी.आर. वेगळा. कॅसेट वेगळी. आम्ही फक्त त्याचे पाय धरायचे बाकी होतो. हा अल्लाघरचा बंदा आपल्यात इतके दिवस राहतोय आणि आपल्याला याची किंमत कळली नाही या खेदानं डोळ्यांत पाणी उभं राहिलं. ‘तू काय केलंस हलवाई? कशी काढली कॅसेट बाहेर?’ ‘मी कशी काढणार? याच्या घराच्या खालीच रिपेअरचं दुकान आहे. त्याच्याकडनं काढून आणली.’ खोलीच्या एका कोपऱ्यातून रामसेच्या सिनेमात हिरोइनची किंकाळी ऐकू येते तशी एक किंकाळी ऐकू आली. ‘तू बल्लू अंकलकडे व्ही. सी. आर. दिलास. अरे ते माझ्या बाबांचे मित्र आहेत.’ ‘म्हणून तर फुकटात काढून दिली त्यांनी.’ ‘अरे, पण त्यांना कळलं असेल ना आपण.. आपण.’ त्या मित्राला पुढचे शब्दच फुटेनात. ‘ऑफकोर्स कळलं असणार. हे काय कॅसेटवर नाव आहे.’ आणि आमच्या माहितीसाठी हलवाईनं त्या ‘निळ्या’ सिनेमाचं ते दिलखेचक नाव मोठय़ानं वाचून दाखवलं. ‘मी बल्लू अंकलना बोललो हेम्याच्या घरी सांगू नका. पोरांनी पहिल्यांदाच केलंय हे. मी बोलेन त्यांच्याशी. समजावेन त्यांना.’ आधी दोन सेकंद माझ्या तोंडून शब्दच फुटेना. ‘पोरं? म्हणजे आम्ही हे.. आणि तू..’ ‘येडा आहे का तू? मी त्यांना स्वत:हून सांगणार आहे, मी पण होतो म्हणून? मी तुमच्यावरच बिल फाडणार ना?’ कोडगेपणाचं ऑस्कर असतं तर पाचही नॉमिनेशन्स हलवाईलाच मिळून त्याच्याच हस्ते त्याला ती ट्रॉफी देण्यात आली असती.

सिनेमाच्या कथेत येणारी रंजक वळणं प्रत्यक्ष पडद्यावर दिसण्याआधी दीड मिनिट हलवाईच्या तोंडून कळायची. अगदी फर्स्ट डे फर्स्ट शोला बसलं तरी. ‘तुला कशी माहीत असते स्टोरी?’ एकदा मी तडकून विचारलं. ‘मग! परीक्षण वाचून येतो मी सिनेमा.’ अभ्यासाबद्दल एवढी आस्था हलवाई शिक्षणात दाखवता तर इंजिनीअरिंगला गटांगळ्या न खाता. हलवाईच्या एकूणच ‘पॅकेज’मुळे याला कधी पोरगी पटेल, असं आमच्यापैकी कुणालाच स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण एके दिवशी हलवाईनं ‘दीपल, माय गर्लफ्रेण्ड’ अशी एका सुंदर गुजराती मुलीशी कट्टय़ाची ओळख करून दिली. त्यानंतरचे पंधरा दिवस ही मोत्याची माळ वानराच्या गळ्यात पडली कशी यावरच चर्चा करण्यात आम्ही घालवले. दीपलशी मेतकूट जमल्यावर हलवाई अड्डय़ावरून गायबच राहू लागला. आपल्याला कट्टय़ापासून फारकत घेण्याचं असं गोड कारण कधी सापडणार, या विवंचनेत आम्ही असताना हलवाई एके संध्याकाळी पुन्हा उगवला. कुणीही काहीही न विचारता ‘ब्रेकअप झालं.’ असं दोन शब्दांचं भाषण हलवाईनं केलं. ‘मी सांगतो. हा त्या दीपलला हॉटेलमध्ये घेऊन जात असणार. तिथे तिच्या प्लेटमधलंही हाच उडवत असणार आणि मग ढुसक्या सोडल्यावर हात वर करून म्हणत असणार ‘मी..’ हलवाईनं थंड नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. ‘साधारण हेच.’ तो शांतपणे म्हणाला.

हळूहळू कट्टय़ावरची सगळीच भटकी गलबतं धक्क्याला लागली. अनेकांची लग्नं झाली. हलवाईचंही झालं. आणि वर्षभरातच हलवाईला मुलगाही झाला. आमच्या ग्रुमधला बाप झालेला तो पहिलाच. मुलाच्या पेढय़ाची गोडी तोंडावरून विरते न विरते तोच एक दिवशी बातमी आली हलवाईचं बाळ गेलं. डेंग्यू. त्या दिवशी आम्ही हलवाईकडे भेटलो तेव्हा पहिल्यांदाच आम्हाला एकमेकांशी काय बोलावं हा प्रश्न पडला होता. मरणबिरण गोष्टी सिनेमात घडणाऱ्या, वास्तवात या गोष्टींना सामोरं कसं जायचं ते कळेचना. हलवाई गप्पच होता. निघताना घट्ट मिठी मारून रडला. ‘शक्य झालं असतं तर माझं लाइफ त्याला दिलं असतं रे मी.’ हलवाई हुंदक्यांमध्ये बोलू पाहत होता. त्याच्या तोंडून पहिल्यांदा कुणाला काहीतरी देण्याची भाषा ऐकत होतो मी, पण त्यामागचे संदर्भ गुदमरून टाकणारे होते.  दुसऱ्या खेपेला हलवाईला मुली झाल्या. जुळ्या. मागच्याच वर्षी हलवाईच्या घरी गेट टुगेदर झालं. सगळेच खूप वर्षांनी भेटले होते. कुणाचं तारू कुठल्या दिशेला निघालंय याच्यावर चर्चा सुरू होती. तेवढय़ात दोन गट्टय़ा पोरी बाहेर धावत आल्या. हलवाईच्या बायकोनं सगळ्यांसाठी आमरस केला होता. दोन वाटय़ा दोघींच्या हातात दिल्या. तेव्हाच हलवाईनं आतून एन्ट्री मारली. ’‘अरे वा! आमरस सव्‍‌र्ह झाला का?’ असं म्हणत त्यानं दोन्ही मुलींच्या हातच्या वाटय़ा सहज उचलून तोंडाला लावल्या आणि जिभल्या चाटू लागला. ‘आई.. बाबांनी आमचा आमरस खाल्ला.’ पहिली म्हणाली. ‘बाबा नेहमी असंच करतात.’ दुसरी म्हणाली.

चिन्मय मांडलेकर naquarian2279@gmail.com