आगरकर संगीतात असते तर किशोरीताईंप्रमाणेच स्वरभाषेचं अन् शब्दांपलीकडच्या व्यापक अवकाशाचं बोलले असते. घराण्याच्या मिजाशीवर त्यांनी वार केले असते. तशीच सुस्पष्ट मांडणी, तसंच आग्रही प्रतिपादन. ताई आगरकरी परंपरेतल्या; म्हणूनच तर उत्तरेतल्या एका राज्यात गात असताना तिथलं धुंदफुंद वातावरण पाहून (उपस्थितांच्या हाताला मोगऱ्याचा गजरा.. वा बाईजी, क्या खूब!असा रगेल गजर.) तिथल्या मुख्यमंत्र्यावर त्या जाहीरपणे कडाडल्या म्हणतात. सत्ताधीशांना खडे बोल ऐकवणं हा आपल्या कलावंतांचा स्वभाव नाही. आणि याच्या अगदी उलट ताईंचा स्वभाव.

त्यांच्यात एक अँटिगनीदडलेली होती.

pune crime news, young man attempted suicide at police station
पत्नी नांदायला येत नसल्याने पोलीस चौकीत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
obsessed girlfriend with a love brain disease viral
Viral : तरुणीला झाला ‘प्रेमाचा’ आजार! प्रियकराला करायची १०० मेसेज! डॉक्टर म्हणाले, “हिला…”
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…

साल १९८७-८८. एनसीपीएच्या लिट्ल थिएटरचं फॉयर. सकाळची वेळ. मोजक्या रसिकांच्या उपस्थितीत पं. मल्लिकार्जुन मन्सूर गाताहेत. बहुधा ‘परज’ गायले ते. त्यांच्या जीवनकार्यावर डॉक्युमेंटरी तयार होतेय. त्यानिमित्तानं ही मफल. वातावरण शीतल नि प्रसन्न. आवश्यक तेवढा भाग शूट झाल्यावर चहाची सुट्टी झाली. किशोरीताई मन्सूरअण्णांच्या पाया पडतात. ते ताईंना प्रेमानं आपल्या शेजारी बसवून घेतात. ताई अण्णांना दुधाचा पेला देतात. अन् हलके हलके त्यांचे पाय चेपू लागतात.. या चित्रानं माझ्या मनाचा कायमचा ताबा घेतलाय. याच कार्यक्रमात किशोरीताईंशी माझी ओळख झाली.

एनसीपीएचंच टाटा थिएटर. ताईंनी गाणं सुरू तर केलंय, पण म्हणावा तसा रंग भरत नाहीये. सभागृहात एक चमत्कारिक ताण भरून राहिलाय. अशी वीसेक मिनिटं जातात. अन् अचानक ताईंना निर्मळ पाण्याचा झरा सापडतो. वाऱ्याच्या वेगानं त्या ताना घेऊ लागतात अन् गरुडाच्या सहजतेनं नि दिमाखात समेवर येतात. जगातल्या सगळ्या वेली-लता नि फुलं गाऊ लागलीयत की काय, असं वाटू लागतं. परतत्त्वाचा स्पर्श, परतत्त्वाचा स्पर्श म्हणतात ते हेच, असं मी स्वत:ला सांगतो.

किशोरीताईंचं प्रभादेवीचं घर. त्या अभिजात संगीतावर बोलताहेत. मी मुलाखतीसाठी वेळ मागितली होती. त्यांनी दिली. आधी याची चाचणी घेऊ, असं बहुधा त्यांनी ठरवलं असावं. ‘रुद्र लागले माझ्यामागे घ्याया सत्त्वपरीक्षा’ असं झालं माझं. वर्तमानपत्रीय प्रश्न त्या सटासट धुडकावून लावताहेत. त्यांना मूलभूत बोलायचंय. अन् सांगोपांग. विषय खरं तर ठाय लयीचा. परंतु त्या द्रुत गतीत बोलताहेत. ताईंचं इंग्रजी फार चांगलं. अ‍ॅक्सेंटही आहे. दिसायला तशा लहानशाच. गायला बसल्या की ‘वाढता वाढता व्योम व्यापी’!

मध्येच माई (मोगुबाई) बठकीच्या खोलीत येऊन बसल्या नि पंधराएक मिनिटांनंतर परत आतल्या खोलीत गेल्या. नंतर कार्यक्रमासंबंधी बोलायला दोघे-तिघे आले. ताईंनी त्यांना जवळजवळ फैलावरच घेतलं. ते लगबगीनं निघून गेले. ताई पुन्हा मूळ विषयाकडे वळल्या.

ताई तेव्हा मला थेट आगरकरी परंपरेतल्या वाटल्या.

आगरकर संगीतात असते तर किशोरीताईंप्रमाणेच स्वरभाषेचं अन् शब्दांपलीकडच्या व्यापक अवकाशाचं बोलले असते. घराण्याच्या मिजाशीवर त्यांनी वार केले असते. तशीच सुस्पष्ट मांडणी, तसंच आग्रही प्रतिपादन. ताई आगरकरी परंपरेतल्या- म्हणूनच तर उत्तरेतल्या एका राज्यात गात असताना तिथलं धुंदफुंद वातावरण पाहून (उपस्थितांच्या हाताला मोगऱ्याचा गजरा.. ‘वा बाईजी, क्या खूब!’ असा रगेल गजर.) तिथल्या मुख्यमंत्र्यावर जाहीरपणे कडाडल्या म्हणतात. राजे-महाराजे, सरदार-दरकदारांच्या उदार आश्रयावर कलेला बरकत येते, हा आपल्याकडचा विचार. त्यामुळे सत्ताधीशांना खडे बोल ऐकवणं हा आपल्या कलावंताचा स्वभाव नाही. आणि याच्या अगदी उलट ताईंचा स्वभाव. त्यांच्यात एक अँटिगनी दडलेली होती.

त्या काळात बऱ्याच वेळा ताईंच्या घरी गेलो. शास्त्रीय संगीतावर त्या समरसून बोलायच्या, नीट समजावून सांगायच्या. एकेकदा वाटायचं की, त्यांचं कृश शरीर एवढी ऊर्जा कशी काय पेलू शकतं? तीन-चार तास त्या ठिय्या मारून बसल्याहेत, हे फक्त गातानाच होत असणार. एरवी त्यांच्यातली उत्कटता त्यांना अजिबात स्वस्थ बसू देत नसे. ‘चांचल्य विजेचे, दर्याचे गांभीर्य’ असं हे प्रकरण आहे, हे माझ्या लक्षात येऊ लागलं. त्यांना ‘कव्हर’ करताना, वार्ताहर म्हणून त्यांच्या कारकीर्दीवर लिहिताना आपला एक बचाव पक्ष तयार असलेला बरा, असंही वाटू लागलं.

अन् नको ते झालं. एकदा खटका उडाला.

ताई एका फ्रेंच कलावंताबरोबर एनसीपीएत कार्यक्रम करणार होत्या. यानिमित्तानं त्यांच्याशी बोलावं, असं माझ्या पेपरनं ठरवलं. ताईंनी रीतसर, चोख मुलाखत दिली. परंतु त्याचवेळी दुसऱ्या एका महिला वार्ताहरालासुद्धा ‘फक्त तुझ्याकरता’ असा मुलाखतीचा वादा त्यांनी दिला होता. माझी मुलाखत अगोदर छापून आली. ती महिला पत्रकार वैतागली असणार. तिनं ताईंना फोन केला. ताईंनी उलटा फोन करून मला चांगलं सोलून काढलं. ‘बेगिन घरा यो’ (तातडीनं घरी ये), असं बजावलं.

तासाभरात मी त्यांच्या पुढय़ात उभा. त्या चिडलेल्या. समस्त भूमंडळ डळमळतंय असं क्षणभर वाटलं. त्यांचं सगळं ऐकून घेतल्यावर मी माझी बाजू मांडली : ‘तुम्ही त्या बाईंना एक्सक्लुझिव्ह मुलाखत देणार होतात तर मग मला का वेळ दिलीत? मला तसं अगोदर सांगितलं असतं तर मी यातून बाहेर पडलो असतो..’ मग मनातल्या मनात दहा मोजून म्हणालो, ‘मी माझ्या कष्टाचं खातो, दुसऱ्याचं विनाकारण ऐकून घेण्याची मला सवय नाही.’ अन् तडक बाहेर पडलो.

एकदा किशोरीताईंनी मला सुखद धक्का दिला. मी काम करत असलेल्या वृत्तसमूहाचं एक प्रतिष्ठित अर्थविषयक दैनिक होतं. त्या मंडळींना ताईंच्या गाण्याची मफील करायची होती. पेपरच्या मोठय़ा अधिकाऱ्यांना ताईंकडे घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर आली. आम्ही गेलो. ताईंनी तारीख दिली. मग आला मानधनाचा प्रश्न. त्यांनी सांगितलेला आकडा ऐकून आमचे अधिकारी गारदच झाले. त्यांची आपापसात खर्जातली खलबतं सुरू झाली. ‘एवढे परवडत नाहीत, कार्यक्रमाला तिकीट नाहीये,’ असं बरंच काही झालं. मीही त्या अधिकाऱ्यांची री ओढली. ‘उद्या सांगते,’ ताई म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही सगळे त्यांच्या घरी. त्यांनी आपलं मानधन सर्रकन् अध्र्यावर आणलं. ‘तू सांगतोयेस म्हणून कमी करत्येय,’ असं म्हणाल्या. वांद्य््रााच्या सेंट अ‍ॅण्ड्रय़ूज सभागृहात कार्यक्रम झाला. ए वन.

परवा विजयाबाई (मेहता) फोनवर बोलल्या ते खरं : ‘जशी जगली नि गायली, तशी गेली. अन्प्रेडिक्टेबल.’

नंतर सगळं झपाटय़ानं बदलत गेलं.

पेपरवाल्यांना शास्त्रीय संगीताची गोडी वाटेनाशी झाली. साहित्य, कला, तसंच संगीत नि पुस्तक परीक्षणं हे विषय आमच्याकडे एकदम वज्र्य झाले. करमणुकीचा कल्ला सुरू झाला. समाजाचंही वळण आस्ते आस्ते बदलू लागलं. धनवान (आणि म्हणून) बेदरकार असण्या-वागण्याला प्रतिष्ठा आली. सेलिब्रिटीज् वंशातले कलावंत तार्तार टोळ्यांप्रमाणे सगळीकडे धुमाकूळ घालत सुटले. ताईंचं तलवारीप्रमाणे तळपणं, त्यांचा righteous indignation हे सगळं पोलिटिकली इन्करेक्ट मानलं जाऊ लागलं. ताईंना काहीएक फरक पडला नाही. त्या मन:पूत गात होत्या. kTell me in which many ways do I love thee? अशी अभिजात संगीताची आर्जवं करत होत्या. श्रोते हे केवळ निमित्त होतं. मी ललित लिखाणाकडे वळलो. टेप नि सीडीवर ताईंचं गाणं होतंच. ‘जनी जाये पाणियासी, मागे धावे हृषिकेशी..’ ऐकताना काळजाची कालवाकालव व्हायची. आजही होते. हेच ताईंचं नि आपलं नातं.

आपल्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळणार नाहीये, असा जबर आत्मविश्वास ताईंना होता. आपली एक ‘मिथ’ तयार झालीये, हेही त्यांना ठाऊक होतं. त्यांचा संताप, त्यांचं मफिलीला उशिरा येणं अशा दंतकथा अधूनमधून कानावर यायच्या. मात्र, या सगळ्या पलीकडे आहे ते ताईंचं गाणं, हे कळणारे रसिक त्यांना मिळाले. गुणवान शिष्य लाभले. ताई एकीकडे यशाच्या शैलशिखरावर विराजमान होत्या अन् तरीही नितांत अस्वास्थ्यानं तळमळत होत्या. काही केल्या त्यांचा प्रोटेस्ट सल पडत नव्हता. गायकाची, गाण्याची प्रतिष्ठा टिकून राहावी म्हणून त्या तडतडत होत्या. त्यांच्यात एक जाळ होता. तुम्हाला-मला त्याचे कैकदा चटके बसले, हे खरं. परंतु पहिल्या पावसाप्रमाणे त्या नित्य बरसत होत्या म्हणून या देशाची माती बहरत होती, हेही खरंच की.

किशोरीताई आणि कुमारजी यांनी नेमनियमांच्या सव्यापसव्यात अडकलेलं शास्त्रीय गाणं मोकळं केलं. सगळी मांडणीच बदलली दोघांनी. घराण्याला सोन्याचा उंबरठा असतो, हे खरं; पण तो ओलांडून रानोमाळ भटकलं पाहिजे, मुक्तीचं मोल जाणलं पाहिजे, हे त्यांना कळलं होतं. ताई नि कुमारजी यांनी खऱ्या अर्थानं अभिजात संगीताला आधुनिक परिमाण दिलं. त्यांची भजनंसुद्धा संस्कृतीच्या अंगानं जातात, भागवतधर्माच्या अंगानं नाही; म्हणून ती सेक्युलर (खऱ्या अर्थानं) ठरतात. विशेष म्हणजे त्यांची भजनं सार्वजनिक उत्सवांत वाजत नाहीत, हे लक्षात घेतलं की दोघांनी काय पल्ला गाठला, ते समजतं.

सुरांचं शील जपणं या एकाच ध्यासापायी किशोरीताई जगल्या नि गायल्या. माईंसारखा गुरू त्यांना लाभला. यामुळे पायाभरणीलाच माणिकमोत्यांची रास पडली.

व्यावहारिक जगाशी त्या फटकून वागल्या. समीक्षकांना चार हात दूर ठेवलं. कवींचे, कलावंतांचे पुतळे उभारले जातात, टीकाकारांचे नाही, हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. त्यांनी गाण्याचं सौंदर्य जपलं. हे सगळं चिरकाल टिकणारं आहे.

रामनवमीला ताईंचा अंत्यविधी सरकारी इतमामात पार पडला. परंतु ना मुख्यमंत्री ताईंच्या अंतिम दर्शनाला आले, ना राज्यपाल, ना मुंबईचे महापौर. मराठी भाषा नि संस्कृतीच्या नावावर मतं मागणारे रवींद्र नाटय़ मंदिराच्या आसपासही फिरकले नाहीत. बरेचसे कलावंत अंत्यदर्शनाला आले. काहीजण टी. व्ही. वाहिन्यांवर आठवणी सांगत बसलेले दिसले. तर काही कलावंतांनी ट्विट केलं की आपलं काम संपलं, अशी सोयीस्कर समजूत करून घेतली.

‘मला हृषिकेश मुखर्जीच्या सिनेमात पुन्हा काम करायला आवडेल,’ असं एका सुपरस्टारनं एकदा वार्ताहरांना सांगितलं. झाली पंधराएक र्वष या गोष्टीला. यावर हृषिदा यांनी ‘तो मला भेटून किंवा फोन करून आपल्या मनातली इच्छा का सांगत नाही?’ असा मोठा मार्मिक प्रश्न विचारला होता. ट्विटरचं प्रकरण असं आहे. परवाचे असंख्य ट्विट्स कुणासाठी होते? लाखो लोकांसाठी? की शोकाकुल आमोणकर कुटुंबीयांसाठी?

आपण सगळे मठ्ठ की स्मार्ट? की प्रोफेशनल? की संवेदनाशून्य, क्रूर? की हे सगळं गाठोडं आपण आपखुशीनं गळ्यात अडकवलंय?

एखाद्या थोर कलावंताला शेवटचा निरोप कसा दिला जातो यावरून त्या समाजाची इयत्ता ठरत असते, हेसुद्धा आपण समजून घेत नाही. तामिळनाडूत एम. एस. सुब्बलक्ष्मी, डी. के. पट्टमळ, बालसरस्वती यांना इष्टदेवतेचा मान आहे. बंगाली माणसाला आपली भाषा, आपली गाणी प्राणाहून प्यार असतात. कर्नाटक सरकारनं गंगुबाई हनगळांना मोठय़ा सन्मानानं तिथल्या विधान परिषदेचं सदस्य केलं होतं. एखादा श्रेष्ठ, सत्त्वशील कलावंत महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर गेल्याचं गेल्या वीसेक वर्षांतलं उदाहरण माझ्या तरी माहितीत नाही. सत्ताधीशांच्या जवळचेच परिषदेवर जात राहिले. खरं तर अभिजात भारतीय संगीत महाराष्ट्रातच घडलं, बरकतीस आलं. मग आजच्या या सांस्कृतिक मरगळीचं मूळ कशात आहे? हेच प्रश्न किशोरीताई विचारत होत्या. अँटिगनीप्रमाणे त्या म्हणत होत्या- kI know what I am saying… Itls just that you donlt understand.l

गेल्या वर्षी मी विजयाबाईंच्या (मेहता) ‘बाई’ पुस्तकावर काम करत होतो. पुस्तकात किशोरीताईंचा लेख येणारेय, असं विजयाबाई म्हणाल्या. त्याप्रमाणे लेख माझ्याकडे आला. योग्य ते संस्कार करून मी तो नंदिनी बेडेकरांकडे ई-मेलवर पाठवला. तो वाचून किशोरीताईंनी मान्य केला. यानिमित्तानं दोन-तीनदा ताईंकडे माझा फोन झाला. माझं बोलणं मुख्यत: नंदिनीताईंशी व्हायचं. एकदा स्वत: ताईच फोनवर आल्या.

‘कुठं आहेस तू?’ त्यांनी विचारलं. ‘भेटायला ये,’ म्हणाल्या.

‘हो, येतो.’ मी उत्तर दिलं.

‘कधी? आत्ता येतो?.. तर ये,’ त्या पलीकडून म्हणाल्या. ‘एकत्र पुस्तक करू. तू ये.’

अन्प्रेडिक्टेबल. खरंच.

ambarishmishra03@gmail.com