|| सलील वाघ

कर्नाटकातल्या हबेलहंडीचा धांगडधिंगा माध्यमांत रगडला जात असताना जिव्या गेला. त्याची बारकी बातमी दूरदर्शनवरून दाखवली गेली हे आपल्या एकंदर सामाजिक बुद्धय़ांकाला अगदी शोभेसेच झाले. शिवाय ज्या काळात निव्वळ गिन्याचुन्यांची अनुदानऐय्याशी जोपासण्यासाठी अतोनात भुक्कड दर्जाचे गावफिनाले भरवले जातात, अशा चाबरट कालखंडात जिव्यासारखा तापसी चित्रकर्मी होऊन गेला हे उद्या कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. गेल्या शतकभरात भारतात होऊन गेलेल्या चित्रकारांमध्ये जिव्या सोमा मशे याचा समावेश अत्यंत श्रेष्ठ आणि वैशिष्टय़पूर्ण चित्रकारांमध्ये करणे आवश्यक ठरते. जिव्या ज्या आधुनिक आणि आधुनिकोत्तर कालखंडात जगला त्या आधुनिकतेचा (किंवा तथाकथित आधुनिकोत्तरतेचा) वारा त्याच्या जवळपासही फिरकला नाही, त्यामुळे त्याच्या कामाचे आकलन करून घेणे अत्यंत गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक ठरणार आहे.

sculpture, women, sculpture field,
शिल्पकर्ती!
apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….

कलाकाराला कोणताही धर्म नसतो, पण कलेला मात्र तिचा कलाधर्म असतो. कलेतून तो कलाधर्म प्रक्षेपित होतो. तत्त्वज्ञान, मिथके, कर्मकांड या तीन गोष्टी कोणत्याही धर्माचे आधारस्तंभ असतात. एखाद्दुसऱ्या सुटय़ा कलाकृतीतून कलाधर्म प्रतित होईलच असे नाही. त्याकरता कलाकाराच्या समग्र किंवा अनेक कलाकृतींचा साकल्याने विचार करावा लागतो. जिव्या आणि त्याच्या ‘वारली’ कलापरंपरेचा विचारही असा साकल्यानेच (टोटॅलिटीसकट) करावा लागतो. कलानिर्मिती ही भूकंपासारखी असते. तिचे दृश्य परिणाम जरी भूपृष्ठावर जाणवले तरी त्या भूकंपाचे विक्षोभकेंद्र दुसरीकडेच कुठेतरी असू शकते. ते भूकवचाखाली असते. कलाकृतीत दिसून येणाऱ्या कलाधर्माचे केंद्रही असेच कलाकाराच्या जीवनपरंपरांत दडलेले असते. कलाकाराला फक्त समकालीन जीवन पुरत नाही, त्याला दिक्कालातीत जीवन लागते. हे दिक्कालातीत जीवन त्याला त्याच्या परंपरा आणि त्याचे चिंतनसंघर्ष यातून मिळते.

जिव्या हा वारली चित्रकार. तो चित्र काढणे याला ‘गोष्ट लिहिणे’ किंवा ‘गोष्ट काढणे’ असे म्हणत असे. जिव्याला मराठीसुद्धा फारसे येत नव्हते. पुस्तके वाचणे, तत्त्वज्ञान वगरे तर दूरच. आधुनिक जगापासून अन् ज्ञानसाधनांपासून पूर्णपणे अलिप्त आणि दूर असलेला हा चित्रकार त्याच्या चित्रांमधून माणसाचे संपूर्ण अस्तित्व, त्याच्या जीवनातले सगळे टप्पे, त्याची लोकदैवते, कथाकहाण्या, श्रद्धा-अंधश्रद्धांचे विश्व, त्याचे भयविषय, यातुक्रिया असे सगळे चितारित राहिला. जिव्या स्वतच्याच आयुष्यात अलिप्त एकटेपणाने वावरला. जिव्याच्या चित्रांत अनेक आकार, आकृत्या आहेत. त्यांच्याविषयी त्याची स्वतची अशी खास मते होती. त्याच्या मते, विश्वात वर्तुळाची दोन टोके कधीच एकमेकांना प्रत्यक्ष मिळत (टेकत) नाहीत. ती फक्त द्विमितीत जोडली गेल्यासारखी वाटतात, पण प्रत्यक्षात अधांतरीच असतात. तो शहरी चित्रकारांचे भौमितिक सिम्रिटीचे तत्त्वही मानत नसे.

जिव्याकडे गेलो होतो तेव्हा एका मोठय़ा लांब-रुंद चित्रावर त्याचे काम चालू होते. टिपिकल चौकाचे असावे तसे चित्र होते. वारुळ, झाड, जीवजंतू, अनेक इष्टदैवते आणि भयपात्रे यांनी खचाखच भरलेल्या एका जवळपास पूर्ण होत आलेल्या त्या कॅनव्हासवर वरच्या डाव्या कोपऱ्यात शिवाचे चित्र होते. त्यावर थोडी अजून रिकामी जागा शिल्लक होती. जिव्याला विचारले, ‘‘ही जागा का रिकामी?’’ तो म्हणाला, ‘‘तिथं येणारे ना अजून. तिथं वादळ येणारे. वादळाचं चित्रं येणारे. महादेवाच्या आधी वादळ होतं. मग त्यानंतर महादेव आला.’’ हे विश्वरचनाशास्त्र आहे! निसर्गघटना, भावभावना आणि यातुक्रिया यांच्याबरोबरीने ‘कॉस्मॉलॉजी’चा विचार जिव्याच्या चित्रात आला आहे. कोणत्याही औपचारिक ज्ञानसाधनेची वानवा असूनही जिव्यात हे कुठून आलं? त्याच्या कलाधर्मात विश्वरचनाशास्त्राचा विचार कुठे उगम पावला? जिव्याही गर्दीत मिसळला नाही. स्वतला एकटा ठेवी. त्याच्याबद्दल सांगावे तितके किस्से कमी आहेत.

वारलींची चित्रकला त्यांच्या परंपरेतून आलेली आहे. ती आदिभारतीय (‘अवैदिक’ शब्दप्रयोग टाळलाय) किंवा वेदपूर्व दैवतांची परंपरा आहे. म्हणून ती शिवपूजकांची परंपरा आहे. पण तिच्या शिखरावर एका वादळाचा म्हणजेच अमूर्ताचा किंवा निर्मितीप्रक्रियेचा, सृजनशीलतेचा वावर आहे. कदाचित ती महास्फोटाची (बिगबँग) कल्पना असेल. कदाचित या विश्वरचनाशास्त्रात तिच्या अत्युच्चस्थानी ईश्वराचा अभावही असेल. ती परंपरा तो त्याच्या एकांतातून ऐकण्याचा, समजून घेण्याचा, तिच्यात समरस होण्याचा प्रयत्न करतो. समाजाच्या इतिहासातून सामूहिक नेणिवेचे झरे सतत पाझरत असतात. कलाकार त्याचा वेध घ्यायचा आणि त्याच्याशी स्वतला जोडून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आत्यंतिक बहुदैवतावादी यातुप्रधान असा सभोवताल आणि जवळपास निरीश्वरवादी किंवा एकेश्वरी विश्वरचनाशास्त्र असा विरोधाभास पेलताना तो घायाळही होत असेल. कदाचित तो आणि त्याचा सगळा जीवनरस हा अशा अत्यंत यातुप्रधान, अतिमूर्त श्रद्धा-अंधश्रद्धांच्या गराडय़ात, या आदिवैदिक निरीश्वरवादी तत्त्वज्ञानाला जोपासताना जे विरोधाभास / तणाव निर्माण होतात त्या विरोधाभासाशी होणाऱ्या आत्मसंघर्षांला तोंड देताना खर्ची पडतही असेल. कोणत्याही बा साधनांशिवाय आपल्या स्मृतिकोशातून, बालपणातून, ज्या भूगोलात आणि ज्या परंपरेत तो जन्माला आला त्या सामूहिक नेणिवेचा माग काढत जिव्या ‘गोष्टी-गाणी लिहित राहिला’! जिव्या स्वतचीच नेणीव संकेतमुक्त करून कॅनव्हासवर संकेतबद्ध करत राहिला. आपण ती पाहायची आणि आपल्या बाजूला संकेतमुक्त करायची. हीच कला किंवा कविता असते. जिव्याने कोणत्याही तथाकथित प्रशिक्षणाशिवाय त्याच्या ‘गोष्टी लिहिण्यातून’ एका जीवनपरंपरेला संकेतमुक्त आणि संकेतबद्ध करणे ही ‘क्रिप्टॉलॉजी’ आहे. यालाच काव्य म्हणतात. फरक फक्त माध्यमाचा!

गेल्या अर्धशतकाहून जास्त काळ आपल्या कामाच्या माध्यमातून जिव्या सोमा मशेने एका स्वतंत्र कलाधर्माची निर्मिती केलेली आहे. तो आणि त्याची नष्टप्राय परंपरा ही आपल्या जगाच्या जीववैविध्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. तथाकथित पुढारलेले समाज अन्य अभावग्रस्त समाजांना हतबल, हतोत्साहित करून किंवा गर पद्धतीने प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या वैशिष्टय़ांसकट नष्ट करतात, तसे या कलेबाबतही होते आहे. ‘जीववैविध्याला मान्यता देत जीववैविध्याचा स्वीकार’ हाच खरा उदारमतवाद आणि त्यातच खरी प्रागतिकता आहे. सुसंस्कृत असणे म्हणजेच जीववैविध्याचा स्वीकार करणे हे असते आणि भविष्यात मानवजातीचे हेच मुख्य तत्त्वज्ञानही असले पाहिजे. जिव्या स्वतच्या अवकाशात इतका घट्ट आणि खोलवर बेभान झालेला होता की तो आपोआपच वैश्विक झालेला आहे, वैश्विक जाणिवांशी जोडला गेलेला आहे. स्वतला सतत असे बेभान ठेवणे, म्हणजेच पाश्चात्त्यांच्या भाषेत ‘सॉलिटय़ुड’मध्ये ठेवणे, हे सोपे काम नाही. ते जिव्याला साधले. म्हणून तो इतका मोठा. आपल्या काळात जन्माला आलेला जिव्या सोमा मशे हा अनेक अर्थाने इतका श्रेष्ठ कलाधर्मी होता, की आपण त्याच्या काळात जन्माला आलो हे आपलं भाग्य!

saleelwagh@gmail.com