कविवर्य सुरेश भट यांच्या चरित्रात्मक आठवणींचे  ‘गझलसम्राट सुरेश भट आणि..’ हे पुस्तक त्यांचे शिष्य व गझलकार प्रदीप निफाडकर यांनी लिहिले आहे. ते येत्या ११ जानेवारी रोजी नंदिनी पब्लिकेशन हाऊसतर्फे पुण्यात प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील एक प्रकरण..

नागपूरला स्थिरता आल्यावर व संसार सुरू झाल्यावर सुरेश भट यांचा १९७४ ला दुसरा काव्यसंग्रह आला- ‘रंग माझा वेगळा’! तो मौज प्रकाशनने प्रकाशित केला. त्याला भारतरत्न लता मंगेशकर व महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे यांच्या प्रस्तावना होत्या. हे कसे झाले? तर याला कारणीभूत हृदयनाथ मंगेशकर. हृदयनाथ व सुरेश भट यांची दोस्ती होण्याचे कारण हृदयनाथ यांचे वाचन. त्यांनी ‘रूपगंधा’ वाचून भटांना प्रेमाची पावती आणि दाद दिली. हृदयनाथ यांना वेगळ्या चाली बांधायला आवडते व भट यांची कविताही वेगळी होती. कारण ती गुणगुणतच प्रकट होत होती. तिला चाल लावणे तसे सोपे. पण शब्दघाट व आशयसंपन्नता यांत ती वेगळी असल्याने तिला वेगळ्या चाली बांधणे हे आव्हानात्मक काम होते. भट नेहमीच गुणगुणत कविता लिहीत. तशाच सादर करीत. त्याला उर्दूत ‘तरन्नुम में पेश करना’ म्हणतात. ही सवय त्यांना उर्दू मुशायरे ऐकून झाली असे म्हणता येईल. पण ते फार नंतर. तत्पूर्वी म्हणजे त्यांनी महाविद्यालयीन काळात मुशायरे ऐकले होते. त्याआधी शालेय जीवनात त्यांना संगीताची गोडी आईने लावली होती. त्या स्वत: हार्मोनिअम वाजवत. त्यांनी मैदानी खेळ खेळण्यास जाऊ न शकणाऱ्या आपल्या लाडक्या मुलाला बाजाची पेटी आणली होती. भट यांचे वडील- श्रीधरपंतही संगीतप्रेमी होते. त्यांनी एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन (चावीवाला) आणला होताच; मुलाची आवड पाहून आठवडय़ातून ते एक तरी रेकॉर्ड विकत आणत. ही संगीतआवड त्यांना (सुरेश भट यांना)  शाळेच्या बँडपथकात घेऊन गेली. तिथे ते बासरी वाजवीत. संगीतातील  गती पाहून श्रीधरपंतांनी सुरेशला रीतसर संगीत शिक्षण द्यायचे ठरविले आणि प्रल्हादबुवा घरी येऊ लागले. आजारी असताना सुरेश भट तासन् तास अंथरुणावर बासरी वाजवत बसलेले असायचे. गुलाबराव महाराज यांचा ‘गानसोपान’ गं्रथ असो की संगीतभास्कर भातखंडेकृत ‘संगीत खंड’ असो; सारे ग्रंथ सुरेश भट यांनी त्याच काळात वाचले होते. नव्हे, ‘गानसोपान’ची पारायणे केली होती. १९५२ ला त्यांना तबला शिकावासा वाटल्यावर तोही ते शिकले. पुढे ते ढोलकीही वाजवीत.

thane lok sabha marathi news, rajan vichare latest marathi news
“राजन विचारे यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन केल्याने एम.के. मढवी यांना अटक”, सुषमा अंधारे यांची टीका
jitendra awhad replied to sadabhau khot
सदाभाऊ खोतांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “लटकवलेली चावी जो नेतो….”
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

पंडित ओंकारनाथ ठाकूर यांना साथसंगत करणारे व्हायोलिनवादक य. वा. भट हे सुरेश भट यांचे एक काका होते. ते म्हणत, ‘सुरेश राष्ट्रीय पातळीवरचा गायक झाला असता.’ या काकांचे कौतुक समजू शकते; पण हृदयनाथ मंगेशकरांनीही २० फेब्रुवारी १९८४ रोजी अमरावतीत त्यांचे असेच कौतुक केले होते. कवीचे शब्द व संगीतकाराचे स्वर असा कार्यक्रम होता. भट त्यांच्या तब्येतीत गात होते. हृदयनाथ पेटीवर त्यांना साथ देत होते. गाणे संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. हृदयनाथ म्हणाले, ‘‘भटसाहेब इतक्या चांगल्या आवाजात, तालात, सुरात गातात हे माहीत असते तर मीच त्यांना साथसंगत केली असती.’’ पुढे सुरेश भट एखादी नवी कविता ऐकवत तेव्हा हृदयनाथ म्हणत, ‘‘तू गाऊ नकोस, मला चाल सुचत नाही.’’ आणि ते खरेच होते. असे हिंदीतील गीतकार-कवी प्रदीप यांच्याबाबतीतही घडायचे. ‘चल अकेला..’ गाण्याची चाल ते जेव्हा ओ. पी. नय्यर यांना ऐकवू लागले तेव्हा नय्यर यांनी कवितेचा कागद घेऊन प्रदीप यांना घरी पाठविल्याची नोंद आहे. कवीची चाल संगीतकाराच्या डोक्यात बसते याचे हे दुसरे उदाहरण. यामुळेच भटांचे ‘गीतगंगेच्या तटावर ये तुझी घेऊन घागर’ हे गीत संगीतबद्ध होऊ शकले नाही. भटांनी ते गाऊन ऐकविले व हृदयनाथ यांच्या डोक्यातून ती चालच जाईना. भटांचे  हे संगीतज्ञान मी अनुभवले आहे.

गझल हा प्रकार न समजून घेताच अनेकजण त्याला भावगीतासारख्या चाली लावायचा प्रयत्न करीत. सुरेश भट यांना त्याचा अतिशय संताप येई. त्यांचे म्हणणे होते की, गझल हा शब्दप्रधान गायकीचा प्रकार आहे. तुम्ही तो नीट समजून घ्या, मग गा. पुण्यातील शरद करमरकर एकदा भट यांना त्यांच्या गझलांना लावलेल्या चाली ऐकवायला आले. मी, भट व ते असे तिघेच तेव्हा होतो. त्यांनी पेटी उघडून फक्त बोटे फिरवताच भट म्हणाले, ‘‘आसावरी रागात चाल बांधली आहे का?’’  मी  व करमरकर उडालोच! करमकरांनी फक्त मतला ऐकवल्यावर भट म्हणाले, ‘‘आता दुसऱ्या गझलेची चाल बघू.’’ करमरकरांनी दुसऱ्या चालीसाठी पेटीवर बोटे फिरवली तर भट म्हणाले, ‘‘यमन का?’’  करमरकर हादरलेच. त्यांनी मतला ऐकवल्यावर भटांनी पेटी बंद करायला लावली. करमरकर पेटीवरून हात काढून हाताची घडी करून बसले. भट म्हणाले, ‘‘नाही, पेटी बंद करा.’’ त्यांनी पेटीच्या क्लिपा लावल्या. भट म्हणाले, ‘‘अहो, पेटीला कव्हर घालून इकडे बसा.’’ त्यांनी तसे केल्यावर भट म्हणाले, ‘‘करमरकर, तुम्ही  काय करता आहात? एखादी सुंदर, घमघमती बिर्याणीची प्लेट तुमच्यासमोर आली आहे आणि तुम्ही तिच्यावर गोमूत्र शिंपडून खाता आहात.’’ करमरकर काय ते समजले. असाच किस्सा  सुधाकर कदम या गायकाच्या बाबतीत झाला होता. त्यांनी ‘कळते मला अरे हा माझा वसंत नाही’ या गझलेला चाल लावली होती. ती ऐकून भट म्हणाले, ‘‘तुम्ही घरंदाज बाईला तमाशात नाचवले.’’ गद्यातही भटांच्या उपमा किती छान होत्या. ‘बिर्याणी- गोमूत्र’ काय किंवा  ‘घरंदाज बाई व तमाशा’ काय- सुंदरच! भट विरोधकांच्या बाबतीत बोलतानाही छान उपमा देत. उदाहरणार्थ, ‘मी तर त्याची कोशिंबीर करेन!’ त्यांना संगीताची इतकी आवड होती, की त्यासाठी त्या काळात दुबईवरून त्यांनी मोठा डेक मागवला होता. पेटारे भरून कॅसेट्स त्यांच्याकडे असत. त्या पत्र्याच्या पेटय़ा आजही माझ्या डोळ्यांसमोर आहेत.

हिंदीतील प्रसिद्ध शायर दुष्यंतकुमार यांनी एका गझलेत म्हटले आहे-

‘एक बाजू उखड गया जबसे

और जादा वजन उठाता हूँ’

भटांचा एक पाय कमजोर झाल्यावर त्यांनी व्यायामावर जोर देऊन शरीर मजबूत बनवले. याचा उपयोग त्यांना गाण्यातही झाला. तासन् तास मैफली करण्यातही झाला. ते दंड-बैठका काढतच; पण डबलबारवर १०० ते १५० डिप्स मारत. त्यामुळे इतकी शक्ती पायात आली की ते सायकल चालवू लागले. वडिलांनी त्यांना मिलर कंपनीचा डायनोमा असलेली रॅले कंपनीची सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी दिली होती. १९६५ मध्ये जेव्हा अमरावती रेल्वेस्थानकावर उड्डाणपूल झाला तेव्हा अमरावतीतील  सायकल रिक्षावाले त्यावर उतरून ती चढण चढत. पण सुरेश भट आपला भाऊ दिलीप याला डबलसीट घेऊन एका दमात ती चढण चढत. ते हुतूतू, व्हॉलीबॉलही खेळत. ते आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप (शोभादर्शक), पेरिस्कोपही बनवीत. काचा कुटून पतंगाचा मांजा बनविण्यात ते वाकबगार होते. सुरेश भट यांना गुलेर (बेचक किंवा गलोर) बनविता येई. त्यांचा नेम अचूक असे. ते पाहून श्रीधरपंतांनी त्यांच्यासाठी खास अमेरिकन स्लिंग शॉट बंदूक आणली होती. त्याने भट चिमणी, कबुतर घायाळ करीत. पुढे ते भालाफेकही करीत. भालाफेकीचा सराव घराजवळच्या निंबाच्या झाडावर चाले; तर तलवारबाजीचा प्रा. बाबा मोटे यांच्याबरोबर. एका घावात दोन तुकडे करण्यात सुरेश भट ‘एक्सपर्ट’ होते, ते खरोखरच.