‘संशोधन विश्वात’ हे जोसेफ तुस्कानो यांचे छोटेखानी पुस्तक विज्ञान क्षेत्रातील संशोधन विश्वाची सफर घडवून आणणारे आहे. अवघ्या सत्तर पानांत तुस्कानो यांनी विज्ञान संशोधनाविषयी मौलिक माहिती दिली आहे. अस्तित्वात असलेली गोष्ट शोधणे आणि अस्तित्वात असलेल्या गोष्टींचा वापर करून नवीन काही उपयुक्त असे निर्माण करणे असे शोधाचे दोन प्रकार. या दोन्ही प्रकारच्या शोध-संशोधनामुळे मानवी जीवन अधिकाधिक सुकर झाले आणि होत आहे. संशोधन संस्थांची भूमिका यात महत्त्वाची असते. अशा काही मोजक्या भारतीय संशोधन संस्थांची ओळख या पुस्तकात करून दिली आहे. टी. आय. एफ. आर., बी. ए. आर. सी., हाफकिन इन्स्टिटय़ूट, आयुका, नेहरू तारांगण, बिट्रा, सस्मिरा, सर्कोट अशा विविध संशोधन संस्थांचे कार्य आणि वाटचालीची माहिती त्यातून मिळते. त्याबरोबरच विश्लेषणाची अचूकता ठरवणारी नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी आणि दर्जा-परीक्षणाधारे प्रयोगशाळांना मानांकन देणारी नॅशनल अ‍ॅक्रिडेटेशन बोर्ड फॉर लॅबोरेटरीज् या दिल्लीस्थित राष्ट्रीय संस्थांविषयीही यात वाचायला मिळते. शिवाय मोजक्या शास्त्रज्ञांविषयीची थोडक्यात अनवट माहितीचा भाग आणि पुस्तकाच्या उत्तरार्धातील विज्ञान नवलाई, विविध भयगंड आणि विज्ञानविषयक विनोद असे आणखी तीन विभागही रंजक माहितीपर आहेत.

  • ‘संशोधन विश्वात’- जोसेफ तुस्कानो,
  • विद्या विकास पब्लिशर्स,
  • पृष्ठे- ७०, मूल्य- ६५ रुपये.