एका व्यक्तीचा संदेश, मतं, भूमिका, दृष्टिकोन दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या तरी माध्यमाची गरज असते. पूर्वी ‘वायरफूल’चा जमाना होता; आता ‘वायरलेस’चा! म्हणजे पूर्वी संपर्क आणि संबंध बांधून ठेवणाऱ्या वायर्सच्या गुंडाळ्या आज गुंतागुंतीची अडगळ वाटू लागल्या आहेत. वायर्स नाहीशा झाल्या आणि त्याबरोबर वायरने जोडले गेलेले आत्मीय संबंधही- असेही काहींचे मानणे आहे. परंतु काहींना हे वायरचे फक्त स्वरूप बदलले; प्रयोजन तेच- असेही वाटते. आजही आपल्यापैकी बरेचजण लॅंडलाइनचा फोन लावून बोलण्याला प्राधान्य देतात, तर बहुतांश लोकांची संपर्क व दृष्टीकक्षा ही त्यांच्या मोबाइलच्या स्क्रीनमध्ये वसलेली (की अडकलेली?) दिसून येते. काळाबरोबर बदलणं हे गरजेचं आणि क्रमप्राप्तही. परंतु आज आवडत्या व्यक्तीचा मोबाइलवर आलेला मेसेज वाचताना जितका आनंद होतो, तेवढीच किंवा त्याहून जास्त मजा वाटते ती हाती लिहिलेल्या पत्रातून. शब्द आणि मजकूर तोच; पण त्या पत्राचा, त्यातील हस्ताक्षराचा अनुभव आणि उन्हात भटकून, दमून ते पत्र आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या पोस्टमनभाऊंना पाणी देऊन मग ते आपल्या हातात घेऊन वाचण्याचा आनंद काही औरच. पण हल्ली आपण या प्रक्रियेत बऱ्याच खाणाखुसण्या काढतो. हाती लिहिण्यासाठी लागणारा वेळ, एकटाकी लिहिता येण्याच्या शैलीचा अभाव (त्यात ‘कट’, ‘कॉपी’, ‘पेस्ट’, ‘डिलीट’ नसतं!), पर्यावरणाच्या दृष्टीने कागद वापरणे म्हणजे वृक्ष तोडणे हे समीकरण (ते खरंही आहे!), पोस्टात जाऊन पत्र टाकण्याचे कष्ट आणि ते पोहोचण्यासाठी लागणारा वेळ यापेक्षा एक ‘क्लिक्’ केले की टेक्स्ट मेसेज/ ई-मेल पोहोचतो हल्ली! मग त्यात व्यक्तिगत भावनिक ऊब आणि ओलावा नसला तरी त्यात काय मोठंसं! काहींना हे वावगं वाटेल. असेलही. परंतु असं वाटण्याचं कारण आज ‘ऑनलाइन’ हा शब्द आपल्या वैचारिक, भावनिक व वर्तन डिक्शनरीत इतका अग्रेसर झाला आहे, की त्याबरोबर येणारे शब्द- fast (जलद), easy (सोपे), convenient (सोयीचे) हेही या डिक्शनरीत आपली पाने राखून आहेत. या गोष्टी अती सवयीच्या झाल्याने अंगवळणी पडल्या आहेत. इंटरनेटचे विशाल विश्व बऱ्याच जणांना हक्काचं, विश्वासाचं, आत्मीयतेचं आणि जीवाभावाचं वाटतं. विचारवंतांनी या विश्वाला ‘व्हच्र्युअल वर्ल्ड अँड व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ मानले आहे. इंटरनेटचा वापर हा जसा सोयीचा, माहिती व ज्ञानात भर घालणारा, नवी दालनं (नवे संबंध व नव्या संधींची) खुली करणारा, त्वरित संवाद साधण्यास साहाय्य करणारा, जगाला जोडणारा व जवळ आणणारा आहे, तसाच बऱ्याच जणांसाठी ती एक पळवाट आहे, आसक्तीचे केंद्र आहे असे काही संशोधकांचे मानणे आहे.
ही आसक्ती आणि त्याद्वारे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे इंटरनेटद्वारे जगाशी जोडले जाणे हे अयोग्य आहे आणि ते लागलीच त्यागावे व दुष्परिणाम टाळावेत, असे म्हणणे म्हणजेही टोकाची भूमिका होय. परंतु ही आसक्ती म्हणजे काय, ती कशी ओळखावी, आणि तिच्या आहारी न जाण्यासाठी काय करावे, याची चर्चा होणं महत्त्वाचं आहे.
या प्रवृत्तीचे कारण हे, की बरेच लोक दैनंदिन तणावपूर्ण आयुष्याशी झगडत जगत असतात आणि त्यातून बऱ्याचदा कोषात जातात. या कोषात इंटरनेटचे भव्य विश्व दडलेले असू शकते. हे विश्व ‘सत्य’ नाही हे माहीत असूनही माणूस त्यात प्रवेश करतो. ‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’च्या या विश्वाला आपलेसे करतो. वास्तव विश्वाच्या मानाने या व्हच्र्युअल जगात त्याला अधिक प्रमाणात नियंत्रणक्षमता प्रस्थापित करता येते, अनुभवता येते असे बरेच जण मानतात. त्यामुळे खऱ्या विश्वात आपल्या नियंत्रणात ठेवता येणाऱ्या गोष्टींपेक्षा जास्त प्रमाणात या व्हच्र्युअल विश्वातल्या गोष्टी असतात, हा त्यांचा अनुभव असतो. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी, विचार करण्यासाठी वा तो पक्का करण्यासाठी कोषात जाणे उपयुक्त ठरू शकते. पण कोषात जाऊन जे साध्य करायचे, ते साध्य करताच कोषाच्या बाहेर येणेही गरजेचे! पण कोषातील या विश्वाचे आकर्षण, ओढ, कोषाबाहेरच्या जगाचा तिटकारा, त्याबद्दलची अनास्था, असहायता, नाखुशी व असमाधान यामुळे माणूस हे व्हच्र्युअल विश्व आपलेसे करतो. ही पळवाट राजमार्ग म्हणून निवडतो. असे काही आपल्या बाबतीत घडले असल्यास स्वत:ला विचारू या, की ही निवड आपण नेमक्या कोणत्या कारणामुळे केली? हा मार्ग निवडून आपण दुसऱ्या कशापासून पळ काढतोय का? कोणत्या गोष्टी आपण आधी महत्त्वाच्या मानत होतो, त्यातून आनंद मिळवत होतो; ज्या आता टाळतो आहोत! (तो वेळ आता व्हच्र्युअल जगात व्यतीत करत असल्याने!) हा मार्ग चालून आपण नक्की कोठे पोहोचतो आहोत? की कोठे पोहोचण्यापेक्षा कशापासून तरी पळ काढणे, हे आपल्याला जास्त महत्त्वाचे वाटते? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला विचार करण्यास प्रोत्साहित करतील. आपण इंटरनेटवर व्यतीत करत असलेला वेळ तसेच इतर वैयक्तिक बाबी आणि नातेसंबंधांमध्ये गुंतवत असलेला वेळ यांचे नियोजन कसे करतो, या प्रश्नाचे उत्तर व्हच्र्युअल जगाच्या आहारी जाण्याच्या प्रवृत्तीला नियंत्रणात आणण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
आपण कसे असावे, आपल्या भोवतालचे जग कसे असावे, याबद्दलच्या कल्पनाविलासातून लहान मुले आपले विश्व रंगवत असतात. तर सद्य:स्थितीत काय व कसा बदल होईल, आणि तो घडला तर आयुष्य कसे बदलेल, यावर प्रौढांचा कल्पनाविलास आधारित असतो. प्रत्यक्ष आयुष्यात जे बदल घडवून आणणे कठीण, कष्टमय व वेळखाऊ वाटतात, ते व्हच्र्युअल विश्वात सहज प्राप्य होतील असे वाटते. उदा. प्रत्यक्षातील आपल्या प्रतिमेत बदल घडवून आणणे अवघड असते. परंतु ऑनलाइन प्रतिमेची निवड करून अन्य लोक आपल्याला कोणत्या रूपात पाहतील/ इतरांनी आपल्याला कोणत्या रूपात पाहावे, याची निवड व्हच्र्युअल विश्वात करणे सहज शक्य होते. ‘आपण अतिशय खुशीत आहोत, समाधान कसे ओसंडून वाहते आहे, आपण कसे जग फिरतोय, सामाजिक विषयांवर सहिष्णू भूमिका बाळगून आहोत, फॅशनचे करंट ट्रेंड्स आत्मसात करतो आहोत, मित्र व कुटुंबात लाडके आहोत, हे इतरांना दर्शवण्यासाठी, पटवून देण्यासाठी प्रयत्न करून आपले रूप-स्वरूप तसे मांडण्यासाठी बरेचजण तसे फोटो, सेल्फी, स्टेटस आणि पोस्ट ठेवतात. या विश्वात ते इतके रमतात, की खऱ्या आयुष्यातील एखादा अत्यंत आनंदी क्षण सर्वार्थानं अनुभवण्यापेक्षा त्याचा फोटो अपलोड करण्याचीच घाई त्यांना जास्त! आपण तो क्षण किती ‘लाइक’ करतो यापेक्षा इतर बघ्यांकडून फोटोला किती ‘लाइक्स’ मिळतात याकडे जास्त लक्ष! ‘लाइक्स’ मिळाल्या तरच तो क्षण मोलाचा असं त्यांना वाटत असावं! म्हणजे इतरांच्या स्वीकारावर आपल्या ‘स्व’ला आपण स्वीकारणं अवलंबून ठेवण्यासारखंच नाही का हे?! म्हणजे ‘असण्या’पेक्षा ‘दर्शवण्या’लाच जास्त महत्त्व. कोणीतरी जणू सक्ती केल्यासारखे आपण या इंटरनेटच्या व्हच्र्युअल विश्वात वावरतो. आपला दिवस उजाडतो तो मोबाइलच्या गजराने आणि मावळतो तो सर्वाना गुड नाइटचे टेक्स्ट मेसेजेस, चंद्र-ताऱ्यांचे फोटो पाठवून. म्हणजे आजूबाजूच्या जगाशी जोडलं जाण्यासाठी, त्या जगातील लोकांसारखाच मीही एक हे दर्शवण्यासाठी आपण या माध्यमाची कास धरतो. कुतूहलापासून सुरू झालेली ही प्रक्रिया व्यसन कधी बनते, हे कळतच नाही. बरेच लोक याला व्यसन मानतच नाहीत. त्यामुळे या व्यसनास ‘स्वाभाविक जीवनशैली’ असे गोंडस नाव देऊन त्याचे अपरिहार्य अस्तित्व गृहीत धरतात. यात कधी कधी कौटुंबिक, आत्मीय नात्यांपेक्षा तांत्रिकरीत्या जोडल्या गेलेल्या नात्यांना अधिक वेळ व प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे आपले लक्ष व ऊर्जा त्यात जास्त खर्च होत असल्याने खरीखुरी आत्मीय नाती गोत्यात येताहेत का, हे जाणून घ्यायला आपण विसरतो. या संवाद-माध्यमापायी एकेकाळी महत्त्व असलेल्या व इतरांच्या कौतुकास पात्र ठरणाऱ्या आपल्या लेखनशैलीचेही तीन तेरा वाजताना दिसतात. शॉर्टकट संवाद करण्याकडे अधिक कल होतो.
हे खरं आहे, की बऱ्याचदा आपल्याला प्रत्यक्षात एखादी गोष्ट खंबीरपणे, धैर्याने, स्पष्टपणे इतरांना सांगणे/ ऐकणे कठीण वाटते, ती गोष्ट सांगण्या/ ऐकण्यासाठी हे माध्यम उपयुक्त ठरते. परंतु अशा वेळी दोन्ही व्यक्तींची लेखनशैली प्रगल्भ नसल्यास, आपल्याला काय वाटते आहे हे जसेच्या तसे लिहिणे न जमल्यास, तसेच जे लिहिले आहे ते वाचणाऱ्याच्या आकलनक्षमतेनुसार त्याला नीट समजले नसेल, किंवा त्यात तफावत असेल तर गैरसमज होण्याचा संभवही असतो. कधी कधी मथितार्थच लक्षात येत नाही आणि देहबोलीचे कंगोरेही व्यक्तीच्या ध्यानातून, निरीक्षणातून निसटून जातात. किंबहुना, ते प्रत्यक्षात कधी कधी दिसतच नाहीत! याच जोडीला सायबर क्राइमचा राक्षसही आपले जाळे पसरवत आहे, हे आणखीन एका चिंतेचे, भयाचे कारण!
इंटरनेट (तांत्रिक माध्यम) हे एक अद्भुत अस्त्र आहे. मानवी बुद्धीतून साकार झालेला एक विलक्षण आविष्कार आहे. त्याचा योग्य तो वापर आणि आदर केला गेला पाहिजे यात दुमत नाही. परंतु हे न विसरता- की हे माध्यम आपल्या सोयीसाठी बनवलं गेलं आहे. इंटरनेटवर व्यतीत केलेला वेळ आणि कुटुंब व जीवलगांबरोबर गुंतवलेला वेळ यांत नेहमी समतोल राखला जायला हवा. पण कधी कधी या सहज समजू शकणाऱ्या सोप्या गोष्टीच नेमक्या गृहीत धरल्या जाऊन राहून जातात. कारण ई-मेल्सची देवाणघेवाण करणे आणि कुटुंबाबरोबर एकत्रितपणे जेवणाचा आस्वाद घेणे, यांत फरक आहे. एखाद्याच्या खळखळून हसण्याला केवळ एखादे LOL पुरेसा पर्याय ठरू शकतो का? आपल्या सहवासाची गरज भासत असलेल्या जीवलगाला सांत्वनपर रडका Ematicon पाठवणे पुरेसे, साजेसे आणि (सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे) आत्मिक बंध जोडणारा आहे का, याचा आपण विचार करायचा आहे. नाही का?!
डॉ. केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

donald trump rally shooting trump safe after rally shooting Trump assassination attempt
डोनाल्ड ट्रम्प हल्ल्यातून बचावले
What is Next of kin rule
Next Of Kin नियम काय आहे? लष्करातील या नियमात सुधारणा करण्यासाठी का होतेय मागणी?
How to Reduce Underarms Fats Exercise
काखेजवळील फॅट्स, दंडाखालील चरबी कमी करण्याचे सोपे व्यायाम वाचा; डॉ. मेहतांचा सल्ला वापरून स्लिव्हलेस घाला बिनधास्त
How Japan is set to make millions of vending machines obsolete
पैसे टाकल्यावर वस्तू देणाऱ्या मशीन्स जपानमध्ये चर्चेत का आल्या आहेत?
Which is the clause for unnatural cruelty to animals
प्राण्यांवरील अनैसर्गिक अत्याचारांसाठी कलम कोणते?
Loksatta editorial SEBI issues show case notice to Hindenburg in case of financial malpractice on Adani group
अग्रलेख: नोटिशीचे नक्राश्रू!
Loksatta kutuhal Artificial Intelligence for Anomaly Detection in Financial Transactions
कुतूहल: वित्तव्यवहारांत विसंगती शोधक कृत्रिम बुद्धिमत्ता
Car Tips
कारचे ब्रेक लावताना क्लच का दाबू नये तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या यामागील खरं कारण