स्वानंद किरकिरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरणदानं आम्हाला गणित शिकवलं, पण याबरोबर बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या. टय़ुशनचे दोन तास अन् टय़ुशन व्यतिरिक्तचे २२ तास आम्ही जास्तीत जास्त किरणदाच्या घरात कसं राहायला मिळेल याच जुगाडामध्ये असायचो..

परवा बोलता बोलता मला माझा एक मित्र म्हणाला, ‘‘मला माझ्या १०-१२ वर्षांच्या मुलासाठी एक मेन्टॉर हवा आहे. मुलांशी त्यांच्या भाषेत बोलणारा, त्यांचे प्रॉब्लेम्स सोडवणारा.. त्यांना मोटिव्हेट करणारा.’’ दुसरा मित्र म्हणाला, ‘‘मला माहीत आहे असा एक इसम. पण तो थोडा खर्चीक आहे. ताशी अमुक अमुक रुपये घेतो वगैरे.. आईवडील आपआपल्या कामात खूप व्यस्त असतात. मुलांवरचा ताण खूप वाढतो. शाळा, अभ्यासाचा ताण, घर, मित्र, आणि आता त्यावर इंटरनेट.. त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी असा कुणीतरी मेन्टॉर असलाच पाहिजे.’’ हे ऐकत असताना माझं मन मला ३०-४० वर्ष मागे घेऊन गेलं. इंटरनेट नसेल, पण हेच सगळे प्रॉब्लेम्स मलापण तर होते. तो एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्त कुटुंब पद्धतीकडील वाटचालीचा काळ होता, आईवडील खूप कष्ट करत होते. अभ्यास व्यवस्थित होत नव्हता, पण आम्हाला नाही लागला कोणी मेन्टॉर.. हे वाक्य तोंडावर आलंच होतं, पण मग एकदम किरणदा फाटकची आठवण आली. किरण फाटक त्याला आम्ही किरणदा म्हणत असू..

हो, किरणदाच होता आमचा मेन्टॉर. महाग.. नाही नाही महाग नाही, तो फुकट मेन्टॉरिंग करायचा.. का? फुकट का? माझ्या मित्रांनी मला विचारलं, ‘‘श्रीमंत होता का?’’ मी म्हटलं, ‘‘हो.’’ पैशांनी श्रीमंत नव्हता, पण मनाने खूप खूप श्रीमंत होता, अन् तो काळ मनाच्या श्रीमंतीचाच होता. इन्दौरच्या जुन्या भागात एक आगळी वेगळी वस्ती होती, आहे- रामबाग. रामबागेत बरेच मराठी लोक पूर्वापार राहत असत. आम्ही रामबागेला लागून काहीशा मॉडर्न अशा गणेश कॉलनीत राहायला आलो होतो. रामबाग व त्याच्या जवळपास खूप वेगवेगळय़ा आर्थिक विषमतेचे लोक राहत असत. गेटेड कम्युनिटी किंवा सोसायटीज् नव्हत्या. एकदा का मुलगा घराबाहेर पडला की कुणाशी मैत्री करेल, अभ्यास करणाऱ्या मुलांच्या घोळक्यात सामील होईल की कुठल्या गुंडांच्या, याचा काही नेम नव्हता.

हेही वाचा : अभिनय ही गांभीर्यानं करण्याची बाब!

माझे काही मित्र आयआयटीमध्ये गेले, तर काहींनी आपले वाडिलोपार्जित व्यवसाय सांभाळले. कुणी स्टेशनरीच्या दुकानात बसला, कुणी प्लास्टिकचा कारखाना सांभाळला, कुणी आपला नळीदार कोळशाचा पारंपरिक व्यवसायदेखील निवडला. कोळशाची वखार होती त्यांची. आता नळीदार कोळसा काय असतो ते मी काही समजवत बसत नाही, पण मला नळीदार कोळशात कोळसा आणि लाकडी भुसा यांच्या मिश्रणाचं प्रमाण कसं असतं याचा बऱ्यापैकी अंदाज आहे! थँक्स टू रामबाग!

एकंदरीत शिक्षणाच्या दृष्टीनेसुद्धा रामबागेतल्या पोरांचे रिझल्ट्स काही खूप छान लागत नसत. मॅट्रिकच्या परीक्षेत २-४ वर्ष लावून पास होणाऱ्या बऱ्याच महान व्यक्ती रामबागेच्या गल्ली-बोळात क्रिकेट खेळताना भेटत. खूप करिअर वगैरेचा ताण रामबागेत आलाच नव्हता आणि ही गोष्ट माझ्या मध्यमवर्गीय आईसाठी सगळय़ात जास्त काळजीची होती. त्यात माझी शाळा सकाळी सात ते अकरा आणि या वेळेला आई-बाबा ऑफिसात, म्हणजे दिवसभर मुलगा कुठे हुंदडेल याचा काही भरवसा नाही.. त्याच वेळेस किरणदानं आमचं मेन्टॉरिंग कधी आपल्या हातात घेतलं ते कळलंसुद्धा नाही! मी आणि माझा बालमित्र योगी आम्हा दोघांची जणू जबाबदारीच त्यानं उचलून धरली होती. इन्दौरात गाणं शिकवणारे एक प्रसिद्ध गायक अन् शिक्षक होते माधवराव जोशी- त्यांची बहीण उषाताई. किरणदा उषाताईंचा मोठा मुलगा. अन् धाकटा मुलगा तुषार! रामबागेतल्या दोन खोल्यांच्या घरात हे कुटुंब राहत असे. किरणदाचे वडील इन्दौरबाहेर कुठेतरी कामाला होते म्हणून ते जवळजवळ घरी नसायचेच. उषाताई शाळेत शिक्षिका होत्या, पण त्या माधवराव जोशींच्या गायन शाळेत गाणं शिकवायच्या.

माझी आई आणि बाबाही याच गायन शाळेत भेटले. उषाताई गायिका असल्या तरी किरणदा अन् तुषारला गाण्याचं काहीच अंग नव्हतं. किरणदाचे आवडीचे विषय होते फिजिक्स, गणित, क्रिकेट आणि अमिताभ बच्चन! वयाने तो आमच्या पेक्षा ४-५ वर्षांनीच मोठा होता, पण त्याचं वाचन खूप होतं. त्या काळी टाइम्स ऑफ इंडिया इंदूरात एक दिवस उशिरा येत असे. रविवारचा टाइम्स ऑफ इंडिया हमखास किरणदाच्या घरी वाचायला मिळायचा. स्पोर्टस्ची काही इंग्रजी मासिकंही त्याच्या घरी असायची. त्याच्या अभ्यासाच्या टेबलवर एक गावस्करचं तर एक अमिताभ बच्चनचं पोस्टर असे. अगदी समोर.. किरणदाचं बोलणं, वागणं, चालणं सगळं डिट्टो बच्चन! गणिताची एखादी संज्ञा किंवा फिजिक्सचा एखादा नियम किरण हा अमिताभ बच्चनसारखं बोलत शिकवायचा! ‘फॉर एव्हरी अॅ क्शन देअर इज इन इक्वल अॅ ण्ड आपोझिट रिअॅणक्शन. समझा? ऑय?’ किरणदा हा बच्चनची मिमिक्री करत नसे, पण त्याच्या छोटय़ा छोटय़ा लकबी त्यानं अशा बारकाईनं आत्मसात केल्या होत्या की सतत आपण बच्चनबरोबर बसतोय याचा भास होत असे.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: वास्तव मांडण्याची कला..

किरणदा आम्हाला ट्रिगनॉमेट्री शिकवत असे तेव्हा मी आणि योगी त्याच्या साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा बोलण्यामागचा बच्चन नोटीस करत असू. किरणदानं आम्हाला गणित शिकवलं, पण याबरोबर बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या. टय़ुशनचे दोन तास अन् टय़ुशनव्यतिरिक्तचे २२ तास आम्ही जास्तीत जास्त किरणदाच्या घरात कसं राहायला मिळेल याच जुगाडामध्ये असायचो. किरणदाच्या टेपरेकॉर्डवर पहिल्यांदा जगजीतसिंग ऐकला, ‘सुरसंगम’ नावाच्या चित्रपटात पं. राजन-साजन मिश्रच्या आवाजातलं ‘आये सूर के पंछी आये’ची पारायणं केली. ‘सीने में जलन आँखों में तूफमन सा क्यों है’.. सुरेश वाडकरांच्या आवाजाची ओळख त्यानं करून दिली. गल्लीत शॉर्ट पिच क्रिकेट जरी खेळलो तरी खेळाबद्दलचे बारकावे- पूर्ण कॉम्पिटेटिव स्पिरिटनं खेळणं, झुंज देणं, बॉल स्विंग करणं, डांबरी रस्त्यावर डाईव्ह मारून कॅच पकडण्याचं तंत्र हे सगळं किरणदा शिकवायचा. त्याचा आवडता शब्द होता ‘का बे गमण्या’. ‘गमणा’ हा काहीसा बावळट असा अर्थ असलेला शब्द महाराष्ट्रात प्रचलित आहे का माहीत नाही, पण इन्दौरात खूप प्रसिद्ध होता.

किरणदा अभ्यासात खूप हुशार, तो इंजिनीयिरगचा अभ्यास करत होता आणि तुषारला अभ्यासात अगदी थोडाही रस नव्हता. त्याचं सगळं चित्त समोरच्या भोईटय़ांच्या ऑटो गॅरेजमध्ये असे. स्पार्क प्लग, कारबोरेटर, क्लच, एक्सलरेटर डिफेक्ट वगैरे त्याचं विश्व झालं होतं. कपडे व हात ऑइलनं काळे असायचे अन् सतत पेट्रोलचा वास. पुढे तो खूप चांगला मॅकेनिक झाला आणि त्यानं स्वत:चं गॅरेजही काढलं.
आमचा खरा हिरो किरणदाच होता..

एकदा आमच्या गल्लीचा एक गुंड मला त्रास देत होता- ‘‘त्या मुलीला माझं लव लेटर दे, नाही तर मारीन.’’ अशी धमकी.. माझ्या मनात खूप भीती बसली होती त्याची. या सगळय़ा गोष्टी घरी सांगायच्या असतात वगैरे मला माहीत नव्हतं, पण मी त्याला इतका घाबरायचो की मी मुख्य रस्ता सोडून मागच्या स्मशानाच्या रस्त्यावरून किरणदाच्या घरी जायचो. किरणदाच्या हे लक्षात आलं. मला त्यानं त्याचं कारण विचारलं. मी काही बोललो नाही. तो मला बाहेर पोहे खायला घेऊन गेला. मी घाबरत घाबरत त्याला खरं कारण सांगितलं, तर एवढासा किरणदा सरळ त्या उंच मुलासमोर उभा राहिला अन् त्याला दमसुद्धा दिला.. अन् आश्चर्य म्हणजे तो मुलगासुद्धा त्याच्या समोर मान हलवत होता. तेव्हा मला जाणवलं की सगळे लोक किरणदाचा आदर करतात.

किरणदा आम्हाला पिक्चर बघायला घेऊन जायचा. क्रिकेटच्या मॅचेस, सायकलवर बसून सहज फेरफटका वगैरेही मारून आणायचा. स्वत: आईकडे जाऊन परवानगी घेऊन यायचा- ‘‘निलाताई, स्वानंद अन् योगीला पिक्चरला घेऊन जातोय.’’ अन् किरणदा बरोबर आहे म्हटल्यावर आई निर्धास्त होऊन आम्हाला पाठवत असे.. सिंगल थिएटर्सचा तो काळ अन् अमिताभ बच्चनच्या सिनेमांना तर तुफान गर्दी असायची. पण अमिताभ बच्चनचा सिनेमा फस्र्ट डे बघितलाच पाहिजे. मी गर्दी बघून म्हटलं, ‘‘किरणदा, आपण उद्या येऊ.’’ तर तो म्हणाला, ‘‘च्याक! पिक्चर तर आजच पाहू. उद्यापासून प्री इंजिनीयिरगची तयारी सुरू करायची आहे. बऱ्याच दिवसांचं प्लॅनिंग आहे. पिक्चर तो आजही देखेंगे,’’ असं म्हणत तो तिकिटाच्या प्रचंड गर्दीत नाहीसा झाला. रांग लावणे वगैरे सभ्य प्रकार इन्दौरच्या जनतेला कधी कळलेच नाहीत. ‘सव्‍‌र्हायवल ऑफ द फिटेस्ट’ या तंत्रावर सर्व कारभार चालतो, पिक्चरचं तिकीट असो वा बस ट्रेनमध्ये जागा मिळवणं, त्या गर्दीला मॅनेज करण्यासाठी थिएटरचे लोक टायरच्या आतली टय़ुब काढून त्यांनी मारत, पण किरणदा द रियल हिरो, ‘द फिटेस्ट’. मुठीत तिकीटं घेऊन बाहेर आला होता. घामानं थबथबलेला, केस विस्कटलेले, कपडे फाटलेले, पण चेहऱ्यावर विजयी मुद्रा. ‘दोस्ताना’ सिनेमा तशाच अवस्थेत आम्ही पाहिला. पडद्यावर झिनत अमानने जितके कमी कपडे घातले होते त्याहून कमी किरणदाच्या अंगावर उरले होते.

हेही वाचा : जाणिवा उसवणारं आत्मकथन..

किरणदाचं इंजिनीयिरगमध्ये अॅडमिशन झालं. रामबागेतला मुलगा इंजिनीयिरगमध्ये जातो हा एक विक्रमच होता. नवे कपडे शिवले होते त्यानं आणि मोठय़ा उमेदीनं तो पहिला दिवस कॉलेजमध्ये गेला. संध्याकाळी पाहातो तो किरणदा थरथर कापत घरात बसलेला, कळलं खूप रॅगिंग झालं होतं. लोखंडी सळय़ांनी मुलांना मारलं होतं. किरणदा आणि त्याचे काही मित्र पहिल्या माळय़ावरच्या खिडकीतून बाहेर उडी टाकून धावत घरी आले होते. आमच्या हिरोच्या डोळय़ात भीती आणि निराशा दोन्ही दिसत होतं.. पण आमचीही परीक्षा होती म्हणून तो तसाच आम्हाला शिकवायला बसला.

इंजिनीयर बनून चांगली नोकरी करून त्या घराला दोन खोल्यांतून बाहेर काढण्याचं स्वप्न त्यांनं लहानपणापासून जोपासलं होतं. दुसऱ्या दिवशी उषाताई म्हणाल्या, ‘‘किरण, खूप त्रास होत असेल तर नको जाऊस कॉलेजात, कुठेतरी आणखी अॅ डमिशन घेऊ.’’ किरण म्हणाला, ‘‘इंजिनीयर तर बनायचंच आहे. मार खावा लागला तर मार खाऊ, पण इंजिनीयर तो बनेंगे.’’ किरणदा अँग्री यंग मॅनसारखा वळून निघाला अन् मी आणि योगीनं म्हटलं, ‘‘बच्चन!’’

मी आणि योगी अभ्यासात काही विशेष पराक्रम करू शकलो नाही. खचला होता किरणदा, पण काही बोलला नाही. म्हणाला, ‘‘साल्यांनो, काहीतरी बरं करा रे आयुष्यात. नाव नका खराब करू.’’ किरणदानं खूप दिलं होतं आम्हाला- प्रेरणा, समुपदेशन.. त्या वाढत्या वयात प्रेम आणि हार्टब्रेक याच्याशी कसं डील करावं सगळं सगळं किरणदानं शिकवलं. त्यानं आम्हाला इतकं का प्रेम दिलं माहीत नाही, आपलं-परकं हा भेद जागतिकीकरणाबरोबर वाढला असं माझं मत आहे. पुढे किरणदा इंजिनीयिरग करायला उज्जैनला गेला अन् आमचं भेटणं कमी कमी होत गेलं. आमचेही रस्ते बदलले. देश, काळ सगळंच बदललं, जागतिकीकरण झालं अन् आला सिनेमाचा नवा हिरो शाहरुख खान.. त्याचा ‘दिलवाले दुल्हनिया’ खूप गाजला, किरणदाला खूप वर्षांनी भेटलो अन् विचारलं, ‘‘कसा वाटतो शाहरुखचा दिलवालेमधला राज.’’ किरणदा म्हणाला, ‘‘हिरो कुठे आहे तो. बापाच्या पैशांवर जगतो. अन् हिरोईनच्या बापाची परवानगी घेऊन हिरोईनला घेऊन जायचंय याला, हिरोईनचा विचारच नाही, समजा, नाही म्हणाला तिचा बाप तर ती काय व्हिलनशी लग्न करेल. हट्! बच्चन असायचा ना तर कुणाची पर्वा न करता डायरेक्ट घेऊन पळवायचा हिरोईनला.’’ पुढे जाऊन मला कळलं की समाजात आणि सिनेमात आलेला हा बदल किती महत्त्वाचा होता. पण किरणदा किती सोप्या शब्दांत हे सांगून गेला होता.

हेही वाचा : निमित्त: डबल डेकर ट्रेक

पहिल्यांदा अमिताभ बच्चन सरांना भेटलो तर त्यांची लकब बघून म्हटलं, ‘‘किरणदा..’’ योगीला फोन केला म्हटलं, ‘‘बच्चनसाहेब मी लिहिलेले संवाद म्हणताहेत, किरणदाला कळवू चल. त्याला किती आनंद होईल.’’ हे ऐकून योगी म्हणाला, ‘‘तेरे को फोन करनेही वाला था, किरण कुछ समय पहले अचानक गया. उस के पेट में दुखने लगा. डॉक्टर के यहाँ ले जाने तक तो..’’

माझं डोकं सुन्नं झालं. मागे बच्चनसाहेब मी लिहिलेली कविता म्हणत होते अन् माझ्या डोळय़ांसमोर माझा मेन्टॉर तरंगत होता. किरणदासारखं बनण्यासाठी काय काय करत नसू आम्ही. त्याच्यासारखा भांग पाडणं, शर्ट इन करणं, अक्षर काढणं.. आजही माझा इंग्रजीचा ‘आर’ अन् ‘एस’ किरणदा सारखाच होतो.
हा मेन्टॉर आम्हाला काही कारण नसताना हात धरून चालायला शिकवून गेला.
‘‘किरणदा, जो किया ठीक ही किया है, तेरा नाम नही खराब किया.. थँक यू..’’

swanandkirkire04@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of a mentor kiran da css
First published on: 04-02-2024 at 00:09 IST