कंपनीने काढलेल्या रेकॉर्ड्स आणि गायक-गायिकांच्या प्रत्यक्ष मैफली यामुळे श्रोत्यांनी भावगीत आपलेसे केले. उत्तम कविता हाती आली की प्रतिभावान संगीतकाराला उत्तम चाल सूचत असे. कवितेमधील भावना व आशय आपल्या गायनातून कोण पोहोचवेल अशी अवस्था येते. ते गाणे आवडू लागते व श्रोते स्वत:चे असे चित्र मनात रंगवायला सुरुवात करतात. भावगीतामुळे आपण स्वत:चे वेगळे चित्र मनात निर्माण करू शकतो. एकच भावगीत आणि हजारो श्रोत्यांच्या मनातील वेगवेगळे चित्र ही कल्पना किती रम्य आहे! भावगीत ऐकल्यावर कोणत्याही पडद्यावरील वा मंचावरील प्रसंग डोळ्यासमोर येत नाही. तुझे चित्र वेगळे, माझे चित्र वेगळे. तुझी आठवण वेगळी व हे गीत ऐकताना माझी आठवण वेगळी. हजारोंच्या हृदयातील भावनांचा एक मोठा कॅनव्हास तयार होत असेल आणि तो सुद्धा एका गाण्यामुळे असेल तर भावगीताची विलक्षण ताकद लक्षात येते. हे यश कवितेचे, गाण्याच्या चालीचे व गायनातील स्वराचे असते. हे सर्व प्रतिभावंत एकत्र आले की उत्तम निर्मिती होणारच. तेव्हाच रसिक त्या शब्दांवर प्रेम करतात, गायनातील मधुर आवाजाचा आनंद घेतात व ते गाणे चक्क गाऊ लागतात.

young woman suicide koparkhairane, navi Mumbai rape marathi news
युवतीच्या आत्महत्येस कारण असलेल्या दोन युवकांच्या विरोधात सहा महिन्यांनी गुन्हा दाखल 
crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
jalgaon, raver lok sabha seat, rohini khadse, eknath khadse, facebook page, remove father s image, ncp sharad pawar, bjp, maharashtra politics, lok sabha 2024, election 2024, marathi news,
रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा

गीतकार ग. दि. माडगूळकर, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि गायिका मालती पांडे.. असे शब्द कानावर पडताक्षणी एक प्रेमगीत आठवतेच आणि लगेच ऐकावेसे वाटते. ‘लपविलास तू हिरवा चाफा..’ हेच ते अजरामर गीत.

गायिका मालती पांडे यांची गाणी आठवायला सुरुवात झाली की हे गीत अग्रक्रमाने येते. हे संपूर्ण गीत श्रोत्यांना मुखोद्गत आहे हे वेगळे सांगायला नको! गीतातला एक शब्द जरी सांगताना चुकला तरी ऐकणारी मंडळी हक्काने व आनंदाने ‘बरोबर शब्द’ कोणता ते सांगतात. हा शब्द असा नाही तर असा आहे, असे आवर्जून सांगतात. लगेच ती ओळ गाऊनसुद्धा दाखवतात. यालाच शब्दावरील प्रेम, चालीवरील प्रेम व गायिकेच्या गायनावरील प्रेम म्हणतात.

लपविलास तू हिरवा चाफा

सुगंध त्याचा छपेल का

प्रीत लपवुनी लपेल का?

 

जवळ मने पण दूर शरीरे

नयन लाजरे, चेहरे हसरे

लपविलेस तू जाणून सारे

रंग गालिचा छपेल का?

 

क्षणात हसणे, क्षणात रुसणे

उन्हात पाऊस, पुढे चांदणे

हे प्रणयाचे देणे-घेणे

घडल्यावाचुन चुकेल का?

 

पुरे बहाणे गंभीर होणे

चोरा, तुझिया मनी चांदणे

चोरहि जाणे, चंद्रहि जाणे

केली चोरी छपेल का?

‘लपाछपी’ हा शब्द तसा लहानपणापासून आपल्याला माहीत असलेला आहे. त्यातील ‘लपणे’ आणि ‘छपणे’ या दोन कृतींचे कवितेतील शब्दात रूपांतर होणे व त्याला स्वरबद्ध करून गीत तयार होणे, या दोन्ही विलक्षण आनंदाच्या घटना आहेत. विशेष म्हणजे ‘लपेल का’ व ‘छपेल का’ हे शब्द एका मधुर प्रेममय भावनेसाठी आले आहेत. प्रीतीमधील उत्कटता हीच गोड भावना शब्दाशब्दांत दिसते. प्रीतीच्या उत्कट लपालपीमध्ये माडगूळकरांच्या शब्दांनी ही भावना उंचीवर नेली आहे. ‘लपविलेस तू जाणून सारे’ यातला ‘जाणून’ हा शब्द दोन अर्थ सांगतो. एक ‘जाणून’ म्हणजे माहिती असून या अर्थाने व दुसरा अर्थ जाणूनबुजून असा असेल काय, असा प्रश्न पडतो. ‘उन्हात पाऊस, पुढे चांदणे’ हे खरोखर प्रणयाचे देणे-घेणे, यात शंकेला जागाच नाही. तिसऱ्या अंतऱ्यात चोर, चंद्र व चांदणे यांना गोडीगुलाबीच्या कटातील आरोपी, साक्षीदार या भूमिका दिल्या आहेत. चाफा लपविण्याची ही गोड चोरी आपल्याला शब्दांत अडकवते. ग. दि. माडगूळकरांचे शब्द म्हटल्यावर वेगळे काय होणार?

संगीतकार प्रभाकर जोग सांगतात, ‘चाल लावताना कोणता राग वगैरे असं काही डोळ्यासमोर नसते. म्हणजे एखादी चाल बांधताना ‘मारूबिहाग’ रागाचा आधार घेतलाय आणि अंतऱ्यात कोमल गंधार घेतलाय.. असं काही नसते. गीतातली भावना लक्षात आली की चाल लगेच सुचते.’

मालती पांडे या भावपूर्ण व सुरेल गात असत. गीताच्या अर्थाला धरून त्यांचे गाणे असे. फार वर्षांपूर्वीच्या दूरदर्शनवरील एका मुलाखतीत गायिका मालती पांडे म्हणाल्या- ‘प्रीत लपवुनी लपेल का? हा अनुभव तुमचा, माझा, प्रत्येकाचा आहे. प्रभाकर जोगांच्या चाली या श्रेष्ठ गायक संगीतकार सुधीर फडके यांचे शिष्यत्व जाणवून देणाऱ्या आहेत.’

या गीतात आरंभीचे शब्द गायल्यावर लगेच एका अप्रतिम आलापाची जागा आहे. चाफा हा शब्द उच्चारताना ‘चा’ व ‘फा’ या अक्षरांमध्ये छान सांगीतिक जागा केल्या आहेत. तीनही अंतरे वेगवेगळ्या सुरांवर सुरू होतात. त्या सुरांवर सोडण्यासाठी छोटेखानी, पण उत्तम म्युझिक पीसेस आहेत. अंतऱ्यामध्ये ‘उन्हात पाऊस’ व ‘चोर तुझिया’ या ओळींनंतरची बासरी विशेष दाद देण्यासारखी. ‘प्रीत लपवुनी लपेल का’ ही थांबण्याची जागा ऐकताना तालाची गंमत विशेष आहे. तबला वादकांच्या भाषेत त्या जागेवर ‘तीन थाप पिकअप कट’ आहे. ती गाण्यातली आकर्षणाची जागा ठरली आहे. श्रोत्यांना हवीहवीशी वाटणारी अशी ती जागा आहे.

संगीतकार प्रभाकर जोग आपल्या आत्मकथनात या ‘चाफा’ गीताविषयी छान आठवण सांगतात. ते लिहितात, ‘माझी पत्नी कुसुम ही विठ्ठलराव सरदेशमुखांकडे गाणे शिकत असे. गाण्यात बऱ्यापैकी प्रगती झाल्यावर ती आकाशवाणीच्याऑडिशनमध्ये उत्तीर्ण झाली. जेव्हा आकाशवाणीवर गाण्याचा पहिला कार्यक्रम आला तेव्हा म्हणाली, ‘मला पहिलं गाणं तुमचंच हवं.’ त्या वेळी माझ्याकडे गाणे तयार नव्हते, शब्दही नव्हते. माझा मित्र जयसिंग सावंतकडे एक सुरेख गीत मी वाचलं होतं. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ हे ते गीत. कवी होते गदिमा. मुळात ते गीत ‘लाखाची गोष्ट’ चित्रपटाकरता लिहिलं होतं. पण तो प्रसंगच पटकथेतून काढून टाकल्यामुळे ते गीत बाजूला पडले. जयसिंग सावंत हा राजाभाऊ परांजपे यांच्याकडे दिग्दर्शन विभागात उमेदवारी करत होता. त्याने ते गाणे स्वत:जवळ ठेवले होते म्हणून मला मिळाले. माडगूळकरांचे भावपूर्ण व बोलके शब्द यामुळे लगेचच चाल लागली. माझी पत्नी कुसुम हिने आकाशवाणीवर ही चाल गायली आणि श्रोत्यांची या गीताला जबरदस्त दाद मिळाली. ही दाद लक्षात घेऊन आकाशवाणीने तेच गीत मालती पांडे या गुणी, गोड गळ्याच्या गायिकेकडून ‘मासगीत’ या कार्यक्रमासाठी मला ध्वनिमुद्रित करायला सांगितले. ‘ए’ ग्रेड गायिका असल्याने हे गीत मालती पांडे यांच्या स्वरात रेकॉर्ड झाले. या मासगीताचंसुद्धा प्रचंड स्वागत झालं. या ‘हिरव्या चाफ्याचा सुगंध’ एच.एम.व्ही. कोलंबिया या ग्रामोफोन कंपनीपर्यंत पोहोचला. अधिकारी श्री. रेळे माझ्याकडे आले व ‘हिरवा चाफा’ ध्वनिमुद्रित करण्याची इच्छा व्यक्त केली. रेकॉर्डिग झाले व गाणे घराघरांत पोहोचले. माडगूळकरांनी पहिल्यांदा हे गीत ऐकले व म्हणाले, ‘‘अरे जोगा, मी टाकून दिलेल्या गाण्याचं तू सोनं की रे केलंस.’’ जोगसाहेबांनी फोनवर बोलता बोलता या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे अगदी मागच्या पंधरवडय़ात त्यांनी पुणे आकाशवाणीसाठी दोन गाणी रेकॉर्ड केली.

हे ‘हिरव्या चाफ्या’चे गीत जोगसाहेबांकडून व्हायोलिनवर ऐकले तेव्हासुद्धा गाण्यातील प्रत्येक शब्द आपल्याला ऐकू येतो, समजतो. प्रत्येक वादक हा अर्धा गायक असायलाच हवा, हे त्यांचे मत आहे. त्यांचे चाहते भेटले की त्यांना खूप आनंद होतो.

‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीताची लोकप्रियता काही खासच आहे. अगदी काल परवाच्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला सुद्धा या गाण्याची आठवण झाली, हे नक्की!

विनायक जोशी – vinayakpjoshi@yahoo.com