मोदींना सत्तेची हाव-सोनिया
रुरकी-कुलु:नरेंद्र मोदी काँग्रेसवर पुराव्याशिवाय आरोप करत असून, गुजरातमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती का केली नाही याचे उत्तर त्यांनी द्याव,े अशी विचारणा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली.
आपल्या सरकारची गैरकृत्ये मोदी झाकू पाहात आहेत काय, असा सवालही सोनियांनी येथील जाहीर सभेत विचारत त्यांना टीकेचे लक्ष्य केले. आमच्यावर टीका करत असताना एक बोट त्यांच्याकडे रोखलेले आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे. काँग्रेसने नागरिकांना भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी माहितीचा अधिकार दिल्याची आठवण सोनियांनी रुरकी येथील सभेत करून दिली. कुलु येथील सभेतही सोनियांनी मोदींवरच टीका केली. प्रचारात विनाकारण शहीद कुटुंबांचे नाव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सोनियांनी केला. पंतप्रधानपदाच्या खुर्चीसाठी मोदी काहीही करू शकतात, अशी टीका त्यांनी केली. कारगिलमध्ये शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांचा उल्लेख करत ये दिल मांगे मोअर, असे मोदी म्हणाल्याचे सोनियांनी सांगत, मोदींना फक्त खुर्ची हवी आहे, त्यासाठी ते शहिदांचा अवमान करतात, असा आरोप सोनियांनी केला. पंतप्रधान झाल्याच्या थाटात मोदी बोलत आहेत. मात्र अजून निकाल लागलेला नाही हे मोदींनी लक्षात ठेवावे, असे सांगताच उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.
प्रक्षोभक विधानांमुळे आसाममध्ये तणाव वाढला – ममतांचा आरोप
कोलकाता:आसाममधील जातीय हिंसाचाराबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर उच्च पदाची अपेक्षा बाळगणाऱ्या काही नेत्यांनी प्रक्षोभक विधाने केल्याने तणाव वाढल्याची टीका करत मोदींवर निशाणा साधला.नेत्यांनी बोलताना संयम वापरावा आणि मृतांबाबत राजकारण करू नये, असा सल्ला दिला. या घटनेचे राजकीयीकरण करू नका, असा सल्ला त्यांनी राजकीय पक्षांना दिला. या घटनेने धक्का बसल्याचे ममतांनी सांगितले. ही घटना दुर्दैवी आहे, आसाम आमच्या लगतच आहे. यामध्ये विस्थापित झालेल्यांना मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.