१९७७ मध्ये जनता लाटेतही महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचा मोदी लाटेत मात्र पूर्णत: पाडाव झाला. राज्यातील ४८ पैकी ४० ते ४३ जागा यापूर्वी जिंकणाऱ्या काँग्रेसला जेमतेम दोन जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे ‘आदर्श’ घोटाळ्यातील अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध दर्शविला होता, पण त्यांनीच काँग्रेसची राज्यात लाज राखली. राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत कधीही पराभूत न झालेल्या नंदुरबार आणि सांगली या दोन पारंपरिक जागाही काँग्रेसला गमवाव्या लागल्या. काँग्रेसची पार छी-थू झाली. गेल्या वेळी सर्वाधिक १७ जागा जिंकणारा पक्ष राज्यात चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकरिता काँग्रेससाठी हा धोक्याचा इशाराच ठरला आहे.
राज्याने आतापर्यंत काँग्रेसला नेहमीच साथ दिली. १९७७ मध्ये देशात अन्यत्र काँग्रेसचा पार सफाया झाला असताना राज्यात काँग्रेसचे सर्वाधिक २० खासदार निवडून आले होते. शरद पवार यांनी राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडल्यावरही काँग्रेसने राज्यात आपले वर्चस्व कायम राखले होते. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर काँग्रेसच्या विरोधात देशभर वातावरण तापले होते. महाराष्ट्रात मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेवर काँग्रेसचा भर होता. पण देशातील एकूणच विरोधी वातावरणाचा फटका महाराष्ट्रातही बसला. गेल्या वेळी मनसेच्या प्रभावामुळे मुंबई, ठाणे पट्टय़ात जागा जिंकणे काँग्रेसला शक्य झाले होते. यंदा मनसे काँग्रेसच्या मदतीला आला नाही. विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात यंदा यशाची पक्षाला आशा होती. मराठवाडय़ातील नांदेड आणि हिंगोलीचा अपवाद वगळता काँग्रेसचा कोठेच निभाव लागला नाही. नंदुरबार, सांगली, लातूरसह काही मतदारसंघांमध्ये मित्र पक्ष राष्ट्रवादीने अपशकुन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसच्या गोटातून झाला होता. विरोधकांचे आव्हान लक्षात घेऊन दोन्ही पक्षांमध्ये यंदा तसा बऱ्यापैकी समन्वय राहिला होता. तरीही दोघांचाही पार धुव्वा उडाला.
सर्वसामान्य जनता आणि पक्षाचे नेते तसेच कार्यकर्त्यांमध्ये अंतर निर्माण झाले. राज्यात १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसबद्दल जनतेत नाराजी निर्माण झाली. विशेषत: राज्य सरकारच्या कारभाराबद्दल सर्वसामान्यांमध्ये नाराजीची भावना असून ही भावना निकालातून प्रकट झाली. उदाहरण द्यायचे झाल्यास नंदुरबार आणि सांगलीचे देता येईल. या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा कधीच पराभव झाला नव्हता. लागोपाठ नऊ वेळा निवडून येऊनही माणिकराव गावित मतदारसंघात विकास कामे करण्यात अपयशी ठरले. आदिवासी पट्टय़ात अजूनही विकासाची गंगा पोहचू शकली नाही. याच मुद्दय़ावर भाजपने प्रचारात जोर दिला होता. सांगलीमध्येही माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची पुण्याई असली तरी त्यांचे नातू प्रतीक पाटील दोनदा निवडून येऊन किंवा केंद्रीय राज्यमंत्री असतानाही मतदारसंघात प्रभाव पाडू शकले नाहीत. मतदारांनी याच मुद्दय़ावर या दोन्ही मतदारसंघांमध्ये बदलाला प्राधान्य दिलेले दिसते. सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापूरमध्ये कधीच पराभव होत नाही, असे बोलले जायचे. शिंदे यांच्या पत्नीचा पराभव झाला, पण सोलापूरकर आपल्याला कधी नाकारत नाहीत, असे शिंदे म्हणायचे. केंद्रीय मंत्री असूनही मतदारसंघात विकासाची कामे करण्यात अपयशी ठरल्यानेच शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला. लातूर, नंदुरबार, सांगलीसारखी काँग्रेसची वर्षांनुवर्षांची संस्थाने खालसा झाली.
अशोक चव्हाण यांची उमेदवार सर्वात शेवटी जाहीर झाली. म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीच्या आदल्या रात्री त्यांना उमेदवारी देण्यात आली. ‘आदर्श’ घोटाळ्यामुळे चव्हाण यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षात दोन मतप्रवाह होते. विशेषत: मुख्यमंत्री चव्हाण हे अशोकरावांना उमेदवारी देण्याच्या विरोधात होते. नरेंद्र मोदी यांची नांदेडमध्ये मोठी जाहीर सभा होऊनही अशोकराव बचावले. अन्य नेत्यांच्या विरोधात काहीच कारवाई होत नसताना अशोकरावांना लक्ष्य व्हावे लागल्याची भावना नांदेडमध्ये झाली. ही सहानुभूती अशोकरावांसाठी फायद्याची ठरली. नांदेडला लागून असलेल्या हिंगोलीत अ. भा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव यांनी निसटता विजय मिळविला. मराठवाडय़ाने काँग्रेसची लाज राखली.
काँग्रेससाठी खरे आव्हान आता विधानसभा निवडणुकांचे आहे. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांनाही परस्परांची गरज भासणार आहे. आघाडी सरकारबद्दल जनमत तेवढे चांगले नाही. नेतृत्वबदल करून नव्या चेहऱ्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचा प्रयोग पक्षश्रेष्ठींकडून होण्याची शक्यता वाटत नाही. नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त केला जाईल. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंत विविध समाजघटकांवर सवलतींचा पाऊस पाडून मतदारांना खूश करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असू शकतो. पण पराभवाच्या मानसिकतेत असलेल्या काँग्रेसला जनता लागोपाठ चौथ्यांदा थारा देण्याची शक्यता फारच कमी आहे. एकूणच काँग्रेससाठी महाराष्ट्र आता कठीण आहे.