ढाणकी येथील आश्रमशाळेतील सात वर्ष वयाच्या प्रदीप संदीप शेळके या मुलाचा खून केल्याची कबुली शाळेतील आरोपी विद्यार्थ्यांने दिली. वारंवार चिडवल्यामुळे प्रदीपची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली.

एका कोरडया  पाझर तलावात प्रदीपचा मृतदह आढळल्याने  खळबळ निर्माण झाली होती. माजी आमदार उत्तम इंगळे यांची उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे लक्ष्मी बाई राघोजी इंगळे शिक्षण प्रसारक मंडळाची खासगी शासन अनुदानित आश्रमशाळा आहे. या शाळेच्या वसतिगृहात असलेल्या प्रदीप संदीप शेळके हा मुलगा १२ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. तो ढाणकी पासून १४ किमी अंतरावर असलेल्या पार्डी येथील येथील राहणारा होता. रविवारी दुपारी शाळेच्या मदानावर खेळतांना दिसला होता मात्र त्यांनतर अचानक कसा काय बेपत्ता झाला हे समजले नाही. ही बाब वसतिगृह अधीक्षकांच्या गणेश वानखेडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर साऱ्या परिसरात त्या मुलाचा शोध घेणे सुरु होते. त्याच्या आईवडिलांनाही  प्रदीप बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यांनी देखील त्याचा खूप शोध घेतला मात्र तो सापडला नसल्याने अखेर बिटरगाव पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यात आली.

ठाणेदार हनुमंत गायकवाड, सहाय्यक ठाणेदार रंगनाथ जगताप आणि त्यांच्या पोलीस चमूने सारा परिसर िपजून काढला. उमरखेडचे भाजपचे माजी आमदार उत्तम इंगळे हेही घटनास्थळी पोहोचले होते. तेव्हा प्रदीपचा मृतदेह बिटरगांव जवळील दत्त संस्थान परिसरातील कोरडया पाझर तलावात असल्याचे दिसून आल्याने पोलीस प्रशासनही हादरुन गेले. तपासात शाळेतील नववीच्या एका विद्यार्थ्यांने  प्रदीपची हत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.