शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना घसघशीत विद्यावेतन दरवाढ करणाऱ्या राज्य सरकारने आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मात्र बोळवण करण्यात धन्यता मानल्याने संताप व्यक्त होत आहे. विद्यावेतनवाढ न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.
राज्यात चार आयुर्वेदिक महाविद्यालये आहेत. नांदेड, नागपूर, मुंबई, उस्मानाबाद येथे कार्यरत असलेल्या या महाविद्यालयात शेकडो विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व आयुर्वेदिक महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना समान विद्यावेतन मिळत होते. सन २००९ मध्ये राज्य सरकारने तसेच सुस्पष्ट आदेश निर्गमित केले होते. पण आता ऑगस्ट २०१३ मध्ये राज्य सरकारने आयुर्वेदिक महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा शासन आदेश जारी केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात घसघशीत वाढ करताना आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना डावलण्यात आले. वास्तविक, आयुर्वेदिक महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थीही समान काम करीत असताना किंबहुना त्या तुलनेत अधिक काम करीत असताना त्यांच्या विद्यावेतनवाढीचा निर्णय मात्र अजूनही घेण्यात आला नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांप्रमाणेच विद्यावेतन मिळावे, यासाठी आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा सुरूकेला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही आश्वासनाशिवाय त्यांच्या पदरात काहीही पडले नाही. आमच्या मार्फत राजकीय लाभ होत नसल्यानेच आम्हावर अन्याय झाल्याची भावना या विद्यार्थ्यांमध्ये पसरली आहे. आयुर्वेद संचालक, आयुष संचालनालय यांनी १२ फेब्रुवारी रोजी आयुर्वेद पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव पाठवला. त्यावर राज्य सरकारने निर्णय घेणे तर सोडाच, पण हा प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठविण्याचे सौजन्यही दाखवले नाही. २५ जुल रोजी या संदर्भात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री डी. पी. सावंत यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यामुळे आमच्या विद्यावेतन वाढीचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करावा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.