जालना, औरंगाबाद जिल्ह्यांमधील स्थिती
जालना व औरंगाबाद जिल्ह्य़ांत कृषिपंपांच्या वीजबिलाच्या थकबाकीचा आकडा १ हजार ३५२ कोटी रुपये आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत सवलतीचा लाभ घेतल्यास कृषिपंपधारक शेतक ऱ्यांना यापैकी ३२७ कोटी रुपये भरावे लागणार असून, बिलात १ हजार २५ कोटी रुपये सवलत मिळणार आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, कृषी ग्राहकांवरील वीजबिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी राज्य सरकारने कृषी संजीवनी योजनेस येत्या मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. या योजनेस पात्र होण्यासाठी ३१ मार्च २०१४ ला असलेल्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के रक्कम व्याज आणि दंडासह माफ करण्यात येणार आहे. कृषिपंप वीजग्राहकांना १ एप्रिल २०१४ नंतर वितरित केलेल्या बीजबिलाचा भरणा करावा लागणार आहे. बिल भरण्यासाठी सुलभ हप्ते आवश्यक असतील, तर ग्राहकांच्या विनंतीनुसार मार्च २०१६पर्यंत सर्व रक्कम वसूल होईल, अशा रीतीने समान मासिक हप्ते पाडून देण्यात येतील. तात्पुरत्या तसेच कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या कृषिपंप ग्राहकांना तसेच उपसा जलसिंचन योजनांनाही ही योजना लागू राहील.
‘महावितरण’च्या औरंगाबाद परिमंडलात जालना आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्य़ांचा समावेश आहे. या दोन्ही जिल्ह्य़ांत मिळून ३ लाख १७ हजार ४९१ कृषी ग्राहकांकडे वीजबिले थकलेली आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे अडचणीत आलेल्या शेतक ऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून कृषिपंपाच्या बिलात सवलत देण्यासाठी २०१४ मध्ये ‘महावितरण’ने कृषी संजीवनी योजना सुरू केली. त्या वेळी या योजनेची मुदत ३१ ऑगस्ट २०१४ पर्यंत होती. त्यानंतर या योजनेस ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत आणि नंतर ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता ‘महावितरण’ने कृषी संजीवनी योजनेस तिसऱ्यांदा मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.