राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेच्या सदस्यांनी त्यांच्याविरोधात दिलेला हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी नाकारला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून शिवसेना या विषयावरून आक्रमक असून, विधीमंडळाच्या इमारतीबाहेर शिवसेनेच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शनेही केली होती. अणे यांनी आपल्या वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी, यावर शिवसेना नेते ठाम आहेत.
महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत मत व्यक्त केल्यानंतर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी निदर्शने केली होती. परिवहन मंत्री दिवाकर रावते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अणे यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्याची विनंती केली होती. मात्र शिवसेनेला किंमत न देता मुख्यमंत्र्यांनी अणे यांच्यापाठी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली होती.