महापालिकेतील सुवर्णजयंती योजनेच्या महिला प्रकल्प अधिकाऱ्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. महापालिकेतील अधिकाऱ्याकडे खंडणी मागण्याच्या घटनेमुळे पालिका वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
सुवर्ण जयंती योजनेच्या प्रकल्प अधिकारी प्रेमलता कदम यांनी या प्रकरणी तक्रार दिली. बचत गटाबाबत माहिती मिळविण्यासाठी आम्ही दोन लाख रुपये खर्च केले असून त्याची भरपाई व्हावी म्हणून महिना दहा हजार रुपये याप्रमाणे हप्ता द्यावा, अन्यथा आपली नोकरी घालवू, अशी धमकीवजा खंडणीची मागणी सय्यद अजिज शरीफ आणि जगदीश वामन वाघ या दोघांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दोन्ही संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या योजनेंतर्गत महापालिकेच्या अंगणवाडी व बालवाडीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. शहरातील बचत गटांमार्फत हे काम केले जाते. या बचत गटांचे बिल या योजनेमार्फत दिले जाते.
या प्रक्रियेत काही गैरव्यवहार झाल्याची बतावणी करून संशयितांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दिल्याचे सांगितले जाते.