आमदार मकरंद पाटील यांची शरद पवार यांच्याकडे मागणी  

वाई : आमदार मकरंद पाटील यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी , वाई,खंडाळा व महाबळेश्वर या तीन तालुक्‍यांतील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे, यासाठी करोनावरील व्हॅक्‍सिन उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली.

वाई,खंडाळा,महाबळेश्वर मतदारसंघासाठी करोना प्रतिबंधक लसीचे डोस खरेदी करण्याची आमची तयारी आहे.वाई, खंडाळा येथील औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी, महाबळेश्वर पाचगणी येथील हॉटेल व्यावसायिक त्यांचे कर्मचारी व नातेवाईक,बँका पतसंस्था येथील अधिकारी कर्मचारी त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी संबंधितांनी लस खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे.या लसी अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्यासाठी आ मकरंद पाटील यांनी  पवार यांना विनंती केली. यानंतर पवार यांनी तात्काळ पुणे येथील लस उत्पादक कंपनी ‘सिरम इन्स्टिट्यूट’ चे डायरेक्टर डॉ. जाधव यांना फोन करून सूचना केल्या आहेत. लवकरच सिरम इन्स्टिट्यूटच्या डॉ. जाधव यांनी भेट घेऊन मतदार संघातील प्रत्येक नागरिकाचे करोना प्रतिबंधक लसीकरण वेगानं पूर्ण करण्यासाठी आ मकरंद पाटील प्रयत्नशील आहेत.त्यांनी शुक्रवारी (दि 4) आपल्याला हडपसर येथे भेटायला बोलावले आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किती व्हॅक्‍सिन वायल उपलब्ध होतात, हे पाहून वाई मतदार संघातील लोकांसाठी विशेषतः विविध इंडस्ट्री,हॉटेल,बँक पतसंस्था व इतर क्षेत्रातील मधील कामगारांसाठी लसीकरण मोहीम राबविणार असल्याचे आमदार पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्‍यता आहे.आमदार पाटील यांनी महाबळेश्वर सारख्या दुर्गम डोंगराळ भागात ,वाई व खंडाळा तालुक्यात ग्रामीण रुग्णालय,उपकेंद्रे ,सामाजिक कार्यकर्ते,औद्योगिक सेलच्या माध्यमातून मोफत उपचाराची छोटीमोठी सहाशे रुग्णांसाठी करोना काळजी केंद्र ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सह सुरु केली आहेत. गावोगावी संस्थात्मक विलीगीकरण केंद्रेही सुरु केली आहेत. या परीसरात मागील वर्षांपासून करोना संसर्गामुळे वाई, खंडाळा,शिरवळ,लोणंद येथील औद्योगिक ,महाबळेश्वर पाचगणीच्या हॉटेल व्यवसायिक,पर्यटन, शेतकरी,निवासी शाळा यांचे अर्थकारण बिघडले आहे. ग्रामीण भागातही रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर लोकांचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे.नागरिकांच्या मनातील भीती कमी झाली पाहिजे. याबाबत काही कंपन्यांचे व्यवस्थापन आणि महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकांनी,सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी व्हॅक्‍सिनसाठी निधी देण्याचे मान्य केले. त्यामुळे व्हॅक्‍सिन उपलब्ध करून घेण्या संदर्भात शरद पवार यांची आमदार मकरंद पाटील यांनी भेट घेतली.