लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर तालुक्यातील शस्त्रपरवानाधारकांनी येत्या दोन दिवसांत त्यांची शस्त्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कोपरगाव पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या ६८ शस्त्रपरवानाधारकांचा आता पत्ताच नाही. या व्यक्ती सापडतच नसल्याने त्यांना शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.
कोपरगावचे पोलीस निरीक्षक साजन सोनवणे व उपनिरीक्षक पारखे यांनी या ६८ जणांची यादी मंगळवारी पत्रकारांना दिली. या लोकांकडील रिव्हॉल्व्हर, बंदुका, पिस्तूल, रायफल आदी शस्त्रे जमा करण्याचे मोठे आव्हान या पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. या यादीत माजी खासदार (स्व.) भीमराव बडदे, तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष त्र्यंबक सरोदे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त पी. टी. बोरावके, (स्व) धनराज भन्साळी, नारायण महाले, ज्ञानदेव पाचरणे, अभय शेळके, डॉ. एम. डी. चव्हाण, अरुण शिरोडे, वाय. एल. गिरमे, रामदास जपे, तुकाराम िशदे, रामचंद्र काजळे, भास्करराव गरुड, आनंदराव वक्ते, रंगनाथ काळे, बाळकृष्ण विध्वंस, श्रीराम रासकर आदींचा समावेश आहे. राहाता व शिर्डी असे वर्गीकरण करून कोपरगाव तालुक्यात एकूण ६४९ जणांना शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. त्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे. यातील बहुतांशी शस्त्रपरवानाधारक मृत झाले आहेत. त्यांच्या वारसदारांनी ही शस्त्रे जमाच केली नाहीत. त्यामुळे पोलिसांपुढे शस्त्र जमा करून घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अधिक माहितीसाठी पोलिसांशी ०२४२३-२२२३३३ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.