चंद्रपूर महापालिका निवडणूक; उमेदवारीवरून सर्वपक्षीय नाराजी; ६६ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या सर्व १७ प्रभागांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशा सरळ लढतीचे चित्र आहे. काही प्रभागांतील गटांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे. भाजप नेते विकासकामांचे मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत, तर काँग्रेस मालमत्ताकरातील भरमसाट वाढ आणि मागील पाच वर्षांतील गैरव्यवहाराचे वादग्रस्त विषय समोर करून भाजपला लक्ष्य करीत आहेत. १९ एप्रिलला होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी सर्व प्रमुख राजकीय पक्ष व अपक्षांसह १७ प्रभागांत ६६ जागांवर ४६० उमेदवार रिंगणात आहेत. या वेळी प्रथमच निवडणुकीत उमेदवारी देताना राजकीय पक्षांनी पक्षनिष्ठा खुंटीला टांगूनजिंकून येण्याची क्षमता या निकषाला महत्त्व दिले आहे. त्यामुळे सर्वपक्षीय निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता आहे. याचा फटका भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या चारही प्रमुख पक्षांना बसू शकतो. भाजप याला अपवाद नाही. समाजमाध्यमांवर नेत्यांना लक्ष्य केले जात आहे.

BJP Surat Candidate Wins Unopposed
काँग्रेसचे अर्ज बाद झाल्याने भाजपचा बिनविरोध विजय; पराभवाच्या भीतीने ‘मॅचफिक्सिंगचा आरोप
Sangli, Congress palm symbol, Congress,
सांगलीत सलग दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे हाताचा पंजा चिन्ह गायब
congress leadership in delhi advised maharashtra leaders to follow alliance rule
आघाडी धर्माचे पालन करा! पक्षनेतृत्वाचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला
congress bastar candidate kawasi lakhma
“यंदा मोदी लाट नाही, आमचा विजय निश्चित”, काँग्रेसच्या उमेदवाराचा दावा

महाकाली प्रभागात भाजपचे रामू तिवारी विरुद्ध काँग्रेसचे नंदू नागरकर यांच्यात लक्षवेधी लढत होत आहे. महापालिकेत आजवर भाजपला मदत करीत आलेले काँग्रेस सभागृह नेते रामू तिवारी यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपने लगेच निष्ठावंत प्रमोद कडूच्या मुलाला बाजूला सारत तिवारींना उमेदवारी दिली. त्यामुळे निष्ठावंतांची मदत तिवारी यांना किती होईल हा प्रश्न आहे. तसेच प्रभागावर वर्चस्व ठेवून असलेले तिवारी त्यांचे मित्र काँग्रेसचे संतोष लहामगे यांच्या पत्नीला मदत करतील की पक्षातील सहकारी उमेदवार वनिता कानडे, अनुराधा हजारे, हिरामण खोब्रागडे यांना मदत करतील, याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहे.जटपुरा प्रभागात प्रमोद क्षीरसागर या तरुणाला उमेदवारी घोषित झाली असताना शेवटच्या क्षणी सिंधी समाजाच्या दबावात रवी आसवानी या माजी नगरसेवकाला उमेदवारी देण्यात आली. विठ्ठल मंदिर प्रभागात सलग पाच पराभव बघितलेल्या खांडेकर पुन्हा सहाव्यांदा रिंगणात आहेत. विवेक नगरात सलग २० वर्षांपासून भाजपशी जोडलेले प्रमोद शास्त्रकार यांना डच्चू देऊन शिवसेनेतून आलेले उपमहापौर संदीप आवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रवींद्र झाडे, आशा आबोजवार व वंदना तिखे यांना नेत्यांच्या शिफारशीने उमेदवारी मिळाली. सर्वाधिक धक्कादायक म्हणज चंद्रपूरकरांवर मालमत्ता कराचे ओझे लादणाऱ्या महापौर राखी कंचर्लावार व त्यांचे पती संजय कंचर्लावार या दोघांनाही उमेदवारी देऊन भाजपने संघाची नाराजी ओढवून घेतली आहे. काँग्रेसमध्येही तिकीट वाटपात गोंधळ झाला. महाकाली प्रभागात वंदना भागवतचे नाव प्रदेश कार्यालयातून आले असताना माजी आमदार सुभाष धोटेंच्या आग्रहामुळे लहा हिवरे यांचे नाव निश्चित करण्यात आले. सूर्यकांत खनके यांची मर्जी न सांभाळल्याने त्यांनी काँग्रेसचा एबी फार्म धुडकावून लावला. त्याचा परिणाम काँग्रेस फक्त ६४ उमेदवार उभे करू शकली. शिवसेनेच्या काही निष्ठावंतांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. इम्रान दोसानी याला केवळ धनशक्तीचा विचार करण्यात आला. एकीकडे रामू तिवारी यांच्यावर अन्याय करणाऱ्या काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार अशोक नागापुरे यांना उमेदवारी देऊन निष्ठेला तिलांजली दिली. अनिल मुसळे, योगिता उमाकांत धांडे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे भाजपसोबतच्या १२ जणांना उमेदवारी द्यायची नाही, असा आग्रह धरणाऱ्यांनीच ५ नगरसेवकांना सामावून घेतले. त्यामुळे इतर नाराज झाले. त्याचा परिणती दुर्गेश कोडाम, पिंटू शिरवार यांच्या बंडखोरीत झाली.शिवसेनेतही अखेरच्या क्षणापर्यंत तिकीट वाटपाचा गोंधळ होता. विठ्ठल मंदिर प्रभागात प्रफुल पुलगमकर यांचा एबी फार्म उपजिल्हाप्रमुख किशोर जोरगेवार यांनी हिसकावून विशाल निंबाळकर यांना दिला. रमेश तिवारी, मनोज पाल, जयदीप रोडे या तुकूम व बंगाली कॅम्प प्रभागातील सेना नेत्यांना विश्वासात घेतले गेले नाही. अखेरच्या क्षणी भाजपमधून आलेले बलराम डोडानी यांना तिकीट देण्यात आले. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही भाजप, शिवसेना व काँग्रेसमधील नाराजांना उमेदवारी दिली. माजी शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी काँग्रेसची छुपी युती केल्याचा आरोप होतो आहे. त्याचाही फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला केवळ ४२ उमेदवार मिळाले. संजय वैद्य हे एकमेव उमेदवार सोडले तर अन्य उमेदवारांची चर्चाही नाही. बसपने काही प्रभागांत उमेदवार दिले असले तरी चार नगरसेवक गळाला लागल्याने या पक्षाचे निष्ठावंतही दुखावले आहेत.  भाजपच्या प्रचाराची धुरा पूर्णपणे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार नाना शामकुळे या नेत्यांवर तर काँग्रेसकडून माजी खासदार नरेश पुगलिया, विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे यांच्या खांद्यावर आहे. भाजप नेते मागील अडीच वर्षांत केलेल्या विकासकामांचे मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. तर काँग्रेस नेते मालमत्ता कराचा बोझा, घनकचरा, रिलायन्स, इमारत बांधकाम परवानगी, भूमिगत गटार योजना आदी कामांमध्ये झालेल्या अनियमिततेवरून भाजपला लक्ष्य करीत आहेत.

भाजपकडून मुस्लीम उमेदवार नाही

उत्तर प्रदेश पॅटर्न चंद्रपुरात राबविताना भाजपने एकाही मुस्लीम चेहऱ्याला संधी दिली नाही. विशेष म्हणजे चंद्रपुरात मुस्लीम मतदारांचा आकडा हजारोंच्या घरात आहे आणि पक्षात डॉ. ए. आर. खान, मतीन शेख, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांच्यासह असंख्य मुस्लीम नेते सक्रिय आहेत. मुस्लीम समाजात पक्षासाठी मते मागताना या नेत्यांवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.