नऊ राज्यांमध्ये अडीचशेहून अधिक शाखांमार्फत जाळे विणलेल्या बीएचआर मल्टीस्टेटने उस्मानाबादकरांना चांगलाच गंडा घातला. जिल्ह्यातील सुमारे साडेसोळा कोटींच्या ठेवी सध्या ‘जळगाववासी’ झाल्या आहेत. ही रक्कम जळगावच्या मुख्य शाखेत वर्ग करण्यात आली. उस्मानाबाद व तुळजापूर शाखांचे व्यवहार थांबविण्यात आले. इतर जिल्ह्यांतही हीच अवस्था आहे. ठेवी परत मिळविण्यास रांगा लावलेल्या खातेदारांना आता जळगावचा रस्ता दाखविला जात आहे. तेथेही ठेवींपकी केवळ २० टक्के रक्कम देऊन ८० टक्के रकमेची पुन्हा ठेव घेऊन गुंतवणूकदारांना चुना लावण्याची उठाठेव सुरू आहे!
तब्बल तेराशे कोटींच्या ठेवी गोळा करणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टीस्टेटने मुख्य कार्यालय वगळता अन्य शाखांमधील व्यवहार सध्या थांबविले आहेत. महाराष्ट्रात व बाहेर ‘बीएचआर’ हे नाव मागील ४-५ वर्षांत चांगलेच वाढले. चकाचक फíनचर असलेल्या साडेपाचशेहून अधिक शाखा ठेवीदारांना सहज आकर्षति करीत. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद व तुळजापूर या दोन शाखांमध्ये मोठय़ा संख्येने ठेवीदार गुंतवणूक करण्यास धावले. उस्मानाबाद शाखेत १४ कोटींहून अधिक, तर तुळजापूर शाखेत सुमारे अडीच कोटींच्या ठेवी बीएचआर मल्टीस्टेटने मिळवल्या. उस्मानाबाद शाखेच्या ठेवी १५ कोटींच्या घरात व वाटप झालेले कर्ज केवळ २० लाख रुपये आहे. उर्वरित ठेवी शाखेने जळगाव येथील मुख्य कार्यालयात वर्ग केल्या. याउलट तुळजापुरात अडीच कोटी ठेवी गोळा केल्यानंतर दीड कोटीचे कर्जवाटप करण्यात आले. मध्यंतरी अनेक वित्तीय संस्थांमधील गरव्यवहार समोर आल्यानंतर ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढून घेण्यास बीएचआरच्या दारात रांगा लावल्या. कोटय़वधीच्या ठेवी गोळा करून बीएचआर मल्टीस्टेटने ठेवीदारांना चांगलेच कचाटय़ात पकडले.
ठेवींची मुदत संपून गेलेल्या व मुदतपूर्व ठेव परत हवी असणाऱ्या खातेदारांना थेट जळगावचा रस्ता दाखविला जात आहे. ठेवी परत हव्या असणाऱ्यांनी जळगावच्या मुख्य शाखेशी संपर्क साधावा, असा अजब आदेश मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाने साडेपाचशे शाखांमध्ये डकवला आहे. यातही अनेक जाचक अटी घातल्या आहेत. तेलही गेले आणि तूपही, अशा अवस्थेत ठेवीदारांना आता जळगाव वारीशिवाय पर्याय नाही. ज्यांना ठेव परत घ्यायची, त्यांनी जळगाव मुख्य शाखेत जाऊन तसा अर्ज द्यावा. ठेवीच्या केवळ २० टक्के रक्कम त्यांच्या तोंडावर मारून उर्वरित रक्कम मुख्य शाखेत पुन्हा दोन वर्षांसाठी ठेव म्हणून अडकवून ठेवली जाणार आहे! ज्यांना उर्वरित ८० टक्के रकमेवर व्याज हवे आहे, त्यांनी ३ वर्षांपेक्षा अधिक काळाची मुदत मल्टीस्टेटला द्यावी. देशभरात वाटप झालेले कर्ज वसूल झाल्यानंतरच आपल्याला ठेव म्हणून अडकवून ठेवलेली रक्कम परत दिली जाईल, असा बनाव बीएचआरने केला आहे.
उस्मानाबाद शहरात ३० सप्टेंबर २००९ रोजी सुरू झालेल्या या मल्टीस्टेटमध्ये सध्या केवळ दोन कर्मचारी आहेत. चारजण नोकरी सोडून गेले, तर नवीन ६० शाखांचा विस्तार सुरू असल्याची जाहिरात मल्टीस्टेटच्या मुख्य प्रवेशद्वारावर अजूनही झळकत आहे. सर्व शाखांमधील व्यवहार बंद करून सर्व व्यवहार जळगावला एकवटले आहेत. त्यामुळे बीएचआर आता गुंडाळण्याच्या मार्गावर आहे, अशी चर्चा ठेवीदारांमध्येच होत आहे.
लेकरांचे पोट मारून अनामत!
हातशिलाई करून घरातील सर्वाच्या हातातोंडाचा मेळ बसवून उरलेली रोकड थोडी थोडी करून बँकेत जमा केली. प्रसंगी लेकरांचे पोट मारले व बँकेत ५ हजार २०० रुपयांची ठेव जमा केली. मुदत संपून ५ महिने सरले. दररोज हेलपाटा मारते. आता जळगावला जा, पसे मिळतील असे सांगितले जाते. मी म्हातारी ५ हजार रुपयांसाठी जळगावला कसे जाऊ, असा सवाल ६० वर्षांच्या जमुनाबाई फुलचंद नोगजा डोळ्यात पाणी आणून करतात. घरी न सांगता गोळा केलेली प-प या ‘बंकवाल्यां’नी अडकवून टाकली. माझ्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे आहे. त्यासाठी पशाची गरज आहे आणि बँकेतून ५ महिन्यांपासून थोडे थांबा, पसे मिळून जातील, असे गाजर दाखविले जात आह, अशी या वृद्धेची कैफियत आहे.
मल्टीस्टेटने फसविले
लाखोंच्या ठेवी देणाऱ्या खातेदारांना मल्टीस्टेटने फसविले. जळगाव शाखेत या, २० टक्के रक्कम अदा केली जाईल. उर्वरित रक्कम अनामत म्हणून जळगावच्या शाखेत ठेवून घेतली जाईल, असे सांगण्यात आले. जाण्या-येण्याचा खर्च, निवास-भोजन व्यवस्था होईल, असेही सांगितले होते. मात्र, कोणतीही व्यवस्था मल्टीस्टेटने केली नाही. ठेवीदारांना जळगाव वारीचा भरुदड बसत आहे आणि अडकलेली रक्कम केव्हा मिळणार, हेही बँकेकडून स्पष्ट केले जात नाही, असे ठेवीदार असलेल्या कल्याण जोशी यांनी सांगितले.
आता केवळ सात कोटींच्या ठेवी
उस्मानाबाद शाखेकडे आता केवळ सात कोटींच्या ठेवी आहेत. उर्वरित ठेवीदारांनी जळगाव मुख्य कार्यालयात उस्मानाबाद शाखेतील ठेवी वर्ग केल्या. त्यामुळे वर्ग केलेल्या ठेवींची जबाबदारी मुख्य शाखेची आहे. त्यामुळे उस्मानाबाद शाखेवरील अर्धा भार कमी झाला आहे. ठेवीदारांशिवाय चालू व बचत खातेदारांचे ५७ लाख ८५ हजार रुपये उस्मानाबाद शाखेकडे आहेत. मुख्य शाखेकडून सूचना मिळतील, त्यानुसार ठेवीदार व खातेदारांना रक्कम दिली जाईल, असे उस्मानाबाद शाखेचे व्यवस्थापक मोहन गोळेकर यांनी सांगितले.