पारनेर : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्राणवायूचे आणि परिणामी पर्यावरण संवर्धनाचे, वृक्षलागवड व संवर्धनाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असल्याचे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले.

शिवराज्याभिषेक दिन सोहळा व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बाजार समितीच्या वतीने पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरुवात पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे यांच्या हस्ते बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण करून करण्यात आली.

बाजार समितीचे संचालक राजेश भंडारी, स्थापत्य अभियंता साळुंके,वृक्षमित्र लतीफ राजे,आडत व्यापारी राजेंद्र तारडे, नगरसेवक किसन गंधाडे, जिल्हा सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी इंद्रभान शेळके, बाजार समितीचे सचिव शिवाजी पानसरे, राजेंद्र झंजाड, राजेंद्र बेलोटे, समितीतील हमाल, मापाडी, कर्मचारी उपस्थित होते.

सभापती प्रशांत गायकवाड म्हणाले की, बाजार समितीमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांमुळे समितीतील आडत,व्यापारी, शेतकरी, कर्मचाऱ्यांसह विविध घटकांना भौतिक सुविधा उपलब्ध होतील. भौतिक सुविधांबरोबरच प्रत्येक घटकाचे आरोग्य महत्त्वाचे आहे. उत्तम आरोग्यासाठी समितीच्या आवारात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होण्यासाठी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रम हाती घेतला आहे. मुख्य बाजारासह भाळवणी उपबाजारात तसेच टाकळीढोकेश्वर, सुपे येथे किमान ५०० वृक्षांची लागवड व संवर्धन करणार असल्याचे सभापती गायकवाड म्हणाले.

वृक्षलागवड व संवर्धनासाठी बाजार समितीला सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही देतानाच वृक्षारोपणासाठी देशी,औषधी वृक्षांची रोपे पुरवण्यात येतील असे वृक्षमित्र लतीफ राजे यांनी यावेळी जाहीर केले.