18 February 2019

News Flash

पत्नीऐवजी चुकून केला चुलत भावजयीचा खून

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यास विरोध केला होता. त्यावरून दोघा मायलेकात भांडण झाले होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील बचेरी गावातील मंगल शहाजी थिटे (वय ५०) हिचा खून तिच्या मुलाने केला नसून चुलत दिरानेच केल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. त्यामुळे दिरालाही अटक करण्यात आली आहे. या खूनप्रकरणाने वेगळे वळण घेतल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे. अनैतिक संबंधातून स्वत:च्या पत्नीचा खून करायचा होता. परंतु दारूच्या नशेत चुकून पत्नीऐवजी चुलत भावजयीचा खून झाल्याची कबुली संशयित महादेव थिटे याने पोलिसांपुढे दिली आहे.

मंगल थिटे ही आपल्या शेतातील वस्तीवर घरासमोरील अंगणात रात्री झोपली असताना तिचा अज्ञात व्यक्तींनी खून केला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास हाती घेतल्यानंतर हा खून दुसऱ्या-तिसऱ्याने केला नसून तर मंगल हिचा मुलगा संतोष शहाजी थिटे (वय ३७) यानेच केल्याचे आढळून आले होते. लागोपाठ दोन मुली जन्मल्यामुळे संतोष याने आपल्या पत्नीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले होते. परंतु त्यास आई मंगल हिने, तिसऱ्यांदा नातूच जन्माला येईल, मला नातूचे तोंड पाहायचे आहे, असे म्हणून

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यास विरोध केला होता. त्यावरून दोघा मायलेकात भांडण झाले होते. त्यातूनच मुलगा संतोष याने आईचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

संतोष यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. तथापि, पुढे पोलीस तपासात संतोष याने हा खून केला नसल्याची खात्री झाली. त्याच दरम्यान, दुसऱ्या अंगाने झालेल्या तपासात या खून प्रकरणाचा उलगडा होऊन त्यात मंगल हिचा खून तिच्याच चुलत दिराने केल्याचे स्पष्ट झाले.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगल हिचा चुलत दीर महादेव विष्णू थिटे हा संशयी स्वभावाचा आहे. आपला चुलत भाऊ शहाजी थिटे याच्याशी आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय महादेव यास वाटत होता. त्यावरून दोघांत सारखे भांडणे होत असत. हा संशय अधिकच बळावल्यानंतर त्याने पत्नीचा खून करण्याचे ठरविले.

एव्हाना, पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नी काही दिवसांपूर्वी घर सोडून निघून गेली होती. तिचा गावात व परिसरात शोध घेताना तिला चुलत भाऊ शहाजी यानेच पळवून नेऊन कोठेतरी ठेवल्याचा संशय महादेवला वाटत होता. तिला संपवायचेच, असा ठाम निश्चय करून महादेव हा हातात कु ऱ्हाड घेऊन फिरायचा. घटनेच्या दिवशी त्याने जास्त दारू प्याली होती. हातात कु ऱ्हाड घेऊन तो शहाजीच्या वस्तीवर आला. त्या वेळी घराच्या अंगणात आपली पत्नीच झोपल्याचा समज झाला आणि मागचा पुढचा कसलाही विचार न करता महादेव याने झोपलेल्या मंगल हिच्यावर क ुऱ्हाडीने प्रहार केले. तशी कबुली त्याने पोलिसांपुढे दिली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वी चुकीच्या तपासावर आधारित अटक करण्यात आलेल्या संतोष थिटे यास आरोपमुक्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी हाती घेतली आहे.

First Published on October 11, 2018 3:08 am

Web Title: cousin murder brother wife in solapur