वस्तू-सेवा कर आकारणीचा गोंधळ

शेतीमालाला वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला नसला तरी सांगलीच्या बाजारातील बेदाणा वगळता अन्य सर्व सौदे गेली अकरा दिवस बंद आहेत. याचा फटका बसून बाजार समितीमध्ये रोज दोन कोटींची उलाढाल ठप्प असल्याचे बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांनी सांगितले.

सांगलीच्या बाजारात प्रामुख्याने बेदाणा, हळद, गूळ आणि मिरची या शेतीमालाचे सौदे होतात. मात्र वस्तू व सेवा कर लागू केल्यानंतर हा कर कोणत्या टप्प्यावर लागू होत आहे याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने अनेक अडत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना तूर्तास माल विक्रीसाठी आणू नये अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे सांगलीच्या बाजारात शेतीमालाची आवकच पूर्णपणे ठप्प झाली आहे.

सांगलीच्या बाजारात गुळाची आवक प्रामुख्याने कर्नाटकातून होते. दररोज ३०० जे ३५० टन गुळाची खरेदी-विक्री होत असल्याचे गूळ व्यापार असोसिएशनचे अध्यक्ष शरद शहा यांनी सांगितले. नवीन कराचा प्रारंभ झाल्यानंतर सौदे बंद असल्याने गुळाच्या दरात क्विंटलला दोनशे रुपयांची वाढ झाली असली तरी मालच उपलब्ध नाही. सध्या बाजारात असलेला माल हा जुन्या खरेदीचा आहे. जीएसटी कराबाबतची संभ्रमावस्था एक दोन दिवसात दूर होण्याची शक्यता असून यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

शेतीमालाला जीएसटीतून सूट देण्यात आली असली तरी अडत व्यापाऱ्याला खरेदीदाराला मिळणाऱ्या दलालीवर १८ टक्के कर लावण्यात आला आहे. या कराचा भरणा कसा करायचा? महिन्याचा हिशोब द्यायचा की, वार्षकि हिशोब द्यायचा असा प्रश्न अडत व्यापाऱ्यांना पडला आहे. याबाबत बाजार समिती आणि विक्री कर म्हणजेच जीएसटी कार्यालयाशी संपर्क साधण्यात येत असला तरी अद्याप अनिश्चितता दूर झालेली नाही. हीच स्थिती हळद, मिरची व्यापाराची झाली आहे.