नेहमी त्रास देणाऱ्या टवाळखोराच्या जाचाला कंटाळून एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सातपूर परिसरात उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित युवतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीद्वारे ही बाब स्पष्ट झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, महिनाभरापूर्वी याच भागात टवाळखोरांच्या जाचाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली होती.
याच भागातील घडलेली ही दुसरी घटना आहे. तृप्ती अंबादास जाधव (२०) असे या तरुणीचे नाव आहे. शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ती पदविकेचे शिक्षण घेत होती. चुंचाळे रस्त्यावरील जाधव संकुलमध्ये राहणाऱ्या या युवतीने सकाळी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास अंबादास जाधव हे घरी आले असता हा सर्व प्रकार उघड झाला. तिच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीवरून टवाळखोराच्या जाचाला वैतागून ती या निर्णयाप्रत आल्याचे स्पष्ट झाले आहे. एक मुलगा कायम मागे लागतो, छेडछाड करतो, सातत्याने होणाऱ्या या त्रासाला मी वैतागले असल्याचे या तरुणीने चिठ्ठीत म्हटले आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी याच परिसरातील एका महिलेने टवाळखोरांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली होती; परंतु तिच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. या महिलेने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. तक्रारीची दखल न घेतल्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर टवाळखोरांच्या उपद्रवाचा हा दुसरा प्रकार पुढे आला आहे.