मराठवाडय़ाच्या बहुतेक भागास मंगळवारीही मुसळधार पावसाने झोडपून काढले. मराठवाडय़ात येत्या २४ तासांत अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला असून, नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न सुरू आहेत.
प्रामुख्याने हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्य़ांत मुसळधार पावसाचा प्रभाव जास्त होता. हिंगोलीत कयाधू नदीला, तसेच परभणीत पालम तालुक्यातील धोंडी नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. हिंगोली व परभणीतील प्रत्येकी ७ गावांचा संपर्क तुटल्याचे प्रशासनाने कळविले आहे. नांदेडमध्ये पुरामुळे वृद्ध महिला वाहून गेल्याचे वृत्त आहे. हिंगोलीत ६० कुटुंबांतील जवळपास ३०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. कळमनुरी तालुक्यातील बिबथर ग्रामस्थांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यास प्रशासन प्रयत्नशील होते.
नांदेडातील किनवट व माहूर तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या पावसाने लोहा-गंगाखेड रस्त्यावरील वाहतूक बंद पडली, तर मांडवी परिसरात वझरा (तालुका माहूर) येथील कलावती नारायण उकलवार ही ८५ वर्षांची वृद्धा दरसांगवी येथे जात असताना पुरात वाहून गेली. विष्णुपुरी जलाशयाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून २४२ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. नांदेड-इस्लामपूर रस्ताही बंद असल्याचे वृत्त आहे. किनवट व माहूर तालुक्यांतील २९ गावांना पुराच्या पाण्याचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
परभणीकडे जाणारा गंगाखेड-नांदेड रस्ता सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजता वाहतुकीस बंद झाला. पालम तालुक्यातील ७ गावांचा संपर्क तुटला असून पाथरी तालुक्यातील रस्ते वाहून गेले आहेत. पाथरीहून जाणारा उमरा, तुरा, गुंज हा रस्ता वाहून गेला. पावसाचा जोर वाढल्याने शेतीचे नुकसान झाले.