ग्रामीण विकास यंत्रणेच्या ‘उमेद’ प्रकल्पातर्फे  हायजेनिक मटण शॉप सुरू करण्यात आले असून, याद्वारे घरपोच मटण पुरविल्या जाणारा हा राज्यातील पहिला प्रकल्प ठरला आहे.  योग्य दरात पशूविक्री व रोजगार निर्मिती हा हेतू ठेवून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने देवळीत हे दुकान सुरू केले आहे.

राज्यातील हा पहिलाच असा प्रकल्प असून योग्य व्यवस्थापन झाले, तर राज्यात अन्य ठिकाणी अशा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असल्याचे प्रकल्प संचालक सत्यजीत बडे यांनी सांगितले. देवळीच्या विदर्भ पशू उन्नती संसाधन केंद्रातर्फे  चालविण्यात येणाऱ्या या उपक्रमावर साडेबारा लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत मोटरसायकलने मागणीनुसार घरपोच मटण पुरविल्या जाईल. मटण प्रक्रियेसाठी वळण रस्त्यावर भाडेपट्ट्यावर जागा घेऊन कत्तलखान्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यावर सहा लाख रूपये खर्च झाला. याच ठिकाणी शेळ्यांची राहण्याची व्यवस्था व हिरव्या चाऱ्याची लागवड केली जाणार आहे.

तालुक्यातील पाच हजारावर महिला पशूपालक तसेच ५६ पशू सखींना यात काम मिळेल. कत्तलखान्याच्या उभारणीत लखनौच्या ‘द गोट ट्रस्ट’चे सहकार्य लाभले. वातानुकूलीत मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून लवकरच तालुका पातळीवर विक्री सुरू होईल. त्यानंतर वर्धा, सेलू शहरात मटण पुरवठा केल्या जणार आहे. शेळ्यांची खरेदी पाचशे महिला बचतगटांच्या माध्यमातून केल्या जाणार आहे. जिल्हा वार्षीक नावीन्यपूर्ण योजनेतून या उपक्रमास निधी मिळाला आहे.

आज या उपक्रमाचे औपचारीक उद्घाटन करतांना उमेदच्या स्वाती वानखेडे, मनिष कावडे, पशूधन विकास अधिकारी डॉ. संजय चोपडे, देवळी तालूका अभियान व्यवस्थापक ओमलता भोयर तसेच प्रकल्पाशी निगडीत राहुल अतकरे, मनोज चिखलकर, शुभांगी कामडी, कांचन होले, कविता भगत, अरूणा उरकुडे, अर्चना डंबारे व अन्य पशू सखी उपस्थित होत्या.