सार्वजनिक बांधकाम विभागाचे निलंगा येथील कार्यकारी अभियंता एस. आर. कातकडे मागील दीड वर्षांपासून कार्यालयात गरहजर आहेत. परिणामी ६ तालुक्यातील कोटय़वधीची मंजूर विकासकामे बंद आहेत. कार्यकारी अभियंत्यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या कार्यालयास टाळे ठोकून प्रशासनाचा जाहीर निषेध केला.
राज्य सरकारकडून, तसेच आमदार-खासदार निधीतून अनेक विकासकामे मंजूर आहेत. या कामांच्या अंदाजपत्रकासह प्रस्ताव तयार करणे, कामे मंजुरीस पाठवणे, तांत्रिक मान्यता देणे व पूर्ण झालेल्या विकासकामांचे मूल्यमापन करून बिल अदा करणे आदी कामे कार्यकारी अभियंत्यांच्या सहीशिवाय होऊ शकत नाहीत. परंतु संबंधित कार्यकारी अभियंता कातकडे त्यांकडे इतर ठिकाणचा पदभार आहे, बैठकीत आहे, अशी कारणे सांगत मागील दीड वर्षांपासून या कार्यालयाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे कोटय़वधीची कामे बंद पडली आहेत. त्यांचे मुख्यालय निलंगा असूनही ते एकही रात्र निलंग्यात थांबले नाहीत. निलंगा मतदारसंघातील मंजूर विकासकामाच्या भूमिपूजन व उद्घाटनासाठी मंत्री, लोकप्रतिनिधी कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते. परंतु कार्यकारी अभियंत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. या पाश्र्वभूमीवर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी येथील कार्यालयास टाळे ठोकून जाहीर निषेध नोंदवला. या कार्यकारी अभियंत्याची तातडीने बदली करण्याची मागणी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.