शहरातील इदगाह विभागात शनिवारी रात्री दोन गटांत झालेल्या हाणामारीत ठार झालेल्या राहुल कन्हैयालाल चुनियान (१७) याच्या पार्थिवावर रविवारी बंदोबस्तात अन्त्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी सात ते आठ जणांना अटक केली आहे. शुभम चुनियान (२०) यांनी अमिन कयुब शेख, शोएब ऊर्फ मोन्या, जाकीर हाजी मुनाफ शेख, मतिन गुलाब शहा, सद्दाम बादशहा अत्तार, आसिफ पटेल आदी सात ते आठ जणांविरुद्ध तक्रार दिली. इदगाह भागात शनिवारी रात्री १०.३०च्या सुमारास घडली. राहुल चुनियान व इतर मुले गणेश मंडळापुढे कार्यक्रम करत असताना संशयितांनी राहुलवर सशस्त्र वार करून ठार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर, आमिन कयुम शेख ऊर्फ पटेल यांनी दिलेल्या तक्रारीत सात ते आठ जणांनी सोहेल जाकीर शेख व राहुल चुनियान यांच्यात वाद झाला असता सोहेल व समीर पठाण यांना मारहाण केल्याचे म्हटले आहे. शहर पोलिसांनी अमिन पटेल, मुनाफ शेख, मनित गुलाम अली शहा यांना अटक केली. तर, शोहब ऊर्फ मोन्या किरण शेख यास ताब्यात घेतले. दरम्यान, रविवारी दुपारी मयत राहुलची अन्त्ययात्रा काढण्यात आली. दोन समाजांत तेढ निर्माण करणाऱ्यांना शिक्षा देण्याचे फलक अन्त्ययात्रेत सहभागी झालेल्यांनी हातात घेतले होते. पोलिसांनी शहरात बंदोबस्तात वाढ केली आहे.