गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी.एस. कुलकर्णी यांना अटक करण्यात आली असून याच प्रकरणी पुणे पोलिसांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे रवींद्र मराठे यांना देखील अटक केली. मात्र, पुणे पोलिसांची ही कारवाई चुकीची असून यातून पोलिसांचा आततायीपणा दिसून येतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोलीस आणि गृहखात्यावर टीका केली.

मंगळवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या अधिकाऱ्यांवरील कारवाईवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बँकेसंदर्भातील कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. त्यांच्या शिवाय कारवाई करण्याचा अधिकार कोणालाही नाही. मात्र पुण्यातील बँक अधिकाऱ्यांना अटक झाली यातून पुणे पोलीस अधिक जागरुक असल्याचे दिसते, असा चिमटा त्यांनी काढला. पुणे पोलिसांनी कायद्याचा गैरवापर केल्याचे या कारवाईमधून स्पष्ट दिसते, असेही त्यांनी सांगितले.

शाहू महाराजांचे कोल्हापुरातील स्मारक दहा वर्षांनंतर देखील पूर्ण होत नाही. यावर ते म्हणाले की, शाहू महाराज आणि महात्मा फुलेंच्या विचारांचे लोक असतील तर कामाला निश्चित गती येते, असे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.