“निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या निर्णयामुळे सरकार अस्थिर करू पाहणाऱ्यांच्या हाती अपयश लागले आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थिर होतं. सरकार स्थिर राहील आणि करोनाविरोधातील लढा आम्ही यशस्वी करूच,” अशा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसंच शिवाय राज्याची अर्थव्यवस्थाही आम्ही पुन्हा सुदृढ करू, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

“विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयोगाला पत्र लिहून तशी विनंती केली होती. निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर निवडून जातील आणि तेच राज्याचे मुख्यमंत्री राहतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे,” असं पाटील यावेळी म्हणाले.

… म्हणून निवडणूक आयोगाकडे विनंती

“विधान परिषदेतील २ रिक्त जागांपैकी एका जागेवर उध्दव ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने दोनवेळा वेळा राज्यपालांकडे केली. मात्र त्याबाबत काहीही निर्णय झाला नाही. म्हणूनच या ९ जागांसाठी निवडणूक लवकर घेण्यात यावी अशी विनंती महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे केली होती,” असं त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- अखेर ठरलं! : उद्धव ठाकरेंवरील संकट टळलं, २१ मे रोजी विधान परिषद निवडणुका

राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न

“देशासह संपूर्ण जग करोनाविरोधात लढा देत असताना काहीजण राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. लोकशाहीच्या तथाकथित गळचेपीबाबत अनेकांनी राज्यपालांना पत्र लिहिली तर काहींनी देव पाण्यात ठेवले होते. सरकार अस्थिर होईल आणि आम्ही ‘पुन्हा प्रयत्न करू’ असे अनेकांना वाटत होते,” असा टोलाही जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे.