गुंतवणूकदारांच्या ठेवींचा अपहार करीत अनेकांना कोटय़वधीचा गंडा घालणाऱ्या ‘पीएमडी’ कंपनीच्या संचालकांना न्यायालयाने ११ दिवसांची पोलीस कोठडी दिली.
पाथरी येथील बहुचर्चित पीएमडी (पावर मनी ड्रीम्स) कंपनीने ठेवीदारांना वेगवेगळी आमिषे दाखवत मोठय़ा प्रमाणात पसा गोळा केला. मुंजाजी मळीराम डुकरे, कृष्णा मुरलीधर अबूज या आरोपींविरुद्ध पाथरी पोलिसांत यापूर्वीच गुन्हा नोंदविण्यात आला. गुंतवणूकदारांनी केलेल्या कोटय़वधी रुपयांच्या गुंतवणुकीचा अपहार करून फसवणूक केल्याबद्दल या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविल्यानंतर गुन्ह्याची व्याप्ती व अपहाराची रक्कम पाहता पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्याकडे वर्ग केला.
ठेवीदारांची फसवणूक व रकमेचा अपहार तपासात निष्पन्न झाल्याने महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध रक्षण अधिनियमाच्या कलमानुसार आता या प्रकरणातील गुन्हे वाढविण्यात आल्याचे मुगळीकर यांनी स्पष्ट केले. गुन्ह्यातील अटक आरोपी डुकरे व अबूज यांना स्थानिक गुन्हा शाखेकडे तपास येण्यापूर्वी मंगळवापर्यंत पोलीस कोठडी दिली होती. तपास हस्तांतरण झाल्यानंतर अतिशय जलदगतीने एका दिवसात पुरावा हस्तगत करण्याचे प्रयत्न झाले. पीएमडी कंपनीकडून एजंटास व्यवसाय विस्तारासाठी प्रोत्साहन म्हणून देण्यात आलेली स्वीफ्ट डिझायर मोटार जप्त करण्यात आली. तसेच आरोपीची स्थावर मालमत्ताही शोधून काढण्यात आली. मंगळवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता विशेष सत्र न्यायाधीश डॉ. वाय. सी. चावरे यांनी ११ दिवसांची पोलीस कोठडी दिली.