जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. दानवे यांना ३२व्या फेरीअखेर सहा लाख ८४ हजार १७४ , तर त्यांचे काँग्रेसचे प्रतिस्पर्धी विलास औताडे यांना तीन लाख ५९ हजार १५० मते मिळाली होती. दानवे यांचा सव्वातीन लाख मताधिक्य़ांनी विजय मानला जात आहे.

मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच दानवे यांनी मताधिक्य घेतले आणि ते शेवटपर्यंत कायम राखले. उमेदवारी अर्ज भरतानाच दानवे यांनी विजयाबद्दल प्रचंड आत्मविश्वास व्यक्त केला होता. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना-भाजपची युती झाली आणि एकमेकांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आणि दानवे यांच्यातही दिलजमाई झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर खोतकर यांची मैत्री पूर्ववत झाल्यानंतर दानवे यांच्यासमोर प्रमुख आव्हान संपुष्टात आले होते. त्यातच काँग्रेससमोर उमेदवारी कुणाला द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. जिल्हा काँग्रेस कमिटीने शिफारस केलेली तिन्हीही नावे मागे पडल्यावर विलास औताडे यांना त्या पक्षाने उमेदवारी दिली.

निवडणूक प्रचाराच्या काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे दानवे दहा दिवस प्रचारात नव्हते. मतदारसंघातील मुख्यमंत्र्यांच्या दोन सभांनाही त्यांना उपस्थित राहता आले नाही. प्रकृतीच्या कारणामुळे जालना येथील अमित शहांच्या जाहीर सभेस उपस्थित राहूनही त्यांना तेथे भाषण करता आले नव्हते. परंतु अशाही परिस्थितीत दानवे यांनी निवडणुकीचे नियोजन केले. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी या काळात प्रचारयंत्रणा राबविण्यावर लक्ष दिले. विरोधकांकडून नकारात्मक प्रचार केला जात असतानाही दानवे यांनी निवडणुकीच्या काळात कधी आक्रमकपणे तर कधी समजूतदारीच्या भावनेतून आपली बाजू मांडली.

यापूर्वी दोन वेळेस विधानसभेवर आणि चार वेळेस लोकसभेवर अशा प्रकारे सलग सहा वेळेस विजयी होणारे दानवे निवडणुकीच्या राजकारणात वाकबगार मानले जातात. आता पाचव्यांदा लोकसभा निवडणूक जिंकून त्यांनी याचा प्रत्यय आणून दिला आहे.

दानवे यांनी यावेळेस जालना शहर आणि मतदार संघातील विकासाचा मुद्दा प्रचारात आणला होता. त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारने केलेली विकासाची कामेही त्यांच्या प्रचारात होती. वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला मोठय़ा प्रमाणावर मते मिळाली नसल्याने त्याचा कोणताही परिणाम दानवे यांच्या विजयावर होऊ शकला नाही.दानवे यांचा प्रचंड मतांनी विजय झाल्याबद्दल अर्जुनराव खोतकर यांनीही आनंद व्यक्त केला.

भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा सत्कार करताना राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पालकमंत्री बबनराव लोणीकर, भास्कर अंबेकर

जनता विकासाच्या बाजूने उभी

केंद्र आणि राज्य सरकारांनी पाच वर्षांत केलेला विकास तसेच सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या धोरणांचा हा विजय आहे. जालना मतदारसंघातही विकासाची कामे झाली असून कधी नव्हे एवढा निधी सरकारने दिला आहे. त्यामुळे जनता विकासाच्या बाजूने उभी राहिली. मित्र पक्षांनीही सहकार्य केले.

रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.