शेतकऱ्यास मदत नाही, शेतमालास योग्य भाव नाही, बँकांद्वारे कर्जही नाही आणि विजेच्या जोडण्याही तोडून टाकल्याने शेतकरी निराश झाला असून आत्महत्येच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. सरकारच्या या नीतीविरोधात विदर्भ व मराठवाडय़ातील प्रत्येक तालुकास्तरावर ९ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन केले जाणार असून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाजपसह सर्व विरोधी पक्षाचे आमदार एकत्रितपणे सरकारवर तुटून पडतील, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
विदर्भ व मराठवाडय़ात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उचलून धरला. शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, पण मदत मिळाली नाही. ज्यांना मदत मिळाली त्यांच्यापैकी कुणाला ८०, कुणाला २००, तर कुणाला २७५ रुपयांचे धनादेश दिले गेले. मदतीपेक्षा सरकारने थट्टाच केली. हक्काची मदत नाही, हे सरकारने दाखवून दिले. सोयाबीनच्या हमी भावातही सरकारने फसवणूक केली. सोयाबीनचा उतारा कमीच असून भावही कमीच आहे. शेतकरी आता उताराच घेऊ नये, या मानसिकतेत आला आहे.
कापसाला सरकार ३ हजार ९०० रुपये, तर व्यापारी ४ हजार २०० रुपये भाव देत आहेत. किमान सहा हजार रुपये हमी भाव दिला तरच मदत दिल्यासारखे होईल. धानाला १ हजार ३५० रुपये भाव दिला जात आहे. कृषी मूल्य आयोगाच्या अहवालानुसार धानाचे उत्पादन मूल्य दोन हजार रुपये असताना हमी भाव १ हजार ३१० रुपये कसा दिला जात आहे, असा सवाल फडणवीस यांनी केला.
खरीप हंगाम अतिवृष्टीत गेला. पाणी मुबलक असल्याने रबी हंगाम चांगला जाईल, या आशेने शेतकऱ्याने पिके घेतली, पण वीज कनेक्शन कापले. राज्यात सुमारे सात लाख वीज कनेक्शन्स कापण्यात आले असून त्यातील बहुतेक विदर्भ व मराठवाडय़ातील आहेत. जिल्हा बँकाही कर्ज देत नाहीत. चार जिल्हा बँकांनी ५० टक्केही कर्ज दिलेले नाही. राज्यात सावकारांची संख्याही वाढली असून त्यांनी दिलेल्या कर्जाची रक्कमही वाढली. मदत नाही, कर्ज नाही, भाव नाही, वरून वीज कनेक्शनही कापले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे.
विदर्भात रोज सरासरी ३ ते ५ आत्महत्या होत आहेत, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. सरकारच्या शेतकरी नीतीच्या विरोधात विदर्भ व मराठवाडय़ातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ९ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन केले जाईल. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सर्व विरोधी पक्ष सरकारवर तुटून पडतील, असे फडणवीस यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला कृष्णा खोपडे, विजय घोडमारे, सुधीर पारवे व विकास कुंभारे हे आमदार उपस्थित होते.