वेध विधानसभेचा

नीलेश पवार, नंदुरबार

लोकसभा निवडणुकीत भाजपने विधानसभानिहाय केलेली चमकदार कामगिरी आणि त्यातच प्रमुख नेत्यांना प्रवेश देऊन भाजपने काँग्रेसच्या परंपरागत नंदुरबारच्या गडाला खिंडार पाडले आहे. आघाडीच्याजागावाटपात कोणता मतदारसंघ कोणाकडे जाणार याबद्दल अनिश्चितता आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीने राजकीय वातावरण ढवळून निघाले असून बहुतांश जागांवर घराणेशाहीचाच जोर राहणार असल्याचे चित्र आहे.

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्य़ातील चारपैकी दोन विधानसभा मतदारसंघात कमळ फुलवत भाजपने मागील निवडणुकीत काँग्रेसला हादरा दिला होता. मात्र त्यानंतर जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने प्राबल्य राखले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने हा मतदारसंघ कायम राखला. या निवडणुकीत विधानसभानिहाय घेतलेली मते आगामी निवडणुकीत काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

मागील निवडणुकीत नवापूर आणि धडगाव या दोन जागांवर काँग्रेसने विजय संपादित केला होता. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघांत काँग्रेसचे मताधिक्य अतिशय कमी झाले. काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपने नवीन रणनीती आखली आहे. नवापूरसह संपूर्ण जिल्ह्य़ावर प्रदीर्घ काळ प्राबल्य राखणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे आमदार सुरूपसिंग नाईक यांनी नवापूरचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. आता पुत्र शिरीष नाईकला काँग्रेसची उमेदवारी मिळावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. नाईकांना आव्हान देण्यासाठी भरत गावितांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार शरद गावित यांनी या मतदारसंघावर दावा सांगितला असून हा मतदारसंघ काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीला सोडावा, अशी भूमिका घेतली आहे. या मतदारसंघात काँग्रेस आघाडीसमोर वेगळेच त्रांगडे उभे आहे.

शहादा-तळोदा मतदारसंघात गेल्या वेळी भाजपच्या उदेसिंग पाडवी यांनी माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा अवघ्या ७०० मतांनी पराभव केला होता. हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला. यंदा त्याचा वचपा काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. भाजपने काँग्रेसचे सहकार महर्षी पी. के. पाटील यांचे पुत्र दीपक पाटील यांना भाजपमध्ये स्थान देत या मतदारसंघातील मनसुबे जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित हा मतदारसंघ काँग्रेसला गेल्यास काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काँग्रेसे अक्कलकुवा-अक्राणी विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व असले तरी आगामी निवडणूक सोपी राहिलेली नाही. तब्बल सहावेळा या मतदारसंघातून अ‍ॅड. के. सी. पाडवी विजयी झाले आहेत. असे असताना लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारास या मतदारसंघात अवघ्या १०० मतांची आघाडी मिळाली. या आकडेवारीने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता आहे.

पाडवी यांना शह देण्यासाठी ऐन वेळी या मतदारसंघात डॉ. विजयकुमार गावित मैदानात उतरण्याची खेळी करू शकतात. पण राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले डॉ. गावित हे पक्षावर नाराज असल्याचे सांगितले जाते. नंदुरबार जिल्ह्य़ात भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न करूनही पाच वर्षे पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे डॉ. गावित शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. खुद्द डॉ. गावित या विषयावर बोलण्यास तयार नाहीत. गेल्या वेळी ते भाजपच्या तिकिटावर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांच्यासमोर आव्हानात्मक नेतृत्व उभे करण्यास काँग्रेसला अपयश आले.

आमदार चंद्रकांत रघुवंशी हे काँग्रेसचा गड राखण्यासाठी धडपडत आहेत. डॉ. गावित स्वत: शिवसेनेकडून अक्कलकुवा-अक्राणीमधून मैदानात उतरल्यास नंदुरबार विधानसभा मतदारसंघात ते लहान कन्येला पुढे आणतील, अशी चर्चा आहे. त्यामुळेच सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्य़ात विधानसभा निवडणुकीत घराणेशाही वेगळी उंची गाठण्याच्या मार्गावर आहे.

नंदुरबार

राजकीय चित्र

नंदुरबार –      भाजप

नवापूर –       काँग्रेस

शहादा-तळोदा – भाजप

अक्कलकुवा-अक्राणी –       काँग्रेस

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्य़ातील चारपैकी दोनच विधानसभा क्षेत्रांत भाजपला मताधिक्य मिळाले. त्यातही तळोदा-शहादा मतदारसंघात भाजपला अवघे दोन हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. जिल्ह्य़ात काँग्रेसची ताकद आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तीन मतदारसंघात सहजपणे विजय मिळेल.     – आ. चंद्रकांत रघुवंशी  (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस)

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जो चौफेर विकास साधला, त्यामुळे नंदुरबार जिल्ह्य़ातील चारही विधानसभा क्षेत्रात शतप्रतिशत भाजप विजयी होईल, हा विश्वास आहे. गिरीश महाजन यांची व्यूहरचना आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसमुक्त केला जाईल. – विजय चौधरी   (जिल्हाध्यक्ष, भाजप)