परिक्षेत्रीय क्रीडा स्पध्रेतील खेळाडू व निमंत्रितांसाठी दिलेल्या ‘शाही’ भोजनाचे सुमारे दीड लाख रुपयांचे बिल थकल्याने मोहम्मद अली चाऊस या व्यावसायिकाने कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
येथे असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयांतर्गत िहगोली, परभणी, नांदेड व लातूर या जिल्ह्यांचा कारभार चालवला जातो. पोलिसांच्या जिल्हास्तरीय क्रीडा पार पडल्यानंतर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा होतात. या स्पध्रेतील यशस्वी खेळाडूंना राज्यस्तरीय क्रीडा स्पध्रेत सहभाग मिळतो. दरवर्षी परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा एखाद्या जिल्ह्यात पार पडतात. २०१३मध्ये नांदेडमध्ये आयोजित केलेल्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पध्रेत िहगोली, लातूर व परभणी जिल्ह्यांचे पोलीस अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. समारोपाच्या दिवशी स्पध्रेसाठी आलेल्या खेळाडूंना व निमंत्रितांना ‘बडा खाना’ (शाकाहारी व मांसाहारी जेवण) देण्याची प्रथा आहे.
तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या आदेशावरून या शाही भोजनाचे कंत्राट मोहम्मद अली चाऊस यांना देण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या जेवणाचे उपस्थितांनी तोंड भरून कौतुकही केले होते. २०१३च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी भोजन दिल्यानंतर नियमानुसार १ लाख ३५ हजार रुपयांचे बिल पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर केले. शिवाय हे बिल मिळावे, यासाठी त्यांनी अनेकदा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उंबरठे झिजवले. सुरुवातीला आज देऊ, उद्या देऊ असे म्हणत त्यांची बोळवण करण्यात आली. नंतर मात्र त्यांना संबंधित कर्मचाऱ्यांनी अक्षरश: झिडकारलेच.
सुमारे दीड वर्षांपूर्वी त्यांनी हे कंत्राट देताना व्याजाने पसे घेतले होते. एकीकडे बिल नाही तर दुसरीकडे व्याजाचा आकडा दिवसेंदिवस फुगत असल्याने हतबल झालेल्या मोहम्मद अली चाऊस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. पण तेथेही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे बुधवारी त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देऊन लक्ष वेधले. दीड वर्षांपूर्वीचे आपले बिल न मिळाल्यास कुटुंबासमवेत विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला.
विद्यमान पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांना या थकीत बिलाची कल्पना नाही. आपल्यापर्यंत हा विषयच अजून आला नाही. आमच्या कार्यालयाकडे बिल थकीत असेल, अन् नियमानुसार ते बिल अदा करण्याचा अधिकार मला असेल तर ते तात्काळ दिले जाईल. हे बिल थकीत का राहिले, याबाबत मात्र त्यांनी कोणतेही भाष्य करण्याचे टाळले.