मागील काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक वसई पूर्वेतील भागातील जंगलपट्ट्याला आगी लागण्याचे प्रकार सुरुच आहेत. शुक्रवारी पुन्हा रात्री वसई पूर्वेतील सातीवली खिंडीतील जंगलपट्ट्याला भीषण आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

वसई पूर्वेतील भागात मोठ्या प्रमाणात जंगल पट्टा आहे. यातील काही भाग तुंगारेश्वर अभयारण्यात येतो तर काही भाग मांडवी वनविभाग परिक्षेत्रात येतो. मागील आठवडा भरापासून येथील जंगलांना आगी लागण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नुकताच मंगळवारी तुंगारेश्वर अभयारण्यातील  नागले ते पाये येथील डोंगराला आग लागली होती. तीच घटना ताजी असताना शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पुन्हा सातीवली येथील जंगलाला आग लागली. जंगलात सुकलेले गवत असल्याने जंगलात आग वेगाने पसरत होती. याची  येथील नागरिकांनी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत झुडपांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. परंतु आगीची भीषणता अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात जंगलपट्टा आगीत जळून खाक झाला आहे.

सातत्याने लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे शिकारी करण्यासाठी अशा प्रकारच्या आगी लावल्या जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या गैरकृत्यामुळे वसईच्या भागातील जंगलपट्टा व येथील वन्यजीव धोक्यात आले आहेत.