राज्यातील पहिली बुलेट ट्रेन नगर-मुंबई धावावी व सुपे एमआयडीसीत जपानच्या मोठय़ा कंपन्यांच्या शाखा सुरू व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी काल, सोमवारी वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील एका कार्यक्रमात दिली.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कॉर्पोरेशन बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या धनादेशांचे वितरण वडगाव गुप्ता येथील कार्यक्रमात शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. शिवाजी कर्डिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या जपानच्या दौऱ्यामुळे अनेक महत्त्वपूर्ण करार करण्यात आले, त्यामुळे राज्यातील कोटय़वधी रुपयांची विकासकामे पूर्ण होणार आहेत. पंतप्रधान मुद्रा योजनेमुळे गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी दूर होण्यास मदत होणार आहे, असा दावा शिंदे यांनी केला. आ. कर्डिले यांनी मुद्रासारख्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामसभा बोलावल्या जाव्यात. तरुणांना अर्थपुरवठा करून स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी बँकांनी पुढे यावे, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी अनिल कवडे, पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, बँकेचे उपमहाप्रबंधक के. बसवराज आदींची भाषणे झाली. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्याम पिंपळे यांनी प्रास्ताविकात ६० बेरोजगारांची प्रकरणे मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. या वेळी परिसरातील रहिवाशांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र आदींचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा नियोजनने वार्षिक योजनेतून मंजूर केलेल्या वडगाव गुप्ता ते नदीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
बँकेचे शाखाप्रबंधक कुमार दिलीप आनंद, पंचायत समितीचे सदस्य राजू शेवाळे, उद्योजक माधवराव लामखडे, जगदंबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब गव्हाणे आदी उपस्थित होते. रियाज पठाण यांनी सूत्रसंचालन केले.