हेमेंद्र पाटील, लोकसत्ता

बोईसर : तारापूरमध्ये प्रदूषणाचा स्तर वाढत असतानाही कायद्यातील पळवाटा शोधून कारखानदारांना मोकळीक देत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्याचा  प्रदूषणावरून  पाणीपुरवठा बंद करण्यासाठी नोटीस काही तासांनंतर कुचकामी ठरली आहे. या कारखान्याचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. प्रदूषण  नियंत्रण मंडळाच्या पत्रानंतर ही कार्यवाही सुरू करण्यात आली.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील डी. एच. ऑरगॅनिक प्रदूषणकारी कारखान्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठपका ठेवत १६ जानेवारी रोजी कारखाना बंद करण्यासाठी नोटीस बजावली होती. त्याप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा विभागाला पत्र देऊन कारखान्यांचा पाणीपुरवठा ७२ तासांत बंद करण्याते स्पष्ट केले होते,  परंतु दुसरा दिवस उलटून जात नाही तोवरच मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डी. बी. पाटील यांनी पुन्हा कारखान्याला सुरक्षतेचे कारण पुढे करत पाणीपुरवठा सुरू करण्याचे पत्र दिले. १६ जानेवारी रोजी एकूण चार कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद केला होता, परंतु कामगारांती सुविधा वा इतर गोष्टींसाठी पाणी वापरासाठी इतर कारखान्यांना कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात आली नाही. यातच डी. एच. ऑरगॅनिक कारखान्याला दिलेल्या सवलतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर सवाल उपस्थित केले जात आहेत.

औद्योगिक क्षेत्रातील डी. एच. ऑरगॅनिकला १५ मिलीमीटरची जलजोडणी कारखान्यातील इतर सुविधांसाठी देण्यात आली होती. कारखान्यात प्रदूषण केल्याचे वरिष्ठ स्तरावरून आलेल्या समितीने निदर्शनास आणून दिल्यानंतर पाणी बंदचे आदेश देण्यात आले होते. मात्र एका दिवसातच पुन्हा कारखान्याचा पाणीपुरवठा  करण्यात आला आहे.

प्रदूषण स्तर वाढताच

तारापुर औद्य्ोगिक क्षेत्रात गेल्या वर्षभरापासून कारखाने ‘बंद-सुरू’चा खेळ सुरू आहे. एखाद्या कारखान्याला प्रदूषण केले म्हणून कारखाना बंद करण्याची नोटीस दिली जाते. त्यानंतर कारखान्याचे ७२ तासाच्या नंतर विज व पाणी बंद करून कारखाना बंद केला जातो. मात्र याच वेळेत कारखानदार कायद्यची पळवाट शोधून बँकेची हमी देऊन एक-दोन दिवसातच आपले कारखाने पुन्हा सुरू करण्याचे आदेश प्रादेशिक अधिकारी ठाणे यांच्याकडून घेऊन येतात. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कितीही नोटीसा बजावण्याचा कांगावा केला असला तरी तारापुर मधील प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढलेलाच दिसत आहे.