राज्यातील सत्तासंघर्षाला शनिवारी अगदीच अनेपेक्षित कलाटणी मिळाली. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ शनिवारी घेतली. अचानक घडलेल्या या शपथविधीमुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर अजित पवारांनी दिलेलेलं समर्थन हे वैयक्तीक आहे हा राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर दिवसभर रंगलेल्या राजकीय नाट्यामध्येे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबामध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झालं. असं अतानाच शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडियावरुन पवार कुटुंबाबद्दल एक भावनिक पोस्ट केली.

रोहित यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अनेकदा इतिहासाचा दाखला देत पवार कुटुंबाबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. “लहानपणापासून साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते,” असं रोहित यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अजितदादांना शरद पवारांनी वडिलांप्रमाणे प्रेम दिल्याचंही रोहित यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही,” असं रोहित यांनी लिहिलं आहे.

“आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत, पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यंत लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत अशा वेळी कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं,” पवार कुटुंब पुन्हा एकत्र यावं अशी इच्छा रोहित यांनी व्यक्त केली आहे.

पोस्टच्या शेवटी रोहित यांनी “लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटतं,” असं म्हटलं आहे.

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारपरिषद घेऊन “भाजपा आणि अजित पवारांनी बैठकीला उपस्थित राहाणाऱ्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या असणारी यादी दाखवून तो पाठिंब्याचे पत्र असल्याचे सांगत राज्यापालांची फसवणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही,” असं म्हटलं होतं.