– धवल कुलकर्णी

न खीचो कमान को, ना तलवार निकालो, जब तोप मुकाबिल है, तो अखबार निकालो! शिवसेनेचा श्रीगणेशा झाला, त्या मार्मिकचं हे बोधवाक्य…
शिवसेनेपुरतं बोलायचं झालं तर या वाक्याचा अर्थ मार्मिकने खरा करून दाखवला. कारण, एका व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यातून आणि त्याने सुरू केलेल्या एका व्यंगचित्राला वाहून घेतलेल्या साप्ताहिकातून, एका राजकीय पक्षाचा आणि विचारांचा जन्म झाल्याचं दुसरं कुठलंही उदाहरण निदान भारतात तरी नाही…

कालांतराने (१९८९) शिवसेनेने सामना वर्तमानपत्रही सुरू केले. त्या वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत हेच सध्या भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या मुलुख मैदानी तोफेची भूमिका बजावत आहेत हे ही तितकच महत्त्वाचं…  शिवसेना-भाजपचे संबंध आज जरी फाटले असले, तरीसुद्धा राऊत हे आधीपासून सेनेमधल्या भाजप विरोधी गटाचे एक म्होरके मानले जातात.

त्यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे, तो म्हणजे संजय राऊत को गुस्सा क्यू आता है? दुसरं, हे संजय राऊत नेमके आहेत तरी कोण?

जंगलामध्ये अनेक हिंस्त्र श्वापदं राहतात. त्यात एखादा वाघासारखा प्राणी असतो जो आपल्या तीक्ष्ण दातांनी किंवा अणुकुचीदार नखं असलेल्या पंज्यांच्या एका फटक्याने भक्ष्याची थेट खांडोळी करू शकतो. पण ह्या जंगलात अजगरासारखे पोटात पाय असणारे काही सरपटणारे प्राणी सुद्धा आहेत… हा अजगर कधी कुणाला चावणार नाही. परंतु एका मोठ्या प्राण्याला सुद्धा वेटोळे घालून हळूहळू त्याचा श्वास गुदमरून लीलया त्याला गिळून टाकेल… भारतीय जनता पक्ष असाच अजगरासारखा असून, मित्रपक्षांना दात सुद्धा न लावता गिळून टाकणारा प्राणी आहे, असं म्हणणारा वर्ग शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये आहे.

अर्थात त्याला इतिहासातले काही दाखले सुद्धा आहेत. एकेकाळी भाजपचे मित्रपक्ष असणारे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व आसाम गण परिषद यांचा आज सुरू असलेला अस्तित्वासाठी चा झगडा या चाणाक्ष नेत्यांच्या नजरेतून चुकलेला नाही. दुसरी गोष्ट अशी आतापर्यंत भाजप हा नेहमी एका विशिष्ट, मर्यादित वर्गाचा राजकीय विचार मनाला जायचा. त्याउलट, शिवसेनेचा पाया व सामाजिक अवकाश हा तुलनेने फारच मोठा होता व आहे. भाजपला खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात हात पाय पसरायचे असतील, तर कुठेतरी शिवसेनेच्या मागे असणारा वर्ग स्वतःकडे घेतल्याशिवाय ते होऊ शकणार नाही हे ही या चाणाक्ष नेत्यांच्या नजरेतून सुटले नाही… दूसरा, शिवसेनेच्या विरोधात भाजपने वेळोवेळी केलेल्या कुरघोड्या, उदाहरणार्थ छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर विरोधीपक्षनेते पदावर भाजपने लगेच ठोकलेला दावा, युती सरकारच्या काळात दोन्ही पक्षांचा झालेला सत्तासंघर्ष, व राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उदयानंतर या पक्षाचा वापर करून शिवसेनेचेची कोंडी करण्याचे अगणित प्रयत्न, हे या सर्व सेना नेत्यांना खटकायचे. राऊत हे त्यापैकीच एक प्रमुख नेते.

मूळचे अलिबाग जवळच्या चौंडी गावाचे असणारे राऊत यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

खरंतर मराठी पत्रकारितेमध्ये संपादक व्हायला एकेकाळी राजकीय पत्रकार असावं असा एक अलिखित नियम होता. परंतु, मूळचे शिवसैनिक असणारे राऊत यांनी इंडियन एक्सप्रेस ग्रुपमध्ये वितरण व जाहिरात खात्यात काम केल्यानंतर आपली पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली ती लोकप्रभेतून. अर्थात, त्यापूर्वी सुद्धा लेखनाची आवड असलेले राऊत हे मार्मिक व रंजन सारख्या मासिक-साप्ताहिकातून लेखणी चालवतच होते… सामनामध्ये अशोक पडबिद्री यांच्यानंतर कार्यकारी संपादक म्हणून जाण्यापूर्वी लोकसभेमध्ये राऊतांच्या क्राईम स्टोरी या प्रचंड गाजल्या असे अजूनही जुने जाणते पत्रकार सांगतात.
तसं पाहिलं तर शिवसेनेचा आणि पत्रकारांचा 36 चा आकडा. पण शिवसेनेच्या वतीने सलग तीन वेळा राज्यसभेवर जाण्याचा विक्रम करणारे राऊत हे मराठीतले पहिले पत्रकार संपादक. यात एक लक्षणीय बाब अशी की राऊत यांचे कधीकाळचे मित्र दोपहर का सामना या शिवसेनेच्या हिंदी मुखपत्राचे माजी संपादक संजय निरुपम हे त्यांच्या पूर्वी राज्यसभेवर गेले होते. राज्यसभेवर 2004 गेल्यानंतर शिवसेनेत आपलं निष्ठा नेतृत्व प्रस्थापित करताना राऊतांना कुठेतरी पक्षातल्या तत्कालीन चाणक्यांच्या विरोधात संघर्ष करावा लागला होता.

संजय राऊत हे स्वतः मीडिया कर्मी असले तरीसुद्धा त्यांचे बंधू व विक्रोळीतून दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेलेले शिवसेनेचे आमदार सुनील राऊत हे एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यातील एक आरोपी होते हेही विशेषच. साधारणतः मराठी नेते, व विशेषत: शिवसेनेतील नेतेमंडळी ही दिल्लीच्या राजकारणात फारशी रमत नाही याला एक अपवाद म्हणजे राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा चेहरा म्हणून पुढे आलेले राऊत. याच्या मागे त्यांना मार्गदर्शन करणारे दुसरे तिसरे कुणी नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार आहेत असं सांगितलं जाते.

बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे बंधू राज ठाकरे यांचे पिताश्री श्रीकांत ठाकरे हे एक प्रचंड टॅलेंटेड व्यक्तिमत्व होतं. व्यंगचित्रकार, सिने समीक्षक, संगीतकार अशा अनेक भूमिका लीलया पार पाडणारे श्रीकांतजी हे तसे प्रचंड सडेतोड. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेक लोक त्यांना टरकून असत. पण त्यांच्या जवळ असणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये संजय राऊत होते हे कदाचित फारच कमी लोकांना माहीत असेल. राऊत हे श्रीकांत ठाकरे यांना पप्पा म्हणत व त्यांचा दोस्ताना उद्धव व राज ठाकरे या दोघांसोबत होता. इतकंच काय श्रीकांतजी यांचं आत्मचरित्र जसं घडलं तसं याच्या निर्मितीमध्ये राऊत यांचा मोलाचा वाटा होता. 1995 ला महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपच्या युतीचे सरकार आल्यानंतर जेव्हा राज ठाकरे यांच्याविरोधात रमेश किणी मृत्यू प्रकरणात आरोप झाले त्यावेळेला त्यांच्यासोबत असणाऱ्या शिवसेनेच्या काही मोजक्या मंडळींपैकी एक होते संजय राऊत.

नंतरच्या काळात झालेल्या उद्धव व राज यांच्या अंतर्गत सत्तासंघर्षामध्ये सुद्धा सामनाचे कार्यकारी संपादक असून सुद्धा राऊत यांनी आपले राज ठाकरेंसोबत चे संबंध कधी तुटू दिले नाहीत. इतकंच काय, असं सांगण्यात येतं 2005 मध्ये ज्यावेळेला राज ठाकरेंनी शिवसेनेतून राजीनामा दिला त्यावेळेला त्यांच्या राजीनामा पत्राचा खर्डा हा चक्क राऊतांनी लिहिला होता! संजय राऊत यांची लेखनाची शैली नीट माहीत असल्यामुळे म्हणे बाळासाहेबांनी त्या पत्रावरून एक नजर फिरवली आणि लगेच सांगितलं संजय हे बहुतेक तुझं काम दिसतंय…

1992 च्या दरम्यान सामनाचे कार्यकारी संपादक झाल्यानंतर राऊत हे बाळासाहेबांचा आवाज म्हणून प्रसिद्ध झाले. सामनाची व बाळासाहेबांची शैली अचूक पकडणारे राऊत हे बाळासाहेबांचे लाडके ठरले. राऊत यांचे पक्षांतर्गत विरोधक असा आरोप करतात ही कधी कधी ते या जवळिकीचा वापर आपल्या अंतर्गत विरोधकांचा काटा काढायला करायचे. वानगीदाखल बोलायचं झालं, तर वसईचे माजी आमदार विवेक पंडित यांची शिवसेनेतून झालेली हकालपट्टी.

राऊत यांनी लिहिलेले सेना स्टाईलचे धारधार अग्रलेख म्हणजे बाळासाहेबांचंच मत असं मानलं जात पण राऊत हे एकदा अडचणीत आले ते 2009 मध्ये. विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई व इतरत्र मारलेल्या अभूतपूर्व मुसंडी नंतर सामनाच्या अग्रलेखात मध्ये मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला हा एक होता. शिवसेना भवनावर झालेल्या बैठकीमध्ये हे आपलं मत नसल्याचं बाळासाहेबांनी सांगितलं आणि त्यावेळेला राऊत तोंडघशी पडल्याचे चित्र शिवसेनेत इतरत्र निर्माण झालं. असाच एक दुसरा प्रसंग 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान झाल्यानंतर राऊत यांनी मुंबईतल्या गुजराती समाजावर तोफ डागली त्यावेळी शिवसेनेला माघार घ्यावी लागली नी राऊत कुठेतरी एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले.

2008 मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी यांनी काही काळ युती करण्याबाबतचा विचार केला होता त्या विचाराचे एक जनक होते स्वतः संजय राऊत…
भाजप हा शिवसेनेचा मित्रपक्ष असला तरीसुद्धा राऊत शक्यतो भाजपसोबत कुठल्या बैठकीला जाणं टाळत असत असे म्हणतात. 2017 मध्ये शिवसेनेने स्वबळावर सर्व भावी निवडणुका लढवण्याची घोषणा केली. लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांना हा विचार गुंडाळून ठेवावा लागला हा भाग वेगळा, परंतु शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये हा ठराव राऊत यांनी मांडला होता हे महत्त्वाचं.

राऊतांना वाचनाची आवड आहे तसंच हा सिनेमातही रमणारा माणूस आहे. बाळासाहेबांच्या विचारावर आधारित असलेल्या बाळकडू व त्यांचा जीवनपट मांडणाऱ्या ठाकरे या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. राऊतांना ओळखणारी मंडळी असं म्हणतात की योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची त्यांची हातोटी ही वादातीत आहे. भारतीय जनता पक्षाशी फारकत घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह एक भाजप विरोधी व्यापक आघाडी उभारण्याचा राऊत यांचा प्लॅन हा काळाच्या कसोटीवर उतरतो का हे लवकरच कळेल. परंतु, संजय राऊत को गुस्सा क्यूं आता है, या प्रश्नाचं उत्तर या त्यांच्या गेल्या काही दशकांमधल्या शिवसेनेतल्या जडणघडणीतच दडलेलं आहे.