विक्रमी मताधिक्याचे स्वप्न अपूर्ण

आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तीनवेळा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, मुख्यमंत्री म्हणून ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने तसेच काँग्रेसने आशीष देशमुख यांच्यासारखा उमेदवार दिल्याने उपराजधानीतील दक्षिण-पश्चिम मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष  लागले होते. येथील लढत चुरशीची झाली नाही, पण अपेक्षित विक्रमी मताधिक्यही फडणवीसांना मिळवता आले नाही.

दक्षिण-पश्चिममधून फडणवीस यांचा विजय हमखास व विक्रमी राहील असे मानले जात होते. उत्तर अंबाझरी मार्गावरील मुंडले प्लॅटिनम ज्युबिली हॉल व रिहॅबिलिटेशन केंद्राच्या सभागृहात मतमोजणी केंद्रावर भाजप पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. येथे कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम यंत्र नेण्यात आले. प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे डॉ. आशीष देशमुख यांनी सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये घेतलेल्या मतांमुळे भाजप पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडी धाकधूक दिसत होती. तीन-चार फेऱ्यानंतर फडणवीस आणि देशमुख यांच्यातील मतांचे अंतर वाढत गेले. त्यांच्या अपेक्षानुरूप फेरीनिहाय मतदानाचा कल येत होता. यामुळे  कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारला. सुरुवातीला टपाली मतदानाची मोजणी झाली. यात मुख्यमंत्र्यांनी आघाडी घेतली.

ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत मुख्यमंत्री फडणवीस यांना १,८७५ तर काँग्रेसचे डॉ. आशीष देशमुख यांना ४,४४५ मते मिळाली. पहिल्या फेरीत मुख्यमंत्र्यांनी २,५७० मतांची आघाडी घेतली ती शेवटी विजयातच बदलली.

मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्याने यश मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. मतमोजणी केंद्रात भ्रमणध्वनी नेण्याची मूभा नव्हती. तरीही पोलिसांना चकवून काहींनी भ्रमणध्वनी नेलेत. यावर आपचे उमेदवार अमोल हाडके यांनी आक्षेप घेतला. दीक्षाभूमी चौक ते रहाटे कॉलनी चौकापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद  करण्यात आला. त्यामुळे काहींनी पोलिसांशी वाद घातला, तर अनेकांनी त्यांचा मार्ग बदलला. मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या वाहनांसाठी दीक्षाभूमीच्या पटांगणावर व्यवस्था करण्यात आली होती बाहेरगावावरून मतमोजणीसाठी आलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलिसांमध्येही त्यांच्या मतदारसंघांची स्थिती जाणून घेण्याची उत्सुकता  होती.जेवणाच्या सुटीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून त्यांनी हा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मतमोजणीदरम्यान सहाव्या फेरीत एक ईव्हीएम काही काळ बंद पडले होते.