सोलापूर : सोलापूरच्या न्यायालयातील तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट सह्या आणि बनावट आदेश तयार करून मुद्देमाल कक्षातील १६ लाख ६९ हजार ६७८ रूपये किंमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम हडपली आणि न्याय व्यवस्थेची प्रतिमा कलंकित केल्याबद्दल संबंधित कारकुनाला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केदार हावळे (वय ५७) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या कारकुनाचे नाव आहे. खटला २००८ सालातील असून त्याचा निकाल १६ वर्षांनी लागला आहे. केदार हावळे याने न्यायालयात कारकूनपदावर सेवेत असताना तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत अणेकर यांच्या नावाने बनावट सह्या आणि बनावट आदेश तयार करून तसेच मुद्देमाल कक्षाची चावी चोरून न्यायालयाच्या मुद्देमाल कक्ष आणि स्ट्राँगरूममधील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम काढून घेतली होती. जेलरोड पोलीस ठाणे, विजापूर नाका पोली ठाणे व मंद्रूप पोलीस ठाण्याशी संबंधित गुन्ह्यातील जप्त केलेला हा किंमती मुद्देमाल न्यायालयात जमा न करता त्याचा अपहार केला होता. जुलै २००४ ते ३० आॕक्टोंबर २००७ या कालावधीत हा प्रकार घडला असता अखेर त्याचे बिंग फुटले. तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत अणेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन २८ एप्रिल २००८ रोजी केदार हावळे याच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती.

हेही वाचा – सरकार ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी, शेतकरी साहित्य संमेलनात नाना पाटेकर यांचे प्रतिपादन

या गुन्ह्याचा तपास शहर गुन्हे शाखेचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त हरिश्चंद्र राठोड यांनी पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. तपासात आरोपी हावळे याने गायब केलेले सोने-चांदीचे दागिने सराफ वेर्णेकर, वांगीकर, रेखा गांधी यांच्याकडून हस्तगत करण्यात आले होते.

हेही वाचा – संजय राऊतांना ‘ही’ सवय आहे का? चंद्रकांत पाटलांचा प्रश्न

या खटल्याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांच्यासमोर झाली. यात फिर्यादी असलेले विद्यमान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अणेकर व तपास अधिकारी हरिश्चंद्र राठोड यांच्यासह २३ जणांच्या साक्षी घेण्यात आल्या. आरोपीविरुद्ध गुन्हा शाबित झाल्याने त्यास सात वर्षे सक्तमजुरीसह दीड लाख रूपयांचा दंड सुनावण्यात आला. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अमर डोके तर आरोपीतर्फे ॲड. रिसबूड यांनी काम पाहिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 5 lakh fine with hard labor for seven years to clerk who extorts money from court case room ssb