एक लीटर बिअर तयार होण्यास किती पाणी लागत असेल? या क्षेत्रातील मंडळी ६ ते ८ लीटर असेही मोजमाप सांगायचे. मात्र, ते दिवस गेले. सॅबमिलर या कंपनीने कार्यप्रणालीत बदल करत केवळ ३.४७ लीटर पाण्यात एक लीटर बिअर उत्पादित केली आहे. मराठवाडय़ात सतत पडणाऱ्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर होणारी टीका लक्षात घेऊन हे नवे प्रयोग कौतुकास्पद ठरत आहे. नुकतेच सीआयआय या उद्योजक संघटनेच्या प्रतिनिधींसमोरही पाण्यातील काटकसरीबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर औरंगाबादमधील इतर बिअर कंपन्याही या पाणी बचतीच्या प्रयोगाचे अनुकरण करू लागले आहेत.   
 काटकसरीने पाण्याचा वापर,  पुनर्वापर, जलपुनर्भरण यासह तोटी आणि हवेचा योग्य दाब या तंत्राने हे शक्य झाल्याचा दावा पाल्स ब्रेव्हरीजचे प्रमुख के. व्ही. बलराम यांनी केला आहे. येत्या वर्षभरात २.५ लीटर पाण्यात एक लीटर बिअर उत्पादित करण्याचे उद्दिष्ट नव्याने ठरविण्यात आले आहे. एका लिटरसाठी २.५ लीटर पाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानक मानले जाते. सध्या केवळ ऑस्ट्रेलियात एवढय़ा कमी पाण्यात बिअर बनविली जाते.
  तांदुळ, मका पोहे व इस्टरसारख्या खाद्यपदाथार्ंना आंबवून बिअर तयार होते. प्रत्येक कंपनीची पाककृती निराळी असते. बिअर पिऊन बडबडणारे, अधिक नशा करून संसाराची धूळधाण करून घेणाऱ्या नशेबाज व्यक्तीच्या आयुष्यातील स्वच्छता लक्षात घेऊन बिअर कंपनीचे भोवताल तपासले तर फसाल. थेट मानवी शरीराशी संबंध असल्याने बिअर बनविताना कमालीची स्वच्छता बाळगली जाते. बाटली अगदी भंगारातून आलेली असो की, एकदम नवी, ती धुवावी लागते. पूर्वी ती धुण्यासाठी नळाने फवारा उडविला जायचा. मात्र, आता त्याला नोजल बसविण्यात आले. परिणामी हवेचा दाब आणि पाण्याचा दाब यामुळे स्वच्छतेसाठी पाण्याचा कमी वापर होतो. एकदा कंपनीतील उत्पादन बंद झाले की, पुन्हा नव्याने ते सुरू करताना सगळी उपकरणे धुवून घ्यावी लागतात. त्यामुळे यंत्रसामुग्री सातत्याने बंद पडू नये, याची काळजी घेण्यात आली. मूलत: इमारतीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यात आले. ज्या पाण्याचा प्रत्यक्ष बिअरमध्ये समावेश होतो, असे पाणी वेगळे आणि शुद्धीकरणानंतर बिअरशिवाय लागणारे पाणी वेगळे, अशी प्रक्रिया हाती घेण्यात आली. बऱ्याच पाणी थंड करण्यासाठी अथवा गरम करण्यासाठी कुलिंग टॉवर उभारले जातात. ही प्रक्रिया करतानाही वेगळ्या प्रकारची काळजी घेण्यात आली. पाणी अधिक थंड करण्यासाठी टाक्या बांधण्यात आल्या. ज्यामुळे नव्याने थंड पाणी घेण्याची प्रक्रिया टळली.
 शहरातील वाळूज औद्योगिक वसाहतीत पाल्स ब्रेव्हरीजमध्ये शुद्धीकरणाच्या तंत्रात बदल करताना ‘५ आर’ हे धोरण स्वीकारण्यात आले. रिप्लीनेस, रेडय़ुस, रिसायकल, रियुज आणि रिडिस्ट्रीब्युशन या शब्दांच्या भोवती हे धोरण ठरविले गेले. २००८ मध्ये पाणीबचतीचे हे प्रयोग सुरू करण्यात आले. तेव्हा एक लिटर बिअरसाठी साधारण साडेपाच ते सहा लिटर पाणी लागायचे. पाण्याचा वापर त्यानंतर ८ टक्क्य़ाने कमी करण्यात आला. शुद्धीकरण केलेले पाणी आणि अशुद्ध पाणी याची व्यवस्थाही बदलण्यात आली. या पाण्याचा थेट बिअर बनविण्याशी संबंध येत नाही, असे पाणी अन्यत्र वापरण्यात आले. बाटल्या स्वच्छ करण्यासाठी काही वेळा पाश्चराइड करण्यात आल्या. पाण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग केल्याने आता ३.४७ लिटर पाण्यात १ लिटर बिअर केली जात आहे. मोठमोठय़ा टाक्यांमध्ये बिअर तयार होण्याची प्रक्रिया अधिक पाणी लागणारी आहे, असे मानले जाते. मात्र, त्यावर बलराम आणि त्यांच्या चमूने मात केली आहे.