सांगली : सांगलीच्या सईची गोष्टच न्यारी, याची प्रचिती देत नऊ वर्षांच्या सईने एका तासात ११ लावण्या आणि तेही स्केटिंग करत सादर करून सांगलीकरांची वाहवा तर मिळवलीच, पण त्याचबरोबर चार विक्रमांवर आपले नाव कोरले.

स्केटिंग करताना तोल सांभाळत गिरकी घेत लावणीच्या ठेक्याबरोबर पदन्यासाचा तोल सांभाळत  नऊ वर्षांची चिमुकली सई शैलेश पेटकर हिने लावणी स्केटिंगचा विश्वविक्रम नोंदविला.  लावणी स्केटिंगमध्ये प्रथमच विश्वविक्रम नोंदविला जाणार असल्याने नेमिनाथनगर येथे शेकडो प्रेक्षक सायंकाळपासून प्रतीक्षेत होते.

नऊ वर्षांची सई लावणी स्केटिंग या नवख्या प्रकारात विक्रम नोंदविणार असल्याने सांगलीकरांना उत्सुकता होती. सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी वंडर बुक, जीनिअस बुक, भारत वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन स्टार वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनोख्या कामगिरीची नोंद करण्यासाठी सईने उपस्थित प्रेक्षक, परीक्षक आणि पाहुण्यांना अभिवादन करीत लावणीवर नृत्यास सुरुवात केली. ‘मराठमोळं गाणं हे लाखमोलाचं सोनं’ या लावणीवर उपस्थितांना मुजरा करीत तिने गिरकी घेतली व उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

‘ज्वानीच्या आगीची मशाल’, ‘दिसला गं बाई दिसला’, ‘मला लागली कुणाची उचकी’, ‘बुगडी माझी सांडली गं,’ ‘आई, मला नेसव शालू नवा’,‘ रेशमाच्या रेघांनी’ अशा लावण्यांवर न थकता तिने अदाकारी सादर केली. प्रत्येक नृत्यानंतर टाळ्यांचा कडकडाट करून सईला प्रोत्साहन दिले जात होते.

शेवटच्या पाचव्या मिनिटात टाळ्यांचा गजर वाढल्यानंतर सईलाही हुरूप आला. तिने आणखी जोमाने नृत्य करीत वाहवा मिळवली. मिनिट काटा सात वाजून दहाव्या मिनिटावर सरकल्यानंतर सईचे वडील शैलेश पेटकर यांनी रिंगवर येऊन तिला खांद्यावर उचलून घेतले. आई प्रतिभा यांनीही तिला मिठीत घेतले.

महापौर संगीता खोत, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, लक्ष्मण नवलाई, गीता सुतार, राहुल आरबोळे, स्केटिंग अ‍ॅकॅडमीचे प्रा. शिवपुत्र आरबोळे आणि परीक्षक उपस्थित होते. सईने विश्वविक्रम पूर्ण केल्याचे परीक्षकांनी जाहीर केले.