जिल्हय़ास गेल्या १५ दिवसांपासून गारपिटीचा तडाखा बसला असून सरासरी १२० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला.
पावसाळय़ातही कधी सलग पाऊस पडत नाही. मात्र, अवकाळीत पावसाने १५ दिवसांपासून गारपिटीसह दमदार बरसात केली. या पावसाने शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान केले. निलंगा तालुक्यातील निटूर, पानचिंचोली, निलंगा, कासारशिरसी, रेणापूरमधील पानगाव, रेणापूर, कारेपूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरूर अनंतपाळ, उजेड, औसा तालुक्यातील औसा, किणीथोट, भादा, किल्लारी, तसेच चाकूर तालुक्यातील नळेगाव या महसूल मंडळास पावसाचा सर्वाधिक फटका बसला.
दरम्यान, किल्लारी परिसरात द्राक्ष बागायतदारांचे या पावसाने प्रचंड नुकसान झाले. संजय चितकोटे व निळकंठ हंडे या शेतक-यांच्या बागेचे मोठे नुकसान झाले. बाजारात माल विकणे शक्यच नव्हते. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांनी फुकट द्राक्ष घेऊन जाण्याचे आवाहन नागरिकांना केले. टोमॅटो, पपई, आंबा, डाळिंब, केळीच्या बागा व भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले. हरभरा, करडई, गहू व ज्वारी पिकांच्या नुकसानीला तर सीमाच नाही. नुकसान इतके मोठे आहे की, आता शेतावरील पिकाची काढणी करण्याची कोणतीही ताकद आता शेतक-यांमध्ये शिल्लक नाही.
निलंगा तालुक्यातील निटूर मंडळात तब्बल २५९ मिमी, तर पानचिंचोली मंडळात २०६ मिमी पाऊस झाला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या एक तृतीयांश आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाव मंडळात एकाच दिवशी तब्बल १४३ मिमी, तर कारेपूर मंडळात ९५ मिमी पाऊस पडला. गारपिटीच्या तडाख्यात रेणापूर तालुक्यातील पानगावची सरासरी २०६, रेणापूर २०५, तर कारेपूरची १९८ मिमी आहे.
औसा तालुक्यातील भादा मंडळात १६८, किणीथोट २०५ मिमी, उदगीर तालुक्यातील नळगीर मंडळात १७३, चाकूर तालुक्यातील नळेगाव मंडळात १७१ मिमी अशी विक्रमी पावसाची नोंद झाली. किल्लारी परिसरात मोठय़ा प्रमाणात द्राक्षबागायत आहे.
गावोगावी नुकसानीच्या हृदयद्रावक कहाण्या ऐकावयास मिळत आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळे सर्वच पक्षांची मंडळी शेतक-यांना सरकारने तातडीची मदत द्यावी, अशा मागण्या करीत आहेत, इतकाच काय तो शेतक-यांना दिलासा. पण प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत वाट पाहण्याशिवाय काय करू शकणार, हाही प्रश्नच. किंबहुना सरकार काही करणार नाही, मदत तर मिळणारच नाही, याची खात्रीच अनेक शेतक-यांना आहे. किमान निसर्गाने हिरावून घेतल्यावर पुन्हा बँक, महावितरणच्या तगाद्यामुळे जगायचे कशाला? अशी भावना निर्माण होणार नाही याची पुरेशी काळजी घेतली तरी खूप झाले, अशीच भावना गावागावांतून व्यक्त होत आहे.
शेतक-यांच्या प्रश्नांवरून
कुरघोडय़ांचे राजकारण!
निवडणुकीच्या निमित्ताने शेतक-यांच्या मागण्यांवरून एकमेकांवर कुरघोडय़ा करण्याचे राजकारण आता सुरू झाले आहे. जि. प. च्या अध्यक्षानेच पुढाकार घेऊन शेतक-यांच्या मदतीसाठी सर्वपक्षीय बठक बोलविण्याचे लातूर हे राज्यातील एकमेव उदाहरण ठरावे. अर्थात, लातूर जि. प. चे अध्यक्ष हे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या सूचनेमुळे लातूरला उमेदवार ठरविण्यासाठी काँग्रेस पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने निवडणूक होईल, असे ठरवण्यात आले असल्यामुळे जि. प. अध्यक्षांना या भूमिकेचा लाभ होण्याची चिन्हे आहेत. अध्यक्षांच्या पुढाकाराने मात्र त्यांच्याच पक्षातील अन्य उमेदवारांचा मात्र जळफळाट होत आहे. दुसरीकडे जि. प. अध्यक्षाने शेतक-यांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेतला असला तरी सरकारकडून शेतक-यांना पाहिजे तसा न्याय मिळणार नाही. त्यामुळे पुढाकार घेऊनही काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसणार हे गृहीत धरून अन्य विरोधी पक्षही जोमाने शेतक-यांच्या बाजूने उभे राहात आहेत. गारपिटीचा मार शेतक-यांना बसला. मदत दिली गेली नाही तर निवडणुकीत त्याचा मार कोणाला बसेल? याचे आडाखे बांधले जात आहेत.