चालू वर्षांत राबविण्यात येणाऱ्या निर्मल भारत अभियानासाठी जिल्हय़ातील १३३ गावांची निवड झाली. या गावांना १९ कोटी ७७ लाख रुपये निधी देऊन त्यातून २६ हजार २२८ शौचालये बांधली जाणार आहेत.
निर्मल भारत अभियानात मागील वर्षांत लातूरने राज्यात पाचवा, तर मराठवाडय़ात सलग ३ वष्रे पहिला क्रमांक पटकावला. पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत जिल्हय़ातील निर्मलग्राम होणाऱ्या गावांना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियानांतर्गत प्रथम प्राधान्य दिले जाईल. एपीएल व बीपीएलमधील कुटुंबांना निर्मल भारत अभियानांतर्गत ४ हजार ६०० रुपये, तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत ५ हजार ४०० रुपये असे एकूण १० हजार रुपये शौचालय बांधण्यास दिले जाणार आहेत.
सर्वाधिक ३३ गावे उदगीर तालुक्यातील असून, चाकूर तालुक्यातील १७, निलंगा १५, औसा १३, रेणापूर ११, लातूर ११, अहमदपूर १०, देवणी ८, शिरूर अनंतपाळ ८ व जळकोट तालुक्यातील ७ गावांचा यात समावेश आहे. जिल्हय़ातील ४० गावांत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची योजनाही राबवण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.